Thursday 12 March 2015

मानसिक आरोग्याची बाराखडी १

ही लेखमाला स्वतःच्या अभ्यासासाठी आणि काही मैत्रिणिंसाठी ! . स्त्रीयांचे-पुरुषांचे-मुलांचे-खेळाडूंचे मानसिक आरोग्य वेगवेगळं असं काही नसतं. शारीरिक आरोग्य जसे सर्वांचे सारखे तसेच मानसिक आरोग्यही. तरीपण... आपल्या सोयीसाठी, उदाहरणांच्या आणि समस्यांच्या वर्गीकरणाला सोपं जावं म्हणून इथे प्रामुख्याने स्त्रीयांच्या मानसिक आरोग्याविषयी लिहिणार आहे. यातली बरीच सूत्रे युनिसेक्स असतील. इथे मोकळेपणाने चर्चा व्हावी, शक्यतो अती खाजगी समस्या इथे बोलू नयेत असं वाटतंय.

तर मानसिक आरोग्य म्हणजे काय ?
जागतिक आरोग्य संघटनेने आणि आयुर्वेदाने सांगितल्यानुसार केवळ रोगाचा अभाव म्हणजे आरोग्य नाही. मानसिक आरोग्यालाही ते लागू पडतं. आपल्याला कोणताही मानसिक आजार नाही म्हणजे आपले मा आ चांगले असा त्याचा अर्थ नाही. तर मानसिक आरोग्य म्हणजे,
१. स्वतःचा बिनशर्त स्वीकार करता येणे, स्वतःबाबत समाधानी असणे
२.स्वतःच्या क्षमता आणि मर्यादांची जाणीव असणे
३.लहानमोठी आव्हाने पेलायला सज्ज असणे
४.आपल्या भावना आरोग्यपूर्ण मार्गाने व्यक्त करता येणे
५.ताणतणावांचे संयोजन करता येणे.

यातील प्रत्येक मुद्दा स्वतंत्र चर्चेतून येईलच. आता प्रश्न आहे की या सगळ्याची गरजच काय ? आधीच्या काळी नव्हती का ?
हो. आधीच्या काळीही मानसिक आरोग्याकडे आजच्याएवढेच दुर्लक्ष व्हायचे. ( आठवा संतापी, भांडकुदळ, कजाग, रडूबाई, अंगात येणार्‍या, दातखिळ बसणार्‍या, निर्विकार राहणार्‍या,कुटिल इ प्रकारच्या नात्यातल्या स्त्रीया ) आजही आपण तेवढेच दुर्लक्ष करतो. आपण स्वतःवर प्रेम करत नाहीत, सतत नव्याचा हव्यास असतो, शॉपिंग केलं की बरं वाटतं, भांडावं वाटतं, असुरक्षित वाटत राहतं, नक्की काय हवंय ते ठरवता येत नाही, कंटाळा साठून राहतो, सतत ताण घेण्याची वृत्ती, प्रचंड इगो आणि त्यामुळे सतत तो दुखावला जाणं, सतत थकवा,मरगळ वाटणं,अती सावधपण, मनाविरुद्ध घडणार्‍या गोष्टी सहन करण्याची क्षमता कमी होणं.... खूप मोठी यादी आहे. जी तुमचे मानसिक आरोग्य 'ठणठणीत' नाही असं ओरडून ओरडून सांगत असते. शरीराला होणारे त्रास थेट वेदनेच्या रूपात असल्याने आपण लगेच डॉक्टर गाठतो. पण या वर सांगितलेल्या मानसिक समस्यांकडे मात्र सपशेल दुर्लक्ष केले जाते. मनाचे चोचले, अवास्तव लाड, नवं फॅड अशी नावं दिली जातात. आणि मग या समस्यांसोबत फरफटत जगण्याची सवय होते.

याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम आपल्या शरीरावरही होतच असतो. मन आणि शरीर या दोन्ही संस्था मिळून माणूस तयार होतो. या दोन्ही संस्था परस्परावलंबी आहेत. जगणं आणि जिवंत असणं यात जो फरक आहे तो मनामुळे. जगणं म्हणजे केवळ श्वास घेणं नाही.
आपल्या विचारांचा आणि भावनांचा शरीरावर मोठा परिणाम होत असतो याची अनेक उदाहरणे देता येतील. भितीने घाम फुटणे, रागाने लाल होणे, आनंदाने चेहरा फुलणे, दु:खाने अश्रू येणे ही काही थेट उदाहरणे. मनापासून केलेल्या कामाचा ताण येत नाही, आवडीच्या गोष्टी करण्यासाठी शरीर साथ देतं असं म्हणतो यातूनही मन शरीर ही घट्ट जोडी दिसते.

याचाच अर्थ भावनांचा कार्यक्षमतेवरही तितकाच परिणाम होतो.
म्हणून जगण्यातल्या अनेक पैलुंचा आनंद घेता येण्यासाठी, इतरांना आनंद देता यावा यासाठी, उत्तम नातेसंबंधांसाठी, पुढची पिढी आरोग्यपूर्ण घडवण्यासाठी शारीरिक आरोग्याएवढेच मानसिक आरोग्यही तेवढेच महत्त्वाचे आहे.
शरीररचनेचा आपला सर्वांचा ढोबळ अभ्यास असतो. तेवढा मनाचा नसतो. तो सर्वसाधारण अभ्यास करूया. मनाच्या संस्था, प्रक्रिया या समजून घेऊ. हे समजले की मानसिक आरोग्याच्या वाटेवर चालणे अधिक सोपे होईल. :)

No comments:

Post a Comment