Monday, 13 September 2010

नॉर्वेच्या दरीखोर्‍यातून.... भाग अंतिम

सकाळ पावसात उजाडली. आजच्या प्रवासाला ' मजल दरमजल ' हे एकच नाव शोभले असते. भुरभुर पावसात बर्गन ला टाटा केले नि रेल्वेने जाऊन पोहोचलो वॉस ला. दोन बाकडे नि एक कॅफे असलेले नि एक कॅफे असलेले हे स्टेशन. एका बाजूला तळे नि तळ्याशी लगट करत रांगणारा रस्ता मग उगाच खोडकरपणे वर डोकं काढणारी एक टेकडी नि त्यावर उतारावर सरळ उभे रहाताना होणारी त्रेधातिरपिट दिसू न देण्याचा प्रयत्न करत असलेली घरे ! आणि आमचे सोबती.. रेल्वेचे रूळ ! एक मस्त झोका घेत वळणावर नाहीसे होत जाणारे... ! अवघ्या पाऊण तासात अजून काय काय बघायचं माणसानं !

VOSS

VOSS

आता पुढचा टप्पा बसचा. हे पण डायवर मामा आज खुषीत दिसत होते. बस चटकन भरली नि निघालीसुद्धा. आता जायचंय गुडवांगनला. एक प्रवासी गट वाटेत एका रिसॉर्टला उतरणार होता. ते रिसॉर्ट आले नि तिथे उतरणार्‍या, राहाणार्‍या लोकांबद्दल अगदी तीव्र असूया मनात दाटून आली. हे ठिकाण आपल्याला का नाही सुचले म्हणून स्वत:वर चिडचिडही झाली. ती जागाच तशी होती. एका डोंगराच्या अगदी कड्यावर ते हॉटेल बांधलेले होते. चहू बाजूंनी डोंगररांगा, समोर खोलच खोल दरी, आणि यावर कडी म्हणून त्या दरीत कोसळणारा प्रचंड धबधबा !

dhabdhaba

तेवढ्यात आमच्या चालकरावांनी सांगितलं की म्हणे क्यामेरे तयार ठेवा. पण सीटबेल्ट बांधून जागेवरच बसून रहा. फोटो काढण्यासाठी उभे वगैरे राहू नका. नियम पाळण्याच्या बाबतीत आपण एकदम भारी. तस्सेच केले. बस थोड्या कच्च्या वाटणार्‍या रस्त्यावरून पक्क्या पण अगदी अरुंद रस्त्यावर आली. सगुणाचं एक खेळणं आहे. नागमोडी घसरगुंडी. त्याच्या डो़क्यावरून आपण कार किंवा बस सोडायची..दोन सेकंदात सुळ्कन खाली घसरत येते. हा रस्ता तस्सा होता ! आता आमची बस पण तशीच सुळ्कन खाली गेली नाही म्हणजे बरे ! आपल्या कर्नाटकातले ऊटी, कोडाई वगैरे रस्ते आधी अनुभवले होते म्हणून बरं. नाहीतर रामरक्षा कधीच सुरु झाली असती !

valan

हेअरपिन का काय म्हणतात तशा वळणावरून बस तुरुतुरू चालली होती. शेजारी धबधबा दिसत होता. फोटो काढण्यासाठी कुणी हौशी उठला की चक्रधारी ( हो, आता या क्षणाला ते सारथी, चक्रधारी सगळे होते!) समोरच्या आरशातून एक मिश्किल कटाक्ष टाकायचे. आणि बहुतेक आरशातून आपल्याकडे बघण्याच्या नादात सर्वांना एकत्र मोक्ष मिळू नये या भितीनेच हौशी खाली बसायचा. दुसरे वळण आले की पुन्हा फोटोंची घाई व्हायची. चालकराव कथा सांगू लागले. हा पक्का रस्ता बनायच्या आधी म्हणे हिवाळ्यात बर्फ पडलेले असतानाही जिवाची बाजी लावून बस चालवावी लागायची. समोर दरीत एक छोटीशी वस्ती दिसत होती. आणि काही शेतंही !

dari

आम्हाला त्या तिथे पोहोचायचे होते. अगदी काळजीपूर्वक सावकाश चालत बस पोहोचली. समोरचे दृश्य जादूई होते. उंच डोंगराच्या माथ्यावर ते आम्ही पाहिलेले रिसॉर्ट मुठीएवढे दिसत होते. आम्ही जिथे उतरलो तिथे केवळ एक बोटीचा धक्का होता. आणि एक पूल. सरोवराचा सर्वात चिंचोळा भाग हा. इथे मोठी जहाजे येऊच शकत नव्हती. एका छोट्या फेरीने आम्ही पुढ्चे साडेतीन चार तास प्रवास करून फ्लाम गावी पोहोचणार होतो.

