Friday, 31 December 2010

हजारमोगर्‍याचं हसणं

आज सगळीकडे गच्च धुकं दाटलंय. माझ्या खिडकीतून दिसणार्‍या हायवेवर गाड्या मुंगीबायसारख्या एकामागे एक चिकटून हळुहळू जातायत. निष्पर्ण झाडं अंगाखांद्यावरून निथळून पडणारं बर्फ अस्वस्थ होऊन पाहतायत. आपोआपच नजर हायवे, पलीकडील कारखान्यांच्या इमारती, अलीकडे असणारं छोटंसं जंगल, त्यातली उघडीनागडी झाडं, त्यांच्या बुंध्याशी आजूबाजूला साठलेला बर्फ, मग फांद्या , मग एखादीच फांदी, त्यावरून ओघळणारे बर्फाचे पाणी आणि त्यातला एक हळुहळू मोठ्ठा होत जाणारा थेंब यावर केंद्रित होते. तो थेंब टप्पकन गळतो. आणि का कोण जाणे नकळत आतापर्यंत रोखला गेलेला श्वास नि:श्वासासारखा सुटतो !

जगण्यावरून असाच अलगद ओघळून गेलेला एखादा चेहरा ध्यानीमनी नसताना समोर येतो. आज मुक्ताताई आठवली.

तिची माझी पहिली भेट झाली दिल्लीच्या प्रवासात. एका कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून आम्ही ८० जणी जात होतो. एकत्र आरक्षणामुळे एकाच डब्यात सोलापूरकर आणि आम्ही लातूरकर जमा झालो. ओळखी चालू असताना अगदी कोपर्‍यातल्या खिडकीतून खणखणीत आवाजात 'मी मुक्ता' असे नाव सांगितले गेले. सोलापूरच्या गटाचं नेतृत्व तिच्याकडे असावं. पस्तिशीतली मुक्ताताई. लख्ख गोरा रंग, बघणाराच्या नजरेला क्षणभर बांधून ठेवणारे मोठ्ठे काळेभोर डोळे, करारी चेहर्‍याभोवती दाट कुरळ्या केसांची महिरप, नुकताच कोणतासा निर्धार केला असावा असे दिसणारी जिवणी आणि प्रसन्न हसणं. खळखळून. आम्ही त्याला 'हजारमोगर्‍याचं हसणं' म्हणायचो !

गप्पा रंगल्या. आम्हा अजून विशीतच असणार्‍या मुलींचा एक गट तयार झाला नि त्याचं सुकाणू सहजपणे मुक्ताताईच्या हातात गेलं. लांबचा प्रवास होता. " ए आपण एक पथनाट्य बसवूया का ?" मुक्ताताईच्या या प्रश्नावर हो शिवाय काही उत्तर असणारच नव्हते." तिने लगेच विषय सांगितला. स्वदेशीच्या चळवळीवर बसवूया पथनाट्य. " "अंधुक आराखडा मनात आहे. सगळ्याजणी मिळून पूर्ण करूया. " तिच्या वाक्यातल्या "मिळून पूर्ण करूया " या शब्दानंतर ते पथनाट्य आमचं सर्वांचं पुढच्या आठ दिवसांचं मिशन बनलं ! संहिता लिहिली गेली. साजेशी गाणी शोधली गेली. सापडली नाहीत तिथे गाणी लिहिली गेली. आमच्याच रेल्वेत कर्नाटकातून आलेल्या कारकर्त्यांचाही ग्रुप होता. त्यांचेही असेच काहीसे चालले होते. कन्नडमधून. पूर्ण प्रवासात रेल्वेत देशभक्तिपर गीते, घोषणा, प्रवाश्यांसमोर पथनाट्ये अशी धमाल चालली होती.

मुक्ताताई आपल्या जागेवरून फारशी उठत नव्हती हे खूप वेळाने लक्षात आलं. तिच्यासोबतच्या कार्यकर्त्याही काळजीत दिसत होत्या. मुक्ताताईच्या हातापायावर प्रचंड सूज आलेली दिसली. चेहरा ओढलेला दिसू लागला. गाणं म्हणताना धाप लागू लागली. तिला झोपुन रहावं लागलं. आम्ही आमच्याच तालात. पथनाट्यातल्या आपापल्या भूमिकेत. संवाद पाठ करणं, गाणी पाठ करणं, सराव....

