Tuesday 11 June 2013

मुलं - काही नोंदी

गेले काही दिवस खूप वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस हाताळायला मिळतायत. आलिप्त राहून काम करायचे ठरवले तरी मनात अस्वस्थता दाटून राहतेच. लिहिल्याने थोडे बरे वाटेल असं वाटतंय म्ह॑णून हा प्रपंच..लिहिताना अर्थात त्या त्या व्यक्तींच्या खाजगीपणाला कुठेही धक्का लागणार नाही याची काळजी घेत आहे.

 अवनी. वय १७. गेली चार वर्षं दरवर्षी एक अश्या कुटुंबातल्या ४ व्यक्तींचा मृत्यू या मुलीने पाहिलाय. आता एकटी आहे. १२ वीत उत्तम गुणांनी पास झाली आहे. तिचा प्रश्न " माझ्या आजूबाजूची एकेक माणसं मरतायत आणि मी मजेत जगतेय.. मला नको असं जगणं.." स्वार्थी नातेवाईक, एकटेपणा, अकाली प्रौढत्व, मित्र मैत्रिणी आणि हिच्या जगण्याच्या शैलीतली तफावत, अपरिपक्व निर्णक्षमता अशा अनेक गोष्टींनी नैराश्याच्या गर्तेच्या तोंडाशी उभी ही !

 नीरव,वय १९. लहाणपणापासून प्रत्येक हट्ट पुरवला गेला. अकरावीत असताना अनेक व्यसने लागली. त्यातून बहेर पडला तेव्हा बारावीच्या परीक्षेला  ३ महिने उरले होते.१० वीला ९२% मिळवणारा हा मुलगा १२ वीत कसाबसा पास झाला.हट्टी हेकेखोर स्वभाव मात्र तसाच आहे. लाड पुरवणे तसेच आहे. वडिलांचा व्यवसाय. आई नोकरदार. नीरव ने मागच्या आठवड्यात नवे गेम खेळण्यासाठी नवा लॅपटॉप मागितला. त्याला हवा असलेला लॅपटॉप मिळाला नाही तर आत्महत्येची धमकी दिली. घरातून दोन दिवस गायब झाला. वडिलांनी घाबरून लॅपटॉप घेऊन दिला. आई हतबद्ध !

 रचिता. १५ वर्षे. घरात आईबाबांची सतत भांडणं. हिच्याकडे होणारे दुर्लक्ष हे या संवेदनशील मेधावी बुद्धिमत्तेच्या मुलीला सहन झालं नाही. तिने आत्महत्येचा प्रयत्न केला.

 सरयू.२१ वर्षे. ११ वर्षांपूर्वी दिल्लीतल्या एका डॉक्टरने ही स्लो लर्नर आहे असे सांगितले. मग स्पेशल स्कूल, रेमिडियल क्लासेस असे चक्र सुरू झाले. आत्ता टेस्ट केली तर बुद्ध्यांक सामान्यांपेक्षा वरचाच आहे. पण लेखनातली अध्ययन अकार्यक्षमता आहे असे आढळले. ही नुकतीच १० वी झाली. पुढे काय हा निर्णय घेता येत नाही.

 संकेत आणि संध्या. १४ वर्षे. एका महागड्या प्रसिद्ध कोचिंग क्लास मध्ये गेलं वर्षभर लैंगिक शोषणाला बळी पडलेली ही मुलं. आई बाबांचे खूप पैसे वाया जातील असे वाटल्यामुळे सहन करत राहिली. असह्य झाल्यावर बोलण्याचे धाडस केले.

 विरेन.१४ वर्ष. अती बुद्धिमान. त्याच्या मते ही शिक्षणपद्धत, राजकारण, समाजरचना 'होपलेस' आहे. त्याला याचा भाग होण्याची इच्छा नाही. त्याने शाळेत येणं सोडून दिलंय. गेले सहा महिने केवळ शास्त्रीय संगीत ऐकतोय. कोणाशीही संवादाची इच्छा नाही.