gudvangan

हा प्रवास मला सर्वात जास्त आवडला. छोट्याश्या बोटीवर शंभर माणसं असतील. दोन्ही बजूला उत्तुंग पहाड आणि त्यावरची खेडी. मन वारंवार त्या भागात चिकाटीनं नि जिद्दीनं राहाणार्‍या लोकांना प्रणाम करत होतं. नॉर्वे सरकारला सलाम करत होतं. या गावांच्या अगदी जवळून आम्ही जात होतो. त्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनाच्या पाकळ्या समोर दिसत होत्या. एक त्यातल्यात्यात मोठं गाव लागलं. तिथे म्हणे आजुबाजूच्या वस्त्यांवर राहाणार्‍या मुलांसाठी १०० वर्षांपूर्वी शाळा सुरू झाली. एक गाव फक्त मृत लोकांचे ! म्हणजे आजूबाजूच्या गावातून अंत्यविधीसाठी तिथे जायचे. मध्येच एक सोनेरी पाकळी दिसली. अवघी ५ घरं असणार्‍या एका गावच्या (?) धक्क्याला आमची फेरीबोट उभी राहिली. खाली सायकलरिक्षासारख्या एका गाडीत पोस्टमन काका उभे होते. फेरीवरून एक पार्सल खाली फेकलं गेलं नि त्यांनी ते झेललं. हे सगळं समोरच्या घरातली सत्तरीच्या घरातली आजीबाई बघत होती. पोस्टमन काकांनी तिला तिथनच हात उंचावून बहुतेक पत्र दाखवले. म्हातारी अक्षरशः दिव्यासारखी हसली! तिने आत जाऊन एक चिमुकला रुमाल आणला नि आमच्या फेरीकडे बघत फडफडवला ! वाट बघणं आणि ती फळाला येणं एवढं सुंदर 'दिसू' शकतं ? तिचा आनंद त्या रुमालाने आमच्यापर्यंत किती सहज पोहोचवला..

post

इकडे फेरीमध्ये वेगळीच गंमत घडत होती. कॅफेमध्ये एकाने (बहुदा मालकाने), आम्हाला भारतातून आलात का असे विचारले. म्हट्लं हो. मग म्हणे कुठून. म्हटलं मुंबईजवळून. म्हणे पुणं माहीतय का ? आँ.. हो असे म्हटल्यावर म्हणे वाई माहितंय ?? थक्क झालो आम्ही. हा बाबा कधीकाळी वाईमध्ये गरवारे मध्ये काम करत होता म्हणे ! त्या आनंदाप्रीत्यर्थ त्याने आम्हाला उकळलेला चहा दिला !
त्याला विचारले की फ्लाम चे रेल्वे स्टेशन बोटीच्या धक्क्यापासून किती दूर आहे ? त्यावर काय बावळट लोक आहेत असा चेहरा करून तो म्हणाला," अरे बाबांनो तुम्ही फ्लाम ला जाताय न्युयार्कला चालल्यासारखं काय विचारताय ? फ्लाम हे गाव मुळी काही मीटर्स मध्ये मोजतात! "
फ्लाम आलं. एक अजस्त्र बोट तिथे उभी होती. त्यापेक्षा प्रत्यक्ष गाव कितीतरी लहान होतं. इथे तास दीड तास वेळ होता. सगळीकडे हिरवाई, स्वच्छ प्रकाश आणि निर्मळ पाणी दिसत होते.

flam

flam

आता पुढचा टप्पा रेल्वेचा. जगातल्या सर्वात सुंदर रेल्वेपैकी एका रेल्वेची आम्ही वाट बघत होतो. ही रेल्वे म्हण्जे नॉर्वेच्या इतिहासातलं एक अत्यंत कौशल्याचं आणि धाडसाचं पान. समुद्रसपाटीपासून २ मीटर वरून ही रेल्वे तासाभरात ८६६ मीटर वर असणार्‍या मिरडाल या गावी नेते. २० कि.मी. चा हा रेल्वेमार्ग बांधायला २० वर्षे कष्ट घ्यावे लागले. १९२० साली सुरू झालेले हे काम १९४० ला पूर्णत्वास गेले. १९४४ साली तेथे पहिली विजेवर चालणारी रेल्वे सुरू झाली तर १९४७ साली वाफेवरील इंजिनाची शेवटची रेल्वे धावली. २० लांबलचक बोगद्यांपैकी १८ बोगदे हे मजुरांनी हातांनी खणले. हे बोगदे सहा सहा कि. मीटर्स लांबीचे आहेत ! पैकी एक बोगदा डोंगरातच १८० अंशाच्या कोनात वळतो ! किती साहस नि किती कौशल्य पणाला लागले असेल हे बांधताना. या मार्गावरून जाताना "रारंगढांग" मनात येत होतं.

