Thursday, 23 September 2010

रसिया मुठिया

सध्या एका गुजराती मैत्रिणीच्या सासूबाई बेल्जियम भेटीला आल्या आहेत. या गुजराती सुगरणीच्या हातचा एक पदार्थ परवा खाल्ला. चटकन होणारा , रुचिपालट म्हणून चविष्ट आणि रसदार असा हा पदार्थ माझ्या सर्व खवैय्या मित्रमैत्रिणींसाठी -
सामग्री -
शिजवलेला भात - २ कप ( दुपारचा उरलेला असेल तर अजून उत्तम )
बेसन - अर्धा ते पाऊण कप
ताक - ५ ते ६ कप
आले लसूण पेस्ट - २ चमचे
लाल तिखट - १ चमचा ( आवडीनुसार कमीजास्त करा)
हळद - अर्धा चमचा
हिंग , मोहरी, जिरे, कढिपत्ता, तेल फोडणीसाठी
अर्धा चमचा साखर, एक चमचा तूप

कृती -
एका कढईत तेल गरम करा. त्यात जिरे, मोहरी घाला. मोहरी तडतडल्यावर एक चमचा आलं लसूण पेस्ट व कढिपत्ता घाला. थोडी हळद आणि लाल तिखट घाला.वरून चमचाभर बेसन ताकात मिसळून ते फोडणीत घाला. गॅस बंद करून टाका.
आता मुटक्यांसाठी भात घ्या. त्यात उरलेलं बेसन, आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, मीठ आणि चिमुटभर हिंग घाला. हाताला थोडे तेल लावून हे मिश्रण चांगले मळून घ्या. त्याचे मुटके वळता यावे एवढे मऊ मळून घ्या. प्रत्येक वेळी हात पाण्यात बुडवून मुटके वळून घ्या.
कढई ठेवलेला गॅस चालू करा. फोडणी घातलेले मिश्रण चांगले उकळू लागले की त्यात हळू हळू एकेक मुटका सोडा. मुटके सोडल्यावर न हलवता कढईवर झाकण ठेवा.
जेवणाची तयारी करा. ५ मिनिटात मुटके शिजून वर आलेले दिसतिल. त्यात अर्धा चमचा साखर आणि चमचाभर तूप घाला.असेल तर कोथिंबिर पेरा. एका वाडग्यात तयार रसिया मुठिया घ्या. वर अजून एक चमचाभर तूप घ्या आणि खा.



ज्यांना कढीभात आवडतो त्यांना हा पदार्थ नक्की आवडेल. तुमच्या प्रतिक्रीया भलानी मावशींना कळवतेच :)

No comments:

Post a Comment