बर्याच दिवसांपासून एखाद्या बेल्जियन शेतावर जाण्याची ईच्छा होती. आमच्या एका डच मित्राच्या कानावर घालून ठेवले होते. एका दुपारी पॅट्रिकचा फोन आला की शनिवारी दुपारी ४ ते ५:३० अशी एका शेतकर्याची वेळ मिळाली आहे. मनात आले, शेतकर्याची अपॉइन्टमेन्ट म्हणजे फारच झालं! असेल बुवा इथला शेतकरी घड्याळावर चालणारा. गावाकडे शेतकर्याकडून तीनच वेळा ऐकलेल्या: सकाळ, दुपार, संध्याकाळ.
तसा पॅट्रिकही आमचा नवा मित्र आहे. तो आम्हाला त्याच्या वाहनाने शेतावर घेऊन जाणार होता. या लोकांना भेट म्हणून काय घेऊन जावे असा प्रश्न पडला. वाईन मधले काही कळत नाही, शेतकर्याला फुलं काय भेट द्यायची, म्हणून उत्तम बेल्जियन चॉकलेट्सचे दोन पुडे आणि घरी केलेली नारळाची बर्फी घेतली.
ठरल्या वेळी पॅट्रिक आला. त्याच्या घरून त्याच्या बायकोला, रोसिताला घेतलं आणि निघालो. पॅट्रिकने सांगितले की हा शेतकरी त्याचा मित्र वगैरे नाही. पण दरवर्षी उन्हाळ्यात ताजे अॅस्पेरगस घेण्यासाठी हे लोक त्यांच्या शेतावर जातात. लूक आणि इंगं हे ते जोडपं. त्यांना केवळ डच बोलता येतं. मला डच येतं पण शेतकरी डच बोली कळेल की नाही शंकाच होती. पॅट्रिकच्या अनुवादकौशल्यावर भिस्त होती.
मनात सासर-माहेरची शेती दिसू लागली. आपले शेतमजूर शेतात काम करतानाची चित्रं येऊ लागली. दूध-दुभतं, धान्याची कोठारं, असं चित्र असणारं श्रीमंत शेतकरी आणि त्याचवेळी अत्यंतिक दारिद्र्याने पिचून गेलेले शेतकरी आटवू लागले.
इकडच्या शेतकर्यांची स्थिती आपल्याएवढी वाईट नाही पण फार चांगलीही नाही. वर्षभर शेतमालाला चांगला भाव मिळावा म्हणून सरकारशी भांडणं चाललेली असतात असे पॅट्रिकच्या बोलण्यातून कळाले. त्याची एक झलक मागच्या वर्षी टीव्हीवर बघितली होती. दुधाला योग्य भाव मिळावा म्हणून दूध उत्पादकांनी खूप प्रयत्न केले. शेवटचा उपाय म्हणून त्यांनी एक मोर्चा काढला. मिडियाला बोलावले आणि आपल्या मागण्या नोंदवत सरकारचा निषेध करत लाखो लीटर दूध एका मैदानात ओतून दिले!
इथे शनिवार बाजारात शेतकरी शहरवसियांपेक्षा वेगळे दिसत नाहीत. आम्ही खरेदी करतो त्या बहुतेक भाज्या व फळं हॉलंड व जर्मनीतून आलेली असतात. आजूबाजूच्या डच लोकांना विचारलं इथे काय पिकतं? बहुतेकांना फक्त मका आणि टोमॅटो एवढंच माहित असतं. पण बाजार तर विविधरंगी असतो. मग इथला शेतकरी पिकवतो तरी काय? खूप उत्सुकता होती.
गाडी एका छोट्या रस्त्यावरून अजून एका छोट्या रस्त्याला लागली आणि एका मोठ्ठ्या गोडाऊनसारख्या दिसणार्या इमारतीपाशी उभी राहिली. खाली उतरल्याबरोबर शेणामातीच्या वासानं एकदम घरगुती वाटू लागलं. एक कुत्रा उड्या मारत आमच्याकडे आला. पाठोपाठ त्याचे मालक-मालकिण. लुक असेल पस्तिशीचा आणि इंगंही साधारण तेवढीच. कडेवर एक चार वर्षांची मुलगी रोमी.