flambana

या मार्गावर नॉर्वेमध्ये इतरत्र न दिसणारी दुर्मिळ निसर्गदृष्य बघायला मिळतात. या जंगली, भीषण आणि तितक्याच तजेलदार निसर्गाभोवती इथे उगाच गूढतेचे वलय असल्याचे भासते. कदाचित "मिस्टेरियस" हा शब्द वारंवार गाईडच्या तोंडी येत होता म्हणून असेल असे वाटले. आणि या फ्लामबानारेल्वेने अजून एक अविस्मरणीय अनुभव दिला.
एका प्रचंड धबधब्यासमोर रेल्वे थांबली. सगळे प्रवासी फोटो काढायला खाली उतरले. ही लगबग चालू असताना संपूर्ण आसमंत कसल्याश्या गोड संगीताने भारून गेला. समोर धबधब्याची गाज, गर्दी असूनही संगीत वातावरणात भिनले. धबधब्याच्या मध्येच एका कातळावर कुठूनशी एक रक्तवर्णी वस्त्र ल्यायलेली एक सुंदरी प्रकट झाली ! त्या संगीतातले शब्द कळत नव्हते पण सुरांची भाषा मात्र खूपच जवळची.. ती निश्चितच एखादी विराणी गात होती. मध्येच गायब व्हायची नि खूप अंतरावरच्या एका दुसर्‍या कातळावर दिसायची. शुभ्र पाण्याच्या पार्श्वभूमीवर ही केवळ आकृती दिसत होती. तिचे नृत्य तिची विरहगाथा सांगत होते. काही काळ काळाची पावलं तिला बघण्यासाठी, तिची व्यथा ऐकण्यासाठी जणू स्तब्ध झाली होती. कधीकाळच्या आणाभाकांना साक्षीदार असेल ते पाणी. आज मात्र त्या विरहिणीच्या व्यथेतले पाणी त्या उदंड पाण्यापेक्षा जास्त ठळकपणे दिसत होते.

dhabdhaba

baai

समाधी भंगली ती रेल्वेने बोलावल्यामुळे. पुढचा टप्पा लवकरच संपला. रेल्वेने आम्हाला मिरडाल ला सोडले. आता शेवटचा टप्पा होता मिरडाल ते ओस्लो. हा संपूर्ण प्रवास डोंगरावरच्या पठारावरून होता. वाटेत ठिकठिकाणी हायकिंग, ट्रेकिंग साठी येणारे गिर्यारोहक दिसत होते. एक तर सायकलपटुंचा गट दिसत होता. लांबवर ग्लेशियर्स आणि तिथे पोहोचण्यासाठी निघालेले; संध्याकाळ झाली म्हणून तंबू टाकून तळ ठोकलेले लोकही दिसत होते. ठिकठिकाणी हॉलिडे होम्स च्या पाट्या दिसत होत्या.

glaciers

एक अचानक लक्षात आलं; इथे आजूबाजूला पर्वतरांगा नव्हत्या. कारण आम्ही खुद्द त्या पर्वतांच्या डो़यावरून रेल्वेने प्रवास करत होतो !
रेल्वे आता खाली उतरू लागली. मन आणि शरीर दिवसभराच्या नव्या नव्या अनुभवांनी शिणले होते. किती प्रवास झाला आज ! सकाळी आठ ते रात्री साडेदहा आम्ही वाहानं बदलत बदलत प्रवासातच होतो. रेल्वे, मग बस, मग फेरी, मग पुन्हा रेल्वे नि शेवटी अजून एक रेल्वे ! दिवसभर जाणवले नाही पण आता हा विचार करतानाही दम लागत होता. बाहेर संधीप्रकाशात अजूनही निसर्ग नटलेला दिसत होता. पण आता या क्षणी जगातले काही सुंदर बघायचे राहिले आहे असे वाटत नव्हते.

matha

matha
ओस्लो ला साडेदहाला उतरलो. खायला शाकाहारी मध्ये केवळ कोरडे सॅंडविच मिळाले. खाऊन पुन्हा तासभर रेल्वेने जाऊन विमानतळावर पोहोचलो. आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजे वेटिंग एरिया असणार असे गृहित धरले होते. पण तसे इथे काहीच नव्हते. नाही म्हणायला सहा बेंचेस सापडले. आमचे विमान सकाळी सहाला होते. आमच्यासारख्या लोकांनी आपली सोय शोधली होती. त्या आवारात असणार्‍या रात्री बंद झालेल्या कॅफे मधील कोचावर जाऊन बसलो. रात्र सरली. पाच वाजता चेक इन केले. आता मात्र विमानात गर्दी होती. विमान उडाले. उंचावरून दिसणारे नॉर्वे पुन्हा एकदा डोळ्यात भरून घेतले. स्मृतीत कोरून घेतले. डोंगराच्या कपारीत चार दिवसांसाठी मुक्कामाला राहिलेले पक्षी घरट्याकडे परत जाताना त्या पर्वतांना काय बरं वाटत असेल ?

3 comments:

  1. स.न.वि.वि .
    तुमच्या लेखनात जो टच आहे त्यातून जागेचे फील येते ते अफाट आहे.
    अन जोडीस मानवी मनाची जी जाण आहे त्यामुळे दुग्धशर्करा योगच वाटतो.
    परिचय वाढला तर आनंद होईल.
    मी निवृत्त आहे व सध्या लेक्चरर आहे कॉलेजात.
    rupadhye@gmail.com

    ReplyDelete
  2. खूप छान. मी नॉर्वे मध्ये २ वर्षे राहिलो आहे.

    ReplyDelete