 अक्षता. १५ वर्षं. गेली २ वर्षं तिच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठ्या असणार्‍या मुलाच्या प्रेमात(?) आहे. आता त्याला दुसरी मैत्रिण भेटली आहे. म्हणून हिने अभ्यास शाळा सोडून देण्याचा निर्णय घेतला.हट्टाने घरातून बाहेर पडली नि होस्टेलवर आहे. तिथे तिच्याबद्दल चोरीच्या तक्रारी पुराव्यांसह येताहेत.

 रीमा. वय ८. कॉलनीत एक टोळी आहे. त्या टोळीची ही लीडर. ५ ते ८ वयातल्या या मुली रोज ठरवून एकीच्या घरून पैसे चोरून आणतात. ते जंक फूडवर खर्च करतात. जी मुलगी याला विरोध करेल तिला वाळीत टाकलं जातं. पालक हैराण..

 अर्णव.वय ६. आई सतत आजारी असते म्हणून त्याला ती अज्जिबात आवडत नाही. घरी असलेल्या वेळापैकी ६-७ तास हा टी व्ही किंवा व्हिडिओ गेम्स खेळतो. ते बंद केले तर याला खूप उलट्या सुरू होतात. हे व्यसन कसं घालवायचं या संभ्रमात पालक.

 निधी. वय ५. दत्तक मुलगी. आई बाबा ५० च्या वरचे. ही चंचल आहे. दिवसाला ३ बिस्किटांशिवाय काहीही खात नाही. अचानक अंथरुण ओले करणे सुरू झाले आहे. बोलण्यात तोतरेपणा यायला लागला आहे.

 अंकुर. वय ४. बोलत नाही ही तक्रार घेऊन पालक आले. चाचणीनंतर समजले तो कर्णबधीर आहे. आई म्हणाली आमच्या लक्षातच आलं नाही.

 राधा . वय ६.उत्तम चित्र काढते. अचानक तिने घरावरून वाहणारी नदी आणि घराखाली जळणारे डोंगर एवढीच चित्रं काढायला सुरुवाय केली आहे. पालकांना समुपदेशकाकडे यायला गेली ५ महिने वेळ मिळत नाही.

सारिका वय ११
           वर्गात शेजारी कोणालाही बसू देत नाही अशी सतत तक्रार. आई सांगते घरीही कोणाला हात लावू देत नाही. आणि सतत हात धूत असते.  लाईटच्या बटणाला हात लावताना बोटाला रुमाल गुंडाळायचा. बेसीनमध्ये हात धुताना आधी नळावर वारंवार पाणी टाकायचं, दार उघडलं की हात धुवायला पलायचं.... दिवसातून ३४ वेळा हात धुतल्याची नोंद केली आहे त्यांनी !
            दोन वर्षांपूर्वी एका सहलीत तिला कोणीतरी 'बॅड टच' केला होता म्हणाली. तेव्हापासून तिला कोणत्याही स्पर्शाची भिती वाटते. मामाने गालाला हात लावलेला तर सहनच होत नाही.
             आई वडील अल्पशिक्षित श्रीमंत. ' तिच्यावर वाटेल तेवढा पैसा खर्च करतो पण हे खुळ तिच्या डोक्यातून काढा " असे म्हणतात. त्यांच्याजवळ पैसा आहे. पण संवाद साधण्यासाठी वेळ नाही. :(

केतन. वय १७. वडील एका अती महत्त्वाच्या सरकारी खात्यात उच्चपदस्थ आहेत. आई मानसशास्त्राची पदवीधर. दोघेही अतिशय प्रामाणिक आणि सरळ साधे जगायला आवडणारे. केतनचा स्वभावही साधा. काहीसा भाबडाच. आता त्याला त्याचे मित्र 'सरकारी तोर्‍यात रहा, गाड्या वापर, पैसे उधळ.." असा आग्रह करतात. आई बाबा समजावून बोलून थकलेत. केतनला मित्र हवेत म्हणून त्यांचे ऐकावे लागेल असे ठामपणे वाटतंय. तो आता घरातून किरकोळ चोर्‍या करायला लागला आहे. स्वतःच्या स्टेटस साठी सरकारी यंत्रणेचा दुरूपयोग करतोय. बाबांना ते अजिबात मान्य नाही. याच्या काळजीने ते त्रस्त आहेत.

