" अहाहा ! वॉव ! " नुकतेच फिरायला बाहेर पडलेले दास अस्वल नि वॉस कोल्हा आनंद आणि आश्चर्याने थक्क होऊन एकत्रच उद्गारले ! त्यांना क्षितिजावर एक अप्रतिम सुंदर रंगीबेरंगी इंद्रधनुष्य दिसले होते.
त्या सुंदर इंद्रधनुष्याकडे दास नि वॉस अगदी एकटक बघत राहिले. तेवढ्यात दास म्हणाला, " माहितंय तुला, त्या इंद्रधनुष्याच्या पायथ्याशी एक गुप्त खजिना असतो म्हणे ! "
" कोणता खजिना ? " वॉसने विचारले.
" मला नीट माहीत नाही. पण तो खूपच मूल्यवान असतो. ज्यामुळे आपण खूप खूप श्रीमंत होतो " दास म्हणाला.
तो खजिना शोधण्यासाठी ते दोघे इंद्रधनुष्याच्या दिशेने चालू लागले. त्यांच्या मनात फक्त त्या खजिन्याबद्दलचेच विचार येत होते. कसा दिसत असेल तो खजिना ? लहान असेल की मोठा ? कोणत्या रंगाचा असेल ?
तेवढ्यात त्यांना ओक वृक्षाखाली एक खारूताई दिसली. " अहा ! हा माझा खजिना ! माझा एकटीचा !! " असे म्हणत ती नाचत होती. दास आणि वॉस तिच्याजवळ जाताच ती ओरडली. " जा इथून ! तुम्ही माझा खजिना चोरू शकणार नाही ! पळा ! "
" पण हा खजिना नाही." वॉस म्हणाला " ही तर फक्त ओक ची फळं आहेत. "
" पण माझ्यासाठी हा खजिनाच आहे. " खार म्हणाली. " हे माझं हिवाळ्यातलं अन्न आहे. जेव्हा सगळीकडे बर्फ पडेल आणि झाडावर काहीच खाण्यासारखे रहाणार नाही तेव्हा मी ही वाळलेली फळं खाईन. यापेक्षा वेगळा कोणता खजिना असेल ? "
" आता आपण खराखुरा खजिना शोधायला जाऊया " दास म्हणाला. दोघे मित्र घाईघाईने पुढे निघाले.
लवकरच तिथून पुढे असलेल्या एका नदीजवळ ते आले. तेवढ्यात पाण्याजवळ वाढलेल्या गवतातून एक आई बदक बाहेर आले. आई मोठमोठ्याने हाका मारत होती. " सोनुल्यांनो... कुठे आहात तुम्ही ? माझा खजिना कुठे लपून बसलाय बरं ? "
दास आणि वॉस उत्सुकतेने पुढे गेले. त्यांनी आई बदकाला विचारले," तू खराखुरा खजिना शोधते आहेस ? "
" हो रे बाबांनो, माझी दोन पिल्लं कुठे लपुन बसलियेत त्यांना शोधतेय मी ! " आई बदक म्हणाले.
" ही बघा आली ती दोघे. " तिकडून दोन पिवळ्याधम्मक रंगाची दोन पिल्लं तुरुतुरू चालत आई बदकाजवळ आली. आईने त्यांना अलगद आपल्या पंखांखाली घेतले.
" असं मला न सांगता इकडेतिकडे जायचं नाही हं, मला मग तुमची खूप काळजी वाटते ! " आई पिलांना प्रेमळ रागाने म्हणाली.
" हा तुझा खजिना आहे ? " हे सर्व बघत असलेल्या दास ने विचारले. " निश्चितच हा माझा खजिना आहे " ! " या जगात मला सर्वात जास्त आवडणारी माझी पिल्लंच तर आहेत. दुसर्या कोणत्याही गोष्टीपेक्षा ती मला प्रिय आहेत. मग ती माझा खजिनाच नाहीत का ? " आई बदक
म्हणाले आणि आपल्या पिलांसोबत नदीकडे निघून गेले.
