Sunday 8 March 2015

आंघोळ

आज सकाळी सकाळी व्हाट्सॅप वर एक विनोद वाचला. म्हणे, आरशासमोर एक ग्लास पाणी घेऊन उभे रहा, बचकन पाणी आरशावर फेका. म्हणा," झाली बाबा आंघोळ एकदाची !" काय झकास कल्पना ! मला फार आवडला हा विनोद. मी पण पुढे ढकलला. ( आपण कशाला सोडायचं!)

मग आंघोळीला गेले. कढत कढत पाणी. वाफा येणारं. बाथरूम भरून गेली वाफांनी. आरशावर वाफ जमा झाली. दोन बादल्या अशा कढत पाण्याने मनसोक्त आंघोळ केली. मग गरम चहा करून प्यायले. आणि पांघरुण घेऊन गुडुप ! एकदम लहान बाळ झाल्यासारखं वाटलं. शांत, निवांत, निर्मळ !

लोकांना आंघोळीचा एवढा कंटाळा का असतो काय माहीत. सत्ते पे सत्ता मधल्यासारखी 'उसे तो पानी के नाम से भी घिन आती है' अशी अनेकांची परिस्थिती असते. मला आवडते आंघोळ.

लहानपणी शाळा सकाळी ७ ची असायची. हिवाळ्याच्या दिवसात उठणं जिवावर यायचं. पण मातेला पुरेशी दया न आल्यानं कडमडत उठावंच लागायचं. एकदा उठून दूध पिऊन आंघोळ केली की मग मात्र आळस गायब व्हायचा. शाळा जवळच असल्याने आम्ही चालतच जायचो. स्वच्छ गणवेष घातलेले, डोक्याला चपचपीत तेल लावलेले, दप्तर पाठीला अडकवून हाताची घडी घालून तळवे का़खेत घालून चाललेले थवेच्या थवे शाळेच्या रस्त्यावर पसरायचे. कुंदाच्या फुलांचे दिवस असतिल तर दोन वेण्यांवर कुंदाचे लख्ख गजरे, त्यात दोनचार अबोलीची फुले ओवून, अगदीच अजून हौशी माता असेल तर कुंद अबोलीच्या गजर्यात मरव्याची चारदोन पाने पण असायची ! हा असा सुंदर गजरा आंघोळ केल्याशिवाय केसात माळायची आपली लायकीच नाही असं वाटायचं ! सकाळच्या त्या धुकट, गारठ जड हवेत हा कुंदाचा नि मरव्याचा सुगंधही रेंगाळत रहायचा.

मुलांची गोष्ट अजून वेगळी. मला वाटतं ते आंघोळीच्या बाबतीत जास्त आळशी असावेत. आंघोळीसाठी कदाचित आधीच पडलेली एखादी चापट किंवा चिमटा चेहर्यावर वागवत ते ही जथ्थ्याने रस्त्यावर असायचे. त्यांच्या गणवेषात खाकी हाफ पँट असल्याने केसांना जेवढे खोबरेल चोपडले असेल तेवढेच हातापायांनाही चोपडलेले असायचे. जो तेल लावणार नाही त्याचे पाय पांढरेफटक मातीच्या रंगाचे दिसायचे. मग चुकून त्यावर पाणी सांडलं तर ते कसं घाण वासाचं दिसायचं ! म्हणूनच कदाचित हे होऊ नये म्हणून ते अंगालाही पचपच तेल लावत असावेत.

 सकाळच्या कोवळ्या उन्हात प्रार्थनेला उभं राहिल्यावर सगळी काळी डोकी आणि उघडे हातपाय तेलामुळे चमचमताना दिसायचे. नुकतीच दिवाळी झाल्यामुळे दिवाळीत उरलेल्या अभ्यंग तेलाचा सदूपयोगही आम्ही सगळेच करायचो. सकाळी पहिल्या तासाला वर्गात फुलांच्या बरोबरीने माका,चमेली,बदामाचं तेल आणि हो नवं आलेलं चिकट नसलेलं केयो कार्पिन अशा तेलांचे वासही मिसळून दरवळायचे.