दिल्लीचा कार्यक्रम जोरदार पार पडला. तिथे देशभरातून आलेल्या मैत्रिणींना भेटण्यात, तिथल्या व्यवस्थेत काम करण्यात, नव्या ओळखींमध्ये मुक्ताताई आपल्या तंबूमध्ये झोपून राहिलेली आहे हे लक्षात आले नाही. परतीच्या प्रवासात मात्र ती उत्साहाचा धबधबा असलेली मुक्ताताई हरवलीच होती.

लातूरला आल्यावर नंतर कोणाकडून तरी कळालं. मुक्ताताई फार दिवस नाही जगणार. किडनीच्या असाध्य रिगाने तिला पोखरून टाकलंय. मुळापासून हादरले हे कळाल्यानंतर. पण तिची पत्र तर खूपच नॉर्मल येत होती. सोलापूरच्या प्रवासात तिला भेटायला गेले. त्याच हजारमोगरी हास्यानं स्वागत केलं. घरी सासू सासरे, नवरा, दोन चिमण्या मुली, ही आपली बँकेतली नोकरी सांभाळून लेखनाचं आपलं काम करतच होती.

मनातली भिती, तिच्या मरणासंबंधी, गप्पांना विषय सुचू देत नव्हती. कामाच्या गोष्टी बोलून झाल्या होत्या. आता जेऊनच जायचं असं म्हणत ती सैपाकघरात गेली. मागोमाग मदतीला मीही गेले. फ्रीजवर अत्यंत किरकोळ वाटणार्‍या घरकामांची यादी दिसत होती. कुतुहल म्हणून बघायला गेले तर प्रत्येक खोलीनुसार ती यादी केली होती. ते बघून हसूच आले. ती ही हसली. पण आता मंद होत जाणार्‍या ज्योतीसारखं. ' माझी शक्ती नि वेळ फार फार जपून खर्च करायचाय गं. म्हणून हे होमवर्क '!

मी विषय बदलला. आम्हा सर्वांना चारीठाव रांधून तिने स्वतःची ताटली घेतली. त्यात एकच पदार्थ होता. उकडलेल्या बिनमिठाच्या कारल्याच्या फोडी ! आणि ते 'अन्न' ती गप्पा मारत हसत खेळत मिष्टान्न जेवल्यासारखे खात होती !

जेवणं झाली. तिच्या रूममध्ये जाऊन बसलो तर हिच्या हातात एक भरजरी साडी नि कात्री. ' थोरलीला भरतनाट्यमसाठी ड्रेस शिवून देईन म्हणाले होते. गेल्या आठवड्यात राहूनच गेलं." माझ्या मनात आकांत चाललेला होता. तो पोहोचला असावा तिच्यापर्यंत. मला हलकेच म्हणाली, " आपल्यामध्ये खूप शक्ती असते माया. नसते ती त्या शक्तीची आठवण. योग्य वेळी ती आठवण होणे महत्त्वाचे ".

शांत मनाने तिच्याकडून परत आले. नंतर आमच्या ओझरत्या दोन भेटी झाल्या. आणि एक दिवस फोन आला. ' ती गेली ' ! मी परीक्षेला निघाले होते. शेवटचा पेपर आज. मुक्ताताई गेली. अभ्यास चांगला झालाय. ती भेटणार नाही आता. चांगला लिहिला पाहिजे पेपर. संध्याकाळी मुक्ताताईची पत्रं पुन्हा एकदा नीट ठेवली पाहिजेत.

तसं म्हटलं तर आमचा प्रत्यक्ष सहवास काही तासात मोजता येईल. पण एखादा कोपरा उजळून जाण्यासाठी दिव्याच्या सहवासातला एक क्षणही पुरेसा असतो नाही का ? 'मुक्ता' आणि 'हजारमोगर्‍याचं हसणं ' या शब्दांचे अर्थ माझ्यापुरते बदलूनच गेलेत.

1 comment:

  1. Vaait vatale vaachun.. shevati Athavanina gheun pudhe jaave lagate.. Cherish memories of uvr time with Muktaa...

    ReplyDelete