Monday, 31 January 2011

ऋतू बदलतात..हरवतातही !

ऋतू बदलतात, ऋतू हरवतातही... आणि हरवलेल्या प्रत्येक ऋतूबरोबर हरवतं मनही....येताजाता सळसळून हात उंचावत अभिवादन करणारा तरुण वृक्ष जेव्हा एका ऋतूला निरोप देताना अचानक संन्याशाची वस्त्र लेवुन समोर उभा ठाकतो तेव्हा स्तंभित होतं मन..एक एक पान गळताना बघुन गोठत जातं मन.. झाडावरचे पक्षीही भटके पंख घेऊन अज्ञातात जातात कुठेतरी...आभाळातून गळणार्‍या बर्फाच्या चुर्‍यासारखं सैरभैर पांगतं मन...बर्फाच्या त्या चुर्‍यावर पहिलं पाऊल टाकताना हलतं मन... आपलीच पाऊलनक्षी बघत गिरकी घेतं मन..पनगळ बघताना सुन्नाट झालेलं मन हरवतंच मग नकळत..
त्या पाऊलनक्षीचं एवढं वेड लागतं की तिथे एक पायवाटच बनते..मग पावलं उमटत नाहीत त्या घट्ट झालेल्या बर्फावर..आणि मग एक दिवस तिथूनही मन निसटतं !
अचानक त्याच्या लक्षात येतं, सूर्य हरवलाय ! म्हणून सावलीही ! हळुहळू काळोखाची चादर सवयीची होते. मऊ भासते. ओळखीच्या गंधात आपल्यातच घुटमळत रहातं मन...
रोजच्या वाटेवरचं झाड तपश्चर्या करताना बघणं हा एक आपला खेळ...तेवढंच त्या झाडाला गोंजारणं, कधीतरी त्याला हात लावून धीर देणं..
आणि एक दिवस झाडाच्या अंगावर कसलेले बारीक रोमांच दिसतात..झाडही कसल्याशा लाजर्‍या आनंदात हात अजून उंचावलेले दिसते ! पाखरं परतलेली दिसतात एक दिवस.. मनाची भुवई उंचावते...झाड आपल्याच नादात...आणि उंचावलेली भुवई खाली येईपर्यंत लक्ष लक्ष कोवळी पानं झाडाच्या अंगाअंगातून डोळे उघडताना दिसतात..लाट फुटावी तसे झाड नाचायला लागते...प्रत्येक पदन्यास पानांना आश्वस्त करत खुणावतो..बाहेर या, नाचूया... ! पक्षीही साथ देतात नि मग ते झाड एक गाणं होतं..बदललेल्या ऋतूचं गाणं....
ओह्ह..अंधाराचं पांघरूण विरतंय नि नवनवे गंध पसरतायत अवतीभवती..सावली परतली..म्हणजे सूर्यही...
मन स्वार होतं पाखरांच्या निळ्या पंखांवर..आणि सज्ज होतं हळुच फुलणार्‍या हजारो कळ्यांच्या स्वागतासाठी..
ह्म्म... ऋतू बदलतात..हरवतातही !

No comments:

Post a Comment