Friday, 24 December 2010

क्षण तो क्षणात गेला सखि हातचा सुटोनी...

"खजिना" चा अनुवाद करताना माझ्याजवळच्या खजिन्याचे विचार मनात येत होते. खरोखर प्रत्येकाजवळ फक्त त्याच्यासाठीचा अमूल्य खजिना असतोच असतो. खरंय हे. विशेषतः आपण निसर्गासोबत एकट्याने अनुभवलेले क्षण.... ते पुन्हा फिरून कधीच येणार नसतात. आणि ते तसे येणार नाहीत याची खूप वेळा आपल्याला जाणीवही नसते. नंतर उरते ती त्या अनुभवाची मनावर उमटलेली नक्षी. असे 'एकट्याचे क्षण' खरंच किती मूल्यवान ! त्या क्षणी त्या अनुभवाच्या संदर्भात झालेला आत्मसाक्षात्कारच असतो तो ! आणि एक साक्षात्कार त्याच क्षणी झालेला असतो " हे पुन्हा कधीच अनुभवणे नाही !"

खूप अवघड होतंय हे सगळं. काही अनुभव सांगते. सहजच.

मी लहान असताना मंजरथला सुटीत रहायला जायची. तिथे आमच्या घरापासून वर गावात जाणारा रस्ता नुसत्या दगडाच्या मोठमोठ्या शिळांनी तयार केलेला होता. उन्हाळ्यातल्या एका दुपारी खेळून परत येत असताना मी पडले. त्या शिळा एवढ्या तापलेल्या होत्या की पडून उठेपर्यंतच्या काही क्षणात माझ्या दोन्ही गुढग्यांवर दोन टपोरे फोड उठले होते. आणि मी न रडता काहीतरी समजल्यासारखी थक्क होऊन त्या रोजच्या पायाखालच्या तापलेल्या शिळेकडे आणि त्या फोडांकडे बघत तशीच उभी होते.

पहिल्यांदाच समुद्र बघत होते. गोव्यात. मस्त खेळ चालला होता. अचानक एका लाटेने मला ढकलले नि जणु काय आख्खा समुद्र माझ्यात शिरला. नाकात, तोंडात आणि डोळ्यात आकांत नुसता. त्याक्षणी भवताल नव्हताच माझ्यासाठी. होता तो फक्त समुद्र. पुढे कन्याकुमारी,ग्रीस्,स्पेन इथेही समुद्र भेटला. पण त्या 'आत शिरलेल्या' समुद्राने काही ओळख नाही दाखवली.

दिवेआगरला एकदा एकटीच फिरायला जाण्याचा शहाणपणा केला होता. अगदी टळटळीत दुपार. श्रीवर्धनहून सिक्स सिटरमध्ये कोळणींच्या सोबत दिवेआगरला पोहोचले. गणपतीचे दर्शन घेऊन समुद्राकडे निघाले. ब्रह्मदेवाचे देऊळ बघायचे होते मला. एका माडापोफळीच्या वाडीतून छोटीशी पायवाट समुद्राकडे जात होती. एखादा किलोमिटरचेही अंतर नसेल ते. जसजशी आत गेले तसतसा उजेड कमी होत गेला. आजूबाजूला केवळ पोफळी नि नारळाच्या बागा. माणूस काय पण कुत्रंही कुठे दिसेना. पावलं आपोआप वेगात पडू लागली. त्या बागांतून वाहणार्‍या वार्‍याचा आवाज मी जन्मात विसरणार नाही. त्यात बाजूला खुसफुस ऐकू आली म्हणून बघितले तर एक सापाचे पिलु आपली वाट शोधत होते. 'सळसळ' काय असते ते कळले मला.

हृषिकेशला बराच वेळ कडक उन्हातून चालत गेल्यावर पायांना झालेला गंगेच्या पाण्याचा तो गार स्पर्श !

पुरंदरला जाताना गडाच्या पायथ्याशी असलेली सुगंधित भाताची खाचरं..

जर्मनीत कलोन मध्ये र्‍हाईनच्या काठावरच्या एका लाकडी बाकड्यावर गाढ लागलेली झोप..