हसतमुख आणि प्रसन्न दिसणार्या या कुटुंबाकडे बघून परकं वाटलं नाही. दोघांनीही पायात रबरी बूट घातलेले होते. विटक्या पँट आणि मळक्या स्वेटरवर गवताच्या काड्या चिटकलेल्या होत्या. दोघंही लाजरेबुजरेच दिसत होते. कोणीतरी परदेशी पाहुणे शेतावर येण्याची पहिलीच वेळ असल्याचे जाणवत होते. लुकने ओळख झाल्याच्या दुसर्या मिनिटाला गाईडच्या भूमिकेत प्रवेश केला. हवापाण्याच्या गप्पा नाहीत, की हापाप कपाचा आग्रह नाही, की डेर्यातले पाणी नाही!
रोसिता आणि इंगं बर्याच दिवसांनी भेटल्याने गप्पा मारू लागल्या. 'रीतीप्रमाणे' लुक पुरुषांबरोबर पुढे गेला आणि मागे आम्ही तीन बायका रमतगमत चालू लागलो.
समोर एक गोडाऊन सारखे बांधकाम दिसत होते. तो होता गोठा. गाय स्पेशल. त्याला लागून दोन छोट्या खोल्या. तिथे दूध काढण्याची जागा. मग एक मोठे पार्किंग. त्यात अवाढव्य आकाराचे दोन ट्रॅक्टर, खत फवारणी यंत्र, पेरणी यंत्र, गवत कापायचे यंत्र, नि काय अन् काय. त्याला लागून या कुटुंबाची रहाण्याची जागा. त्याच्या डावीकडे अजून दोन प्रचंड गोठे. एक वासरू स्पेशल आणि एक गाभण गाय स्पेशल. यात एका बाजूला घोडे. मागच्या बाजूला चौथा गोठा - बैल स्पेशल! एकूणच आम्ही शेतकरी + गवळी मित्राकडे आलो होतो तर!
पहिल्या गोठ्यात गेलो. लुक माहिती सांगू लागला. त्याच्याकडे एकूण ८० गायी, १०० वासरं, आणि २० बैल आहेत. सर्वांच्या कानाला त्यांचा बिल्लानंबर टोचलेला. आपल्यासारखी हरणी, ढवळी, चांदी, बुधी, मंगळी, कपिला, लाल्या, पवळ्या असली नावांची भानगडच नाही. एका रांगेत नीट बांधलेल्या त्या ८० गायी - सगळ्या सारख्याच दिसत होत्या मला! पुढ्यात टाकलेले गवत चघळत निवांतपणे मनुष्यप्राण्याचे निरीक्षण चालू होते. हा गोठा हिवाळ्यात गरम करतात. गायींच्या डोक्यावर आढ्याला कसल्याच्या झाडाच्या फांद्या टांगल्या होत्या. सध्या कुठल्यातरी त्वचारोगाची साथ चालू आहे म्हणे. त्या पाल्याने ते इन्फेक्शन वाढत नाही.
अजून एक माहिती मिळाली ती अशी - एक गाय दिवसाला ३० ते ४० लीटर दूध देते. ते एका कंटेनरमध्ये साठवतात.
दर तीन दिवसांनी ते विक्रीला पाठवतात. ३० युरो सेंट प्रतिलीटर असा सध्या भाव मिळतो. (आम्ही दूध घेताना ते ६८ ते ७० युरो सेंट प्रतिलीटर मिळते). या गायी वर्षाचे ५ महिने शेतात जाऊन चरतात. इतर महिने गोठ्यातच बांधलेल्या असतात. जनावरांसाठी लागणारा चारा शेतातच पिकवितात. साधारण २ फूट वाढणारं गवत असतं. ते कापून, बारीक करून, प्रेस करून त्याच्या पेंड्या करून ठेवतात. वर्षातून ४ वेळा ही गवतकापणी होते. वर्षातून एक पिक मक्याचं. मका तोडून उरलेली धांडं ट्रