Thursday, 19 March 2015

मानसिक आरोग्याची बाराखडी ३ भावनांची रंगपेटी


पुढच्या विषयाची सुरुवात करण्यापूर्वी मागचा एक संदर्भ. मागच्या लेखात मी शिपाई गड्यांबद्दल लिहिलं होतं. अनेकींनी प्रतिसादात मला बरेच शिपाई लागताहेत, अमका जास्त येतोय वगेरे लिहिलं. त्यात एवढं घाबरण्यासारखं नाही. आपले हृदय्,फुफ्फुसे,यकृत इ कामं करत असतात ते आपल्याला कळतही नाही. तसेच हे डिफेन्स मेकॅनिझम्स आपल्याला मानसिक दृष्ट्या ताळ्यावर ठेवायला मदत करत असतात. त्यांचे काम सुरूच असते. ते एका अर्थाने आपले मित्र आहेत. त्यातले काही वर वर नकारात्मक वाटत असले तरी त्यांच्यापेक्षा नकारात्मक जे काही येऊ पाहतंय; त्यांच्याशी लढत असतात. मला एखादी गोष्ट अजिबात जमत नसते पण ते मान्य करणे माझ्या इगोला दुखावणारे असते. मग मी म्हणते; छे ! मला ते आवडतच नाही मुळी ! यात स्वतःचा स्वीकार ही योग्य परिस्थिती. पण ते होणार नसेल आणि न्यूनगंड निर्माण होणार असेल तर डिफेन्स मे़कॅनिजम् आपल्याला 'आवडत नाही' या लेबलखाली न्यूनगंडापासून वाचवतोच की !

खालील म्हणी आपण व्यवहारात अनेकदा वापरतो. त्यामागे हे च शिपाई गडी आहेत.
# पदरी पडलं पवित्र झालं
# नावडतीचे मीठ अळणी
# नाचता येईना अंगण वाकडे
#कोल्ह्याला द्राक्षं आंबट
# बाजारात तुरी भट भटणीला मारी ......... इत्यादी. बघा सापडताहेत का शिपाई. सापडत नसतिल सोडून द्या. फक्त ते आपण या रूपात वापरतोय एवढे लक्षात घेऊया.

आता भावनांविषयी.
सकारात्मक आणि नकारात्मक भावना असे सहज वर्गीकरण आपण करत असतो. आनंद, उल्हास, ममत्व, आशावाद, प्रेम या भावना सकारात्मक आणि राग, चिंता, काळजी, द्वेष, चिडचिड, असूया, लज्जा यासारख्या भावना नकारात्मक असे आपण म्हणतो. याचा जरा विस्तार करूया. लहान मुलांसाठी आपण रंगखडूंची पेटी आणतो त्यात १२ च रंग असतात. मोठेपणे २४..४८ रंगखडूंची पेटी मला हवी असे वाटते. भावनांचं असंच आहे. जन्मतः अगदी मोजक्या भावना घेऊन आपण जन्माला येतो. जसजसे वय वाढते तशा भावनांच्या शेड्स वाढायला लागतात. म्हणजेच भावना या काळ्या पांढर्‍या लाल हिरव्या अशा नसतात तर त्या मिश्र रंगांच्या पोपटी, केशरी अशाही असतात. उदा: राग ही एक भावना घेतली तरी चिडचिड, वैताग, त्रास, संताप, अती संताप अशा शेड्स असतात. आनंद भावनेच्या उत्साह, प्रेम, प्रसन्नता, या आणि अशा अनेक शेड्स असतात.
तर या भावना जशा मिश्र असतात तसाच त्यांचा प्रकारही मिश्र असतो बरं का !