लातूर नांदेड रस्त्यावर एका ठिकाणी जांभळाची खूप झाडं होती पूर्वी. तिथे एका पावसात पाहिलेला जांभळांचा सडा...

पाऊस तर कितीतरी वेळा असा भिडलाय. सखी हरवली तेव्हा भांडला माझ्याशी. पण परक्या देशात एकटी नवर्‍याचं जिवावरचं दुखणं सांभाळत होते तेव्हा निर्जन रस्त्यावर मनातल्या अनंत भिती नि काळज्यांना या पावसाने अबोलपणे सोबत केली.

इटलीमध्ये मुरानो बेटावर फिरताना भवताली पाणीच पाणी दिसत होते. दूर कुठेतरी जमिनीचा तुकडा नि अजून दूर अंधुक दिसणारे आल्प्स
एवढेच काय ते 'दिसत' होते. एवढा वेळ आनंदात टंगळमंगळ करणार्‍या मनाने अचानक अस्वस्थतेच्या नदीत उडी मारली. देश आठवला, मातीचा वास आठवला, कडक भाजणार्‍या उन्हाचा स्पर्श आठवला आणि डोळ्यांना कधी धारा लागल्या कळालंच नाही.

स्वित्झर्लंडमध्ये अशाच एका पायवाटेने र्‍हाईनच्या दिशेने चालायला सुरुवात केली. कातरवेळ. सुंदर निर्जन पाऊलवाट. समोरच एक पडके चर्च आणि त्यावरची दिसणारी घंटा.... अचानक पायवाट थांबली. एका स्मशानात ! सगळीकडे थडगीच थडगी. माणसाची चाहूलही नाही. खाली नदी. आणि चर्चच्या घंटेने मोठ्या कर्कश आवाजात त्याचवेळी टोल दिले. भितीचा एक ओरखडा असा चर्रर्र्कन मनावर उमटला तो अजून दिसतो.

परवा जवळच्या मॉलमधुन घराकडे येत होते. भुरुभुरू बर्फ पडत होते. रस्त्यावर दोन दोन वीत साठलेल्या बर्फातून सामानाची गाडी ओढत चालत होते. वार्‍याची एक गार झुळुक आली नि त्यासोबर भुरभुरणारे बर्फ पूर्ण चेहर्‍याला स्पर्शुन निसटुन गेले. त्याक्षणी जाणवले. हे पुन्हा कधीच नाही. मैदानात उभ्या असलेल्या बर्फात बुडालेल्या गाड्या, चालणार्‍यांच्या पावलांनी तयार केलेली बर्फावरची पायवाट, फुलून लाल दिसणारे आभाळ नि त्याखाली केवळ बर्फ अनुभवणारी मी...हे पुन्हा कधीही नाही.

या सर्व आणि अशा अनेक अनुभवात मनाची पहिली प्रतिक्रीया असते वैताग ! पण जेव्हा मनात " हे पुन्हा कधीच नाही " असं येतं तेव्हा आपण भिडतो थेट त्या क्षणाला. ते अनुभवणं किती मोलाचं !
असे किती क्षण आपल्याला उजळून जातात. प्रत्येक अनुभवात मनाची अवस्था नेमकी कशी होती ते नाही सांगता येणार. कोणत्या भावनेनी मन व्यापलं होतं तेही नाही कळणार. पण शेवटी आठतंय ते वर्तमानाला अनुभवणं. भूतभविष्य विसरून..

मी तर केवळ निसर्गासोबतचे सांगितले. त्यात माणसांची भर घातल्यावर तर पूरच येईल.

पण खरंच ! असं वैतागलेल्या क्षणी त्या माणसासोबत तो अनुभव झेलताना मनात " हे पुन्हा कधीच नाही " असे आले तर वैताग कमी होईल का ? मनाला सांगून बघितलं पाहिजे.

1 comment:

  1. आपल्या हाती काय आहे याचा शोध आपण क्वचित् घेतो. बहुधा ते आपल्याला चुकून समजते.

    ReplyDelete