Monday, 31 January 2011

दलिया इडली आणि दोसा

यावेळी दलिया जरा जास्तच आणला गेला. दलियाची खिचडी घरात कोणाला विशेष आवडत नाही. आणि गोड तरी किती करून खाणार. म्हणुन जालावर दलियाच्या रेसिपी शोधताना दलिया इडली सापडली. दोन तीन ठिकाणच्या रेसिपी एकत्र करून तयार झालेली ही दलिया इडली ! ज्यांना तांदूळ कमी खायचा आहे किंवा चालतच नाही अशा खवैय्यांसाठी ही एक मस्त रेसिपी आहे. ट्राय करा !

सामग्री :
१ कप दलिया
अर्धा कप उडीद किंवा मुगाची डाळ
१०-१२ मेथी दाणे
अर्धा कप दही
जिरे मोहरी, कढीपत्ता, हिंग, तेल वगैरे फोडणीचे साहित्य
१ मोठा चमचा चणा डाळ
अर्धा छोटा चमचा खाण्याचा सोडा
मीठ

दलिया आणि डाळ ७-८ तास वेगवेगळे भिजत घाला. दलियामध्ये भिजवताना भरपूर पाणी घाला. कारण ते जास्त शोषले जाते. मेथी दाणेही भिजत घाला.
मग एकत्र वाटून घ्या. साधारण नेहमीचे इडलीचे पीठ असते तेवढे बारीक नि पातळ मिश्रण तयार करून घ्या.
एका कढईत तेल तापवून जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंग नि चणा डाळ घालून फोडणी तयार करा. ती वरच्या मिश्रणात मिसळा.
आता त्यात दही, मीठ आणि खायचा सोडा घाला. चांगले फेटून घ्या. इडलीपात्राला तेलाचा हात लावुन त्याच्या इडल्या लावा. १५ मि इडल्या वाफवुन झाल्या की इडलीपात्र न उघडता तसेच बाजूला ठेवा. त्या इडल्या गार झाल्यावर काढायला जास्त सोप्या जातात.
मग गरम गरम सांबार आणि चटणीसोबत खायला घ्या.





इडली केली की आई दोसा पण करते याची सवय असल्याने लेकीने आजही दोशाचा हट्ट धरला. मग काय ! याच पिठाचा मस्त दोसा तयार झाला.




दलियाच्या इडल्या तांदळाच्या इडल्यांएवढ्या फुगत नाहीत आणि गरम खाणार असाल तर थोड्या चिकट पण वाटतात.
फर्मेंट करण्यासाठीचा वेळ यात वाचतो.
या प्रमाणात साधारण मध्यम आकाराच्या २०-२२ इडल्या होतात.

No comments:

Post a Comment