समजा आनंद - हा आनंद आइस्क्रीम खाण्यामुळेही असू शकतो, दुसर्‍यांना मदत केल्यामुळेही आणि कोणाला तरी इजा केल्यामुळेही ! मग आनंद ही तिसर्‍या केस मध्ये सकारात्मक भावना कशी ? आनंद ठीकंय पण उन्माद ?
राग - हरल्यामुळे शत्रूचा, माझी कोणीतरी छेड काढतंय त्याचा, खेळात हरल्यामुळे स्वतःचा, वेळ पाळली नाही म्हणून नवर्‍याचा असू शकतो. दुसर्‍या उदाहरणातला राग नकारात्मक कसा ?
प्रेम - मुलांबद्दलचे, आईबद्दल, देशाबद्दल, गुन्हेगार असलेल्या मित्राबद्दल. शेवटचे प्रेम सकारात्मक ?
नाही ना? म्हणून कोणतीही भावना ही सकारात्मक किंवा नकारात्मक नसते. तर ती आपल्या भावनिक उद्दिष्टांना अनुरूप किंवा विरूप असते. कसं ओळखायचं भावना अनुरूप की विरूप ?
सोपं आहे. जी भावना मला माझ्या उद्दिष्टापर्यंत जायला मदत करते ती अनुरूप. आणि जी उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यात अडथळे आणते ती विरूप.

काही उदाहरणे :

नोकरीसाठी मुलाखतीला जायचंय म्हणून ताण आलाय. एवढा की मी अभ्यासात एकाग्रच होऊ शकत नाही. भितीने झोप उडाली आहे. हा विरूप ताण. पण मुलाखतीत उत्तरं देता यायलाच हवीत असं म्हणून मी जागून अभ्यास करते. शेवटच्या क्षणापर्यंत तयारी करते हा अनुरूप ताण.
माझ्या लेकीला पोहायला शिकवायचंय. ती बुडेल अशी मला भिती वाटते. या भितीमुळे मी तिला पाण्यात उतरूच देत नाही. इथे तिला पोहायला शिकायला हवं हे उद्दिष्ट सादतच नाही. म्हणून ही भिती विरूप. पण घाबरून मी तिला एका ऐवजी दोन फ्लोट बांधते आणि डोळे घट्ट मिटून तिला कोच कडे पाण्यात ढकलते. ही भिती अनुरूप.
कोणीतरी छेड काढतंय. मला राग येतो. एवढा की माझ्या तोंडून शब्द फुटत नाही. असं वाटतं एक थोबाडात मारावी पण संतापाने थरथरण्याव्यतिरिक्त मला काही जमत नाही. मी जागीच थबकते. हलत नाही. विरूप राग. आणि मला एवढा राग येतो की मी कोणाची तरी मदत मागते किंवा त्या व्यक्तीला तिथेच खरमरीत उत्तर देते. अनुरूप संताप.

प्रत्येक वेळी प्रत्येक भावना ही उद्दिष्टाला अनुरूप आहे ना हे सरावाने कळते. सुरुवातीला टोकाच्या भावना निर्माण होतात तेव्हा अनुरूप की विरूप हा विचार करणे अशक्य वाटू शकते. पण सरावाने ते जमते. एकदा ते समजले की आपण आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकतो.

हा आख्खा भावनांचा गाव आपल्या मनात वसत असतो. आधी म्हटल्याप्रमाणे भावनाही सतत बदलत असतात. विरूप भावना माझ्या मनात निर्माणच होणार नाहीत हे शक्य नाही. त्या तशा निर्माण झाल्यावर मी त्या बदलू शकेन. हे मात्र हातात असते. चित्रात एखादा रंग खूप जास्त गडद वाटला तर आपण तो सौम्य करण्याचा प्रयत्न करतो नं तसंच टोकाच्या विरूप भावना टोकाच्या अनुरूप भावनांमध्ये बदलणे शक्य नसले तरी एक एक शेड सौम्य तरी निश्चित करू शकतो. या एका गोष्टीनेही आपले भावनिक हित साधले जाते. कसे ते पुढे येणारच आहे.
शेवटी एवढंच की या सगळ्या भावना माझ्या आहेत हे लक्षात घायला हवे. भावनांचा स्वीकार हवा. तरच स्वतःचा स्वीकार शक्य आहे. आणि स्वतःचा बिनशर्त स्वीकार ही मानसिक आरोग्याकडे नेणारी महत्त्वाची पायरी आहे.
पुढील लेख या बिनशर्त स्वीकाराबद्दल.

No comments:

Post a Comment