तर आंघोळ ! सुटीत गावकडे गेलो तर तिथला स्नानसोहळा अजून वेगळा असायचा. सक्काळी सक्काळी मांजरांच्या अंगावर उड्या मारण्याने जाग यायची. मग उठून बाहेर जायचं. आजी शेणाचा सडा घालत असायची. आई, काकू चूल पेटवण्याच्या तयारीत. आजोबा उगाचच लवकर आवरा ची गडबड करत असायचे. गोठ्यातून गायी सुटलेल्या असायच्या. काका पूजेला बसलेले असायचे. आम्ही पोरंसोरं मात्र काय करावं ते न कळून अर्धवट झोपेत नुसते बसून रहायचो. मग कोणीतरी म्हटल्यावर वतलासमोर दात घासत पुन्हा बसून रहायचं. वतलात तुरांट्या घालत जाळ मोठा करायचा. मस्त शेकत बसायचं. तिथेच बसून मग दूध प्यायचं. मग आंघोळ. तुरांट्याच्या आणि गोवर्‍यांच्या धुराचा वास लागलेलं ते खमंग आणि कढत पाणी घंघाळात हसत असायचं. त्या पाण्याने केलेली आंघोळ ही माझी जग्गात सर्वात आवडणारी आंघोळ !

कधीमधी आई नाहीतर आज्जीला आम्हाला न्हाऊ घालण्याची हुक्की यायची. मग काय.. हे असं जवळजवळ उकळतं असणारं पाणी, उकळलेल्या शिकेकाईचं नाकातोंडात जाणारं पाणी, डोळ्यांची होणारी आग, केसातून आपणच मुरवलेलं वाटीभर तेल काढण्यासाठी केसन केस धुवून खसाखसा फिरणारे काचेच्या बांगड्यांचे हात, मानेवरची मळाची पुटं ( असं त्यांचं म्हणनं!) काढणारी वज्री नाहीतर अंग घासायचा दगड आणि या सर्वांवर कळस चढवणारा आमचा आकांत !!!!! आहाहाहा.... केवळ अवर्णनीय !!! या अशा स्नानानंतर चुलीवरची कढत भाकरी हाणायची नि आता काय खेळावं हा विचार करत पेंगायचं ! दुसरा काही पर्यायच नाही !

दिवाळीच्या दिवशी आजी घरीच उटणं वाटायची. तीळ, हळद, चंदन आणि सायीचं दही. सुगंधी तेलाने माखलं की आजीच हातापांयांना हे उटणं चोळायची. मग अंगावरून ज्या काळ्या लेवाळ्या निघायच्या त्यांना आजी मळ म्हणायची. तो मळ बघता पार्वतीने मळापासून गणपती केला यावर आमचा फार म्हणजे फारच विश्वास बसायचा !
आपल्या अंगावरून एवढा मळ निघतोय याची एकाच वेळी मज्जा नि धास्ती वाटून त्या दिवशी मोती साबण जरा जास्तच वापरला जायचा.

पुढे आंघोळीपेक्षा वेगळे विषय चिंतनासाठी डोक्यात येत गेल्याने इथपासून ते मोठे होईपर्यंतच्या आंघोळींविषयी
काही चिंतन नाही. :)

युरोपात राहताना पहिल्यांदाच बाथटब या प्रकरणाशी ओळख झाली. लहानपणापासून अंगावरचा मळ वगेरे संस्कार झाल्याने पहिल्यांदा या टबात पाणी साठवायचं नि त्यात बसून किंवा लोळून आंघोळ करायची ही कल्पनाच गचाळ वाटली. मग तिथल्या पहिल्या थंडीच्या कडाक्यानं गरम पाण्यात भिजत पडून राहाणं कसं सुखाचं ते शिकवलं. तरी तो प्रकार आंघोळ म्हणून फारसा आवडला नाहीच. बाथटब मध्ये बसून पुस्तकं वाचणं, लॅपटॉपवर सिनेमे बघणं या गोष्टी मी कधी करेन असं वाटत नाही. पण अनेकांना हे आवडतं म्हणे.

माझ्या मते प्रत्येक ऋतूतल्या आंघोळीची कळा वेगळी असते. उन्हाळ्यात सकाळचा गारवा अनुभवत उन्हं वर आल्यावर उठावं, निवांत आवरून मग थंडगार न्हाणीघरात गार शॉवरखाली एक मिनि समाधी लावावी ! नाहीतर आमच्या गावच्या नदीच्या खळखळ पाण्यात वाळूत बगळ्याशी शर्यत करत लोळत ध्यान लावावं, नाहीतर आडाचं पाणी शेंदून शेवाळाचा गोडुस वास असलेल्या त्या पाण्यात चुबुकचुबुक करत खेळत बसावं, नाहीतर विहिरीतल्या गार अंधार्‍या पाण्यात डुबकी मारावी, नाहीतर पोहोण्याच्या तलावातल्या निळ्याशार तलम पाण्याशी खेळावं, नाहीतर उन्हं कडक होण्या आधी 'अजून एकदाच'! असं किमान २५ वेळा म्हणत समुद्राच्या लाटांना भिडून यावं, नाहीतर उन्हात बादली ठेवून त्या ऊनवासाच्या कोंमट पाण्यात मैसूर संदल किंवा संतूरचा वास मिसळावा.... रात्री झोपण्यापूर्वी गार पाण्याने आंघोळ करायची, फसाफसा घामोळ्यांचे पावडर लावायचे आणि गच्चीत मच्छरदाणीत गप्पा हाणीत चांदणं पांघरुन झोपायचे... ही उन्हाळ्यातली आंघोळ. हिवाळ्यातल्या आंघोळीसारखेच या आंघोळीलाही मोगरा, वाळा, कडुनिंब आणि हो.. आंब्यांच्या रसाचेही वास आहेत.