संकल्प, वय १२
          आई बाबा दोघे नोकरीवर गेल्यावर घरी एकटा असताना इंटरनेटवर पॉर्न पाहण्यात आले. मग आवडले. मग वारंवार बघण्याची सवय लागली. बाबांना समजल्यावर खूप मार खावा लागला. आता घरात नाही बघत. सायबर कॅफे मध्ये बघतो. त्यासाठी लागणारे पैसे चोरतो. दिवास्वप्नात राहणं खूप वाढलंय. भाषा आणि नजर बदलली आहे. तो आता मुलामुलींना नको तिथे स्पर्श करण्याची संधी शोधत असतो. आई बाबांच्या पापभीरु विश्वाला हा प्रचंड मोठा हादरा आहे. ते म्हणाले की आम्ही त्याचा तिरस्कार करतो. ही चटक संकल्पला विकृत बनवतेय. कळतंय पण वळत नाही. तो एकटा पडलाय.

मृण्मयी वय १५.
           दहावीत शिकणार्‍या मृण्मयीच्या आई बाबांचा घटस्फोट होतोय. मार्च मध्ये शेवटची सुनावणी आहे. ती आईच्या पाठीशी ठाम उभी आहे. बुद्धिमान आहे. कष्टाळू आहे. आता तिला ताण आहे तो लोकांच्या प्रश्नांचा, मित्रमैत्रिणी दुरावण्याचा. तिला निद्रानाशाचे निदान झाले आहे.

सारंग, वय ८
मोठ्या एकत्र कुटुंबातला मुलगा. आई बाबा आपापल्या व्यवसायात मग्न. आई त्याला भेटतच नाही. सकाळी ८ ते रात्री १०-११ ती ऑफीसात असते. सारंग भेटला की मनातल्या अपराधीपणाला घालवण्यासाठी वाट्टेल ते लाड होतात. आता शाळेतून तक्रारी येतायत. आई सोडून सारंगचा आवाज कधीच कोणी ऐकला नाही. माझ्याकडे पहिले सेशन झाले तेव्हा ४० मिनिटांनी पहिला शब्द त्याने उच्चारला. "बाय" !
आता आपणहून येतो. समोर नुसता बसतो. चित्र काढतो. मेकॅनो किंवा टूलकिट काढून खेळतो. अवघड पझल्स लीलया सोडवतो. बाय म्हणतो नि जातो.

निनाद, वय ८
६ महिन्यांपूर्वी अचनकच याच्या समोरच याची आजी गेली. तेव्हा घरात निनाद नि आजीच. याने आईला फोन केला. " बहुतेक आजी वारली. कारण ती आता जप करत नाहिये."
निनादला तान्हा असल्यापासून आजीनेच सांभाळलं. काहीशी अती काळजी घेणारी पण शिस्तीत नि प्रेमळ धाकात वाढवणारी आजी निनादसाठी सर्वस्व होती.
ती गेल्यानंतर निनाद रडला नाही. सकाळी उठल्यापासून जी कामे आजी करायची ती स्वतःहून करायला लागला. रांगोळी, पूजा, स्वतःची आंघोळ.... आई बाबांशी संवाद नाही. चिडणे नाही. बोलणे नाही. अभ्यास उत्तम. शाळेतून काही तक्रार नाही.

अकल्पिता, वय ४
घरात आई बाबांचे सतत होणारे वाद बघते. बहुतेक मारहाणही. एक दिवस शाळेत तिच्या मनाविरुद्ध काहीतरी झाले म्हणून हिने शिक्षिकेसमोर बेंचवर स्वतःचे डोके आपटून घेतले. सगळा वर्ग स्तब्ध ! शिक्षिका हतबद्ध ! आता तिने पुन्हा असे करू नये म्हणून घरात नि वर्गात सगळे तिच्या मनासारखे वागतात. तरीही अकल्पिता आनंदी नाही.

 मनाच्या जंगलात हरवलेली ही मुलं सतत काहीतरी सांगू पहातायत. ते आपल्याला कधी ऐकू येणार ?

No comments:

Post a Comment