Sunday, 30 January 2011

दिल तो बच्चा है जी..थोडा कच्चा है जी...

कितीतरी विषयांनी डोकं भणाणलंय..
प्रत्येक विषय म्हणतोय मला कागदावर उतरव.. पण तो उतरण्याचा रस्ता जणु गोठून गेलाय..प्रयत्न करतेच..
आजकाल एक गाणं सतत ऐकतेय. सतत ऐकतेय म्हणुन कदाचित सगळ्या घटनांशी त्याचा संबंध लावला जातोय...
" दिल तो बच्चा है जी..थोडा कच्चा है जी.... "

ताई स्पोर्ट सायकॉलॉजिस्ट आहे. तिच्या एका क्लायंट मुलीला राष्ट्रीय स्तरावरचं ब्राँझ पदक मिळालं. फोनवर बोलताना ही बातमी ताई शांतपणे सांगत होती. पण तिची स्पर्धेच्या वेळी रहाण्याची व्यवस्था सेवन स्टार हॉटेलात होती हे सांगतानाची एक्साईटमेंट केवढी ! आणि वॅफल खाताना म्हणे माझी आठवण आली.... सो क्यूट !
दिल तो बच्चा है जी...

सखीच्या बाळाचं नाव ठेवायचंय. आवडतं नाव खूप कॉमन झालंय म्हणुन बाद. दुसरं आवडतंय ते उच्चारायला अवघड म्हणुन बाद. तिसरं आमच्यासारख्या जवळच्या मित्रमैत्रिणीला आवडलं नाही म्हणुन बाद...... आता पिलु ३ महिन्यांची झाली. नाव ठेवायलाच हवं. पण कोणतं ?
दिल तो बच्चा है जी...

पासष्ट वर्षांची टीना एक मैत्रिण म्हणुन खूप छान आहे. शिक्षिका होती. निवृत्तीनंतर भारतीय वस्तुंचं एक दुकान चालवायची. १० वर्ष दुकान चालवल्यावर कंटाळली नि आता ते बंद करुन हजारो गोष्टी करते. चित्रकला शिकते. क्वायरमध्ये गाते. रहात्या घरात एकटीच असूनही कपाटं बदल, नवे कार्पेट घे, मांजर पाळ असल्या गोष्टी लहान मुलाच्या उत्साहात करते. म्हातार्‍या आईला भेटायला जात रहाते. निसर्गावर निस्सिम प्रेम आहे तिचं. पुढच्या ३ महिन्यांचे प्लान्स तिच्या डायरीत ठरलेले असतात. एक मुलगा नि एक मुलगी आपापल्या मार्गानी नीट चाललेत. पण ही टीना काही किरकिरायची कधी थांबत नाही. मुलाला चार मुलं म्हणुन, मुलीला बॉयफ्रेंड आहे पण मुल नाही म्हणुन, आई तिला भारतात जाऊ देत नाही म्हणुन अशा कंसिडरेबल कारणांसोबत फार फालतु कारणांवरही तिची किर्किरीची गाडी तेवढ्याच जोरात चालते..
दिल तो बच्चा है जी....

काल नवर्‍याचा आयटीवाला कलीग आला होता. अठ्ठावीस वर्षाचा हा पोरगा आजकाल कायम नुकताच प्रेमभंग झाल्यासारखा दिसत असतो. कामाचे प्रेशर, अडचणी, डेडलाइन्स, सहकार्‍यांची बेशिस्त या सर्व विषयांवर बोलून झाल्यावर वेळ असलाच तर बॉलिवुड नि मग इकडेतिकडे फिरण्याचे प्लान्स असे काहीबाही बोलत रहातो. अचानक त्याला विचारले " तु अजुन दहा वर्षांनी कुठे असशिल ? "
" माहीत नाही ! विचार केला नाही. काही ठरवले नाही." अशी उत्तरं देत विषय बदलला.
तरुण, लग्नाळु, कमावता, स्मार्ट , श्रीमंत असे सर्व गुण असलेला हा मुलगा स्वप्नं बघायचं टाळतो. स्वतःबद्दल विचार करायला वेळ देत नाही. भविष्याचे प्लॅन्स बनवत नाही. याचा दिवस ऑफीसमध्ये १६ तास नि अंथरुणात ८ तास असा असतो. याचे वीकेंड्स ऑफीसमध्ये १२ तास पब मध्ये ४-५ तास नि उरलेला वेळ झोप असे असतात. आपल्या कामाबद्दल तो सतत असमाधानी आहे. कंटाळलेला आहे. कोणताही छंद नाही. वाचन नाही. खेळ नाही.व्यायाम नाही. जवळचे 'सहकारी' आहेत. मित्र नाहीत. आत्ताच्या लाइफस्टाईलमध्ये कोणताही बदल करण्याची त्याची इच्छा नाही. कारण कोणताही बदल म्हणजे एक्स्ट्रा काम असंच त्याला वाटतं !
भविष्याबद्दल काहीच विचार न करण्यामागे काय असेल ? आळस ? भिती ? स्वतःला खरंच काय पाहिजे हे कळतच नाही ?
दिल तो बच्चा है जी....


एका मित्राचे वडील वारले. त्याने " आर आय पी डॅड :( " असे स्टेटस फेसबुकवर टाकले. रक्ताचं एक माणूस या जगातून नाहीसं होतं त्या खरं तर त्याने कोणाच्यातरी गळा पडून रडावं ! आपला आकांत असा दोन शब्दात म्हटलं तर स्वतःपाशी नि म्हटलं तर जगासमोर मांडावा यामागची वेदना कितीतरी खोल आहे ! एकटेपणा, पोरकेपणा, जबाबदारीचे ओझे, भावनिक धक्का, अव्यक्तता नि असहायता ! खूप क्रूर आहे हे ! त्याचे फेसबुकवरचे ते दोन शब्द डोक्यातून जात नाहियेत..
ह्म्म.. दिल तो बच्चा है जी...

1 comment:

  1. yaar khup pryatana nantar he jamale aahe .
    aajch net coneection ghetale aahe . bar he marathith kase lihayche te mahit nahi.
    baki juni maya bhetalya sarkhi watali ,

    ReplyDelete