पावसाळ्यातली आंघोळ मात्र वरच्या दोन्हीपुढे फारच बाळबोध. त्या मानाने कमी नखर्याची. अवघी सृष्टी न्हात असताना आपल्या क्षुद्र आंघोळीकडे लक्षही जाऊ नये असा पाऊस ! पहिल्या पावसात होणारी आंघोळ ही खरं मनाची आंघोळ असते. शरीरापेक्षा मनच हा अनुभव घेत असतं. मुसळधार पावसात रेनकोट छात्रीशिवाय भिजायचं आणि मग कोरडं झाल्यावरही अंगाला येणारा पावसाचा वास आणि कुठल्याच शांपूने होऊ शकणार नाहीत असे मऊ झालेले केस... ही पावसाळ्यातली आंघोळ!

आंघोळीला आंघोळ म्हटलं की कसं आई, आजी, काकू, मावशी, मैत्रिणीला बोलावल्यासारखं वाटतं. 'स्नान' म्हटल्यावर उगाच वेदशास्त्रसंपन्न धीरगंभीर शास्त्री येतायत असं वाटतं. कावळ्याची आंघोळ म्हटलं की आंघोळ न करताच अत्तराचा फाया नि गंधाचा टिळा लावलेला बेरकीपणा दिसतो. चिमणीची आंघोळ म्हणताच फुटलेल्या पाईपमुळे तयार झालेल्या कारंज्यात दप्तर भिजू न देण्याचा लटकेपणा करणारी पिटुकली दिसतात.

 आम्ही शिबिरांवर जायचो तेव्हा आंघोळ हा तिथे अनावश्यक वाटणारा पण अत्यावश्यक असणारा वैताग असायचा. अशा वेळी एकमेकींना ' हाडं खंगाळून झाली का' असं विचारायचो. ते विचारताना समोर कोणत्याही हाडाचा मागमूस दिसणार नाही अशी मैत्रिण फिदीफिदी हसायची ते फार मस्त वाटायचं.

गंगेत अत्यंत श्रद्धेनं डुबकी मारणारे लोक, तोंडात पाण्याचा थेंब घेण्यासाठीही आंघोळीची अट असणारे लोक, दोन पायांवर तेलाने माखून ऊन ऊन पाण्याने आंघोळ घालत असतानाच पेंगणारी बाळं, तोंडाचं बोळकं आणि कमानीसारखी कंबर असतानाही लुगड्याचा पिळा खांद्यावर टाकून येणारी एखादी पणजी, शाळेत जाण्यापूर्वी आंघोळ करून गंधपावडर करणारी चिमुकली, स्वतःचा भांग पाडणारा आरशात भुवया ताणून बघणारा ऐटबाज चिमुकला, आंघोळीनंतर केस झटकणारी षोडशा, घाईघाईने आंघोळ उरकून केसांना तसाच पंचा बांधून कपाळावर टिकली टेकवून कामाला लागणारी गृहिणी.... ही आणि अशी अनेक चित्रे माझ्यासाठी नेहमीच प्रसन्न करणारी आहेत.

तर असं हे आंघोळपुराण. शेवटी माझं आंघोळीच्या बाबतीतलं एक स्वप्नं आहे ते सांगते ;)

माझे काही मित्रमैत्रिणी मला प्रेमाने 'म्हशे' म्हणतात त्याला माझा अजिबात आक्षेप नसतो. कारण मला नं एकदा खरंच म्हशीसारखी आंघोळ करायची आहे... उन्हाळा असावा.... स्वच्छ मातीचं, स्वच्छ पाणी घातलेलं डबकं असावं... त्याची लांबीरुंदीखोली अर्थातच माझा चेहरा बुडणार नाही एवढी असावी... आणि मग मी त्या चिखलात पसरावं.... आहाहा... आमेन !!!!!

                 

1 comment: