Tuesday, 28 December 2010

" स्वप्ने किं दरिद्रता ? "

आजकाल कोणाशी आपल्या स्वप्नाबद्दल बोलतानाही फार जपून बोलावं लागतं ! स्वप्न म्हणजे रोज रात्री पडतात ती नाही हो.. स्वप्न म्हणजे ध्येय, भविष्यकाळ या अर्थाने म्हणतेय मी. मुळात स्वप्न पहतानाही अती प्रॅक्टिकल विचार करणारे लोक वाढतायत. शिवाय स्वप्नांना, महत्त्वाकांक्षेला आणि करियरला फक्त आणि फक्त पैशाशी जोडलं जातं ना ते खटकतं.
एखाद्या माणसाचं स्वप्न चाकोरीबाहेरचं असेल तर त्याकडे वेडेपणा म्हणून पाहिलं जातं.

साधेसुधे जगण्याचं स्वप्न बघणं चूक आहे का हो ? समजा आज मी आयटी मध्ये आहे. मला स्पर्धेचा तिटकारा आहे. निसर्गापासून माझ्या जगण्याची आजची शैली खूप दूर गेली आहे याचा मला त्रास होतो. मला शहरं आवडत नाहीत. मला यंत्रासोबत आणि यंत्रासारखं काम करायला आवडत नाही. मला एक 'रिसोर्स' म्हणून जगण्यापेक्षा एक माणूस म्हणून जगायचं आहे. पैसा कमावण्यापेक्षा माणसं कमवायला मला आवडतं. मोठ्ठा बंगला, अधिक चांगली आधुनिक गाडी, महागड्या शाळांमधून मुलांचे शिक्षण या माझ्या महत्त्वाकांक्षा कधीच नव्हत्या. म्हणून मी आज असं स्वप्न बघते की अजून काही वर्षांनी आपलं जगणं साधं असेल.

एक शेत असेल. त्यात स्वतःपुरतं पिकवता येईल. एक घर असेल ज्यात हक्काने चार मित्रमैत्रिणींना येऊन रहाता येईल, दिवसभर शेतात काम केल्यानंतर संध्याकाळी घरातल्या समृद्ध पुस्तकांसोबत श्रमपरिहार होईल. रात्र संग्रहातल्या निरामय गाण्यांसोबत, टिपुर चांदणं बघत झोपेल आणि सकाळ दिवसभराच्या कामाच्या ओढीने जागी होईल....हे महत्त्वाचं. कामाच्या ओढीने जाग येणं ! मला जगण्यासाठी काम करायचंय तर ते मला आवडलं पाहिजे. तरच मी अधिक आनंदात जगू शकेन.

नाही नाही, हे सगळं मला जगाला शहाणं करण्यासाठी, समाजसेवा, ग्रामविकसन वगैरे मोठमोठ्या गोष्टींसाठी नाहीच करायचं. मला निसर्गात रमायचं आहे. प्रत्यक्ष हातांनी काम करायचं आहे. मातीत बोटं रुजवायची आहेत. आणि हे सगळं निव्वळ स्वार्थी आनंदासाठी करायचं आहे.

मला माहितंय हे एवढं सोपं नाही. लहाणपणापासून घरात शेती, शेतकरी आणि त्यांच्यासमोरच्या समस्या बघत आले आहे. अगदीच सिनेमातली शेती बघून नाही बघत असली स्वप्नं ! पण निदान आजतरी मला त्या समस्या आत्ताच्या ताणतणावांपेक्षा, स्पर्धेत होणार्‍या दमवणुकीपेक्षा थोड्या सोप्या वाटतायत.

निसर्गाच्या जवळ असणारी माणसं जास्त आनंदी आणि निरामय असतात असं माझं निरीक्षण आहे. आज शेती करणारे माझे काके मामे हे त्यांच्याच वयाच्या नोकरदार काका मामांपेक्षा जास्त आनंदी वाटतात. पैसा कमी असून. कदाचित भौतिक गरजा कमी असल्यामुळेही !

तो एक वेगळाच विषय आहे. गरजांचा. त्यावर पुन्हा कधीतरी.

तर आज मी म्हणत होते. माझं स्वप्नं फार चुकीचं आहे का ? मग लोक हे ऐकल्यावर काळजी करणार्‍या चेहर्‍याने किंवा कोणातरी विक्षिप्त माणसाकडे ' आता याला कोण समजावणार ! ' या टाईपने किंवा " बरी आहेस नं तू ? " असा प्रश्न करत लग्गेच उपदेशाचे डोस पाजायला सुरुवात करतात. हे सगळं किती अव्यवहार्य आहे हे पटवून देऊ बघतात.
आणि सर्वात मोठी हाईट म्हणजे त्यांच्या १० मिनिटांच्या त्यांच्या मते पोटतिडिकीच्या बोलण्यानंतर मी गेली काही वर्षे विचार करून मग बघितलेलं स्वप्नं मी बदलावं अशी त्यांची अपेक्षा असते !
अशा लोकांना काहीही पटवायला जायचं नाही. एकच वाक्य म्हणायचं, " स्वप्ने किं दरिद्रता ? "

4 comments:

 1. मस्त लिहिलंय.. खूप आवडलं.. गावाला जाऊन शेती करत सुखाने जगावं असं माझंही स्वप्न आहे.. :)

  ReplyDelete
 2. धन्यवाद हेरंब :)
  असं स्वप्न खूप लोकांचं असतं ते जास्त लोकांशी बोललं गेलं तर लोक आपल्याला वेडं म्हणनार नाहीत :))

  ReplyDelete
 3. स्पर्धात्मक जीवनाची प्रतिक्रिया म्हणून आपण हे स्वप्न पाहिले आहे. पण स्पर्धा टाळणे आपल्या हातात आहे हे आपण विसरता.

  ReplyDelete
 4. मायाजी,
  जबरदस्त ! धाडसी विचार !
  खुप दिवसांनी असे विचार वाचायला मिळाले. .

  कुठल्याही संवेदनशील माणसाला आतुन हलवुन सोडणारं, विचार करायला भाग पाडणारं आणि घरी सुबत्ता, खरी श्रीमंती असुनदेखील निव्वळ इतरांच बघुन, अनुकरण म्हणुण,अधिक पैसा, बाहेरच्या झगमगाटाकडे भूलुन शहरात येणार्‍या शेतकर्‍यांच्या नवीन पिढीला हे आपले विचार नक्कीच मनोमन पटणारे आहेत, अनेकांना असा निर्णय घेताना भक्कम पाठींबा देण्यास देखील हे विचार उपयोगी पडतील.
  शहराची ओढ सगळ्यांनाच आहे पण कालांतराने जीवनाच खरं महत्व, सुखाची व्याख्या कळल्यावर बहुतेकांचा भ्रमनिरास होतो, मग यातुनच अनेकजण गावाकडे परतताना दिसतात.

  ज्यांना जीवनाचा खरा अर्थ तुम्हाला नक्कीच समजला आहे, खुप प्रगल्भता लाभली आहे तेच अस लिहु शकतात अस मला वाटतं.
  तुम्हाला उपदेशाचे डोस पाजवणार्‍यांना जीवनाचा अर्थच कळाला नसेल, खरे सुख,आनंद नेमकं कशात आहे हेच कित्येकांना माहीत नाही.
  गांधीजीनी म्हंटलच आहे, खेड्याकडे च ला, त्या मागे असाच विचार असेल असं वाटतं.

  ReplyDelete