दास आणि वॉस तसेच पुढे निघाले. इंद्रधनुष्याच्या पायथ्याशी असलेला खजिना मिळवण्याची त्यांना आता खूप घाई झाली होती. समोर एक उंच टेकडी लागली. कसेबसे रांगत, धडपडत ते टेकडीच्या माथ्यावर गेले तर तिथे त्यांना एक म्हातारा ससा दिसला.
" हॅलो मुलांनो, इथे कसेकाय आलात तुम्ही ? " सशाने विचारले. " आम्ही इथे एका खजिन्याच्या शोधात आलोय. " दोघेही एका आवाजात म्हणाले.
" ओह्ह ", ससा उद्गारला. " तो तर माझ्याकडे खूप खूप आहे " ससा म्हणाला.
" खरंच ? कुठे आहे मग तो खजिना ? " दास आणि वॉस ने विचारले.
" इथे आहे " सशाने आपल्या डोक्याकडे बोट दाखवले. " माझ्या आठवणी माझा खजिना आहेत. त्या मला खूप खूप आनंद देतात " हसून ससा म्हणाला.
" आठवणी म्हणजे काय ? " दास ने विचारले.
" आठवणी म्हणजे अशा गोष्टी ज्या तुम्ही पूर्वी कधीतरी केल्या, जी ठिकाणे तुम्ही पाहिली, जे मित्र तुम्हाला खूप आवडायचे, ज्या गमतीजमती तुम्ही केल्या ते सर्व..... " " आज तुम्ही जे साहस करताय नं त्याची पण नंतर एक आठवण राहील. तेव्हा मजा करा पोरांनो.. "
हो.. असे म्हणत दोघे पुढे निघाले नि अचानक घसरून टेकडीच्या माथ्यावरून थेट पायथ्याशी पोहोचले !
एव्हाना आभाळ ढगांनी भरून आलं होतं. सगळीकडे अंधारलं होतं. इंद्रधनुष्य तर अदृश्यच झालं होतं. पावसाला सुरूवात झाली. टप्पोरे थेंब पडू लागले. हळूहळू पाऊस खूप जास्त पडू लागला. आता दोघांनीही आसरा शोधला.
" आता आपण आपला खजिना कधीच शोधू शकणार नाही ! " दास दु:खाने म्हणाला. पाऊस थांबण्याची वाट बघत ते दोघे झाडाखाली शांत बसून राहिले. आज दिवसभरात घडलेल्या गोष्टी दोघांनाही आठवू लागल्या. खार आठवली. जी पोटभर खायला मिळणार म्हणून खूप आनंदात होती. आई बदक आठवले. जे आपल्या पिलांवरच्या प्रेमाने खूप समाधानी होते. म्हातारा ससा आठवला. जो केवळ आठवणींमुळे खूप आनंदी राहू शकत होता. प्रत्येकाजवळ फक्त त्यांचा स्वतःचा असा खजिना होता. ते सोनंनाणं नसेलही कदाचित, पण जे काही होतं त्यावर त्यांचं खूप प्रेम होतं. त्या गोष्टी त्यांच्यासाठी जगात सर्वात अधिक मूल्यवान होत्या. त्या त्यांना आनंद देत होत्या.
" तूच तर आहेस माझा खजिना ! " टुण्ण्कन् उडी मारत दास वॉसला म्हणाला.
" आणि तू माझा खजिना ! " वॉस गिरकी घेत आनंदाने ओरडला. आणि ते नाचू लागले. हसू लागले. अगदी दमेपर्यंत !
शेवटी पाऊस थांबला नि स्वच्छ सूर्यप्रकाश पसरला. दोघे मित्र आपापल्या घराकडे निघाले. त्यांच्या मागे दूरवर क्षितिजावर एक नवे इंद्रधनुष्य उगवले होते. पण या दोघांनाही ते बघण्याची गरजच भासली नाही.
No comments:
Post a Comment