Sunday 2 January 2011

संभ्रम

गेले चार वर्ष सगळं मस्त चाललं होतं. निदान माझ्यातल्या आळशी माणसाला तरी ते आवडत होतं. वाचायचं, लिहायचं, लेकीला वाढताना पहायचं, रिकाम्या बॅगांनी खुणावलं किंवा नवर्‍याच्या खिशाने हो म्हटलं की भटकायला जायचं, नोकरी-घर सांभाळणार्‍या मैत्रिणींची तारांबळ निवांतपणे बघायची आणि पुन्हा एकदा आपल्या शंखात घुसून गप रहायचं. हो, मी याला शंखातलं जगणंच म्हणेन. सगळीकडून सुरक्षित! कुणाशी स्पर्धा नाही, अस्तित्वासाठी झगडणं नाही आणि शंखापुरतं का होईना ; मनाला वाटेत तेव्हा मनाला येईल तसे वागण्याचे स्वातंत्र्य !
अचानक एक दिवस नवर्‍याने या शंखाला उचकावले. " भारतात गेल्यावर काय करणार आहेस ? " मनात उत्तरं तय्यार होती. " उतरल्याबरोबर जिथे पहिला वडापाव भेटेल तिथे गाडी थांबवून आधी खाणार. मग पानीपुरी !!" पण नवर्‍याचा जरा गंभीर सूर पाहून मनाशी जुळवाजुळव करत उत्तर दिलं," घर लावायचं, लेकीसाठी शाळा शोधायची, खूप दिवस साठलेल्या गप्पा मारायला मित्रमैत्रिणींना बोलावून दंगा घालायचा. मराठी नाटकं बघायची, मनसोक्त खरेदी करायची..... " अशी लांबलचक यादी अखेरची संपली. नवर्‍याने कोणतीही प्रतिक्रीया न देता शांतपणे विचारले. " पुढे ? " इथे शंखातली गोगलगाय जरा हलली ! उत्तर नव्हतेच. म्हणजे विचार केला नव्हता असे नाही. पण अजून निर्णय घेता येत नव्हता.

लहान असल्यापासून लष्कराच्या भाकर्‍या भाजयची आवड. घरातल्या तशाच वातावरणाने त्या आवडीला खतपाणी घालून आवडीचे आता स्वभावात रुपांतर झालेले. पैसा महत्त्वाचा नाही. आनंदाने जगता येणं महत्त्वाचं असं मनात कोरलेलं. खूप श्रीमंती नसताना किंबहुना गरिबी म्हणता येईल असं जगताना खूप अर्थपूर्ण जगणारी माणसं जवळून बघितलेली. कोणी वनवासी लोकांमध्ये काम करतोय, कोणी पूर्वांचलात शाळा चालवतोय, कोणी भटक्या विमुक्तांसाठी आयुष्य वेचतोय, कोणी बिहारमध्ये जाऊन समाजसेवा करतोय अशी स्वतःसाठी अशक्यप्राय असणारी उदाहरणे होती. निष्णात डॉक्टर असून खोर्‍याने पैसा न कमावता सेवाभावी रुग्णालय चालविणारे, आयआयटी मध्ये सुवर्णपदक मिळवून पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्त्याचे जीवन स्वीकारणारे, पी एच डी करून आभाळात नेणारी नोकरी न करता प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम करण्याचा पर्याय निवडणारे असे लोकही अगदी आजूबाजूला होते. खूप पैसा कमावत असताना एखाद्या सामाजिक प्रकल्पासाठी झोकून देऊन काम करणारे अनेक लोक दिसत होते. एक गोष्ट आज लक्षात येतेय. की या लोकांची 'पैसा हे एक साधन आहे, साध्य नव्हे ' ही धारणा होती आणि ते त्यावर विश्वास ठेऊन जगत होते. आहेत. एवढ्या वर्षात कधीच कोणालाही आपण निवडलेल्या मार्गामुळे पश्चात्ताप करण्याची वेळ आलेली दिसली नाही. शाळाकॉलेजात अभ्यासक्रमात नसणार्‍या अनेक चांगल्या गोष्टींचा ठसा मनावर उमटत गेला.
मग काय झालं ? मग पोटभर शिकून नोकरीला सुरुवात केल्यावर अंगावर चालून आली ती स्पर्धा, राजकारण, आणि यांत्रिक जगात काही अंशी का होईना यांत्रिकपणे जगण्याची अपरिहार्यता. चारपाच वर्षात या सगळ्याची सवय झाली. मग नवरा कंपनीने पाठवलं म्हणून आणि मी नवरा आला म्हणून इथे परदेशात आले. चार वर्षे तशी निष्क्रीय गेली. पण विचार निष्क्रीय नव्हतेच. आपल्याला स्पर्धा हवी आहे का? स्पर्धा नाकारली तर काय काय हातातून सुटू शकते, पैसा कमावताना कुठं थांबायचं, मनाचा कल खरंच पैसा कमावण्याकडे आहे की सामाजिक कार्यात शिरायचं आहे या आणि अशा अनेक गोष्टींचे मंथन चालू आहेच. अजून संभ्रम मात्र जात नाही.

1 comment:

  1. विचार खरंच स्तुत्य आहेत. एका दिशेने विचार सुरु केला की मग आपले आपल्यालाच मार्ग दिसत जातात, गोष्टी सुचत जातात.

    ReplyDelete