आज एका काकुंकडे जेवायला गेले होते. तिथे हा बेत होता. काकूंचं घराणं वेदशास्त्रसंपन्न प्रवचनकारांचं. आजच्या म्हणजे दिवाळीपाडव्याच्या दिवशी हा नैवेद्य परंपरेने चालत आलेला आहे असे काकू म्हणाल्या.
तुपात भिजलेली ती एक पोळी खाऊन दुपारी घरी येऊन जी झोपले ती तीन तासांनी आईने हलवून उठवल्यावरच उठले !!! खूप जड पण खूप चवदार असा हा राजस पदार्थ माझ्या सर्व खवैय्या मित्रमैत्रिणिंना दिवाळीच्या शुभेच्छांसह :)
लागणारा वेळ:
१ तास
लागणारे जिन्नस:
बदाम - १ वाटी
खवा - १ वाटी
हरबरा डाळ - १ वाटी
साखर - ३ वाट्या
जायफळ
वेलचीपूड - आवडीनुसार
केशर- चिमूटभर
क्रमवार पाककृती:
बदाम रात्रभर पाण्यात भिजत घाला.
सकाळी सालं काढून मिक्सरवर बारीक पेस्ट करून घ्या.
नेहमीच्या पुरणासाठी शिजवतो तशी हरभरा डाळ शिजवून मऊ वाटून घ्या.
आता एका पातेल्यात डाळ आणि साखर एकत्र गरम करा. चटचट आवाज यायला लागला की बदामाची पेस्ट त्यात मिसळा. हे दोन्ही चांगले मिळून आले की त्यात खवा ( न भाजता ) मिसळा. मंद आचेवर मिश्रण घट्ट होईपर्यंत हलवित रहा. त्यात जायफळ-वेलची-केशर घाला. पुरणासारखे हे मिश्रण आवडीनुसार थोडे ओलसर किंवा कोरडे केले तरी चालते.
पुरणपोळीसाठी मळतो तशी कणिक मळून त्यात सारण भरून पोळी लाटा. तव्यावर तेल तूप न घालता भाजून घ्या.
एका परातीत भरपूर तूप घ्या. ( हो ! परातीत !! :) ) तव्यावर भाजलेली पोळी थेट त्या तुपात बुडवा. उलटीपालटी करून चांगली भिजवा. बदाम पोळी तयार आहे. दिसायला ही नेहमीच्या पुरणपोळीसारखीच दिसते म्हणून फोटो नाही टाकत. चव मात्र.. अहाहा...! एकदा खाऊन बघाच !
वाढणी/प्रमाण: या प्रमाणात मध्यम आकाराच्या १२ ते १५ पोळ्या होतील.
No comments:
Post a Comment