Sunday, 26 June 2011

सूर्यास्त रोजच होतो...

सूर्यास्त रोजंच होतो... आणि ढगांच्या होड्या शिडं उभारू लागतात..अंधारसमुद्रात जाण्यासाठी..अशा अवेळी डोळ्यात पसरू लागतो तुझ्या आठवणींचा रंग....एक उत्कट..अभंग जाणीव अस्तित्वाला वेढून टाकते आणि मावळतीची मोरपिशी किरणंही मग मनाला टोचू लागतात.....गुलमोहराची पाकळी असते नं..तसं होतं मन..फुलातच असून स्वतंत्र अस्तित्व असणारं....

मनाच्या कडांना हळुवार स्पर्श होतो पाण्याचा आणि मन म्हणतं, अरे ! सांडलं की सगळं !!! आणि हे जे सांडलेलं असतं नं त्यात असतो मनाचा ओघळलेला दुखरा थेंब...एक कोपरा, जिथून आभाळ नाही दिसत....सैरावैरा येणार्‍या ढगांच्या गर्दीत त्याला हवा असतो एक निळा केशरी गुलाबी आभाळाचा तुकडा...

मन रोजच वाट पाहतं...

आता तर कुठे ढगांच्या कडा सोनेरी होताहेत....रात्र सरली का ? पहाळ त्या निळ्या केशरी तुकड्याला घेऊन येईल नं ? की असाच अजून एक सूर्यास्त पहायचा !!!

कारण सूर्यास्त रोजच होतो...

No comments:

Post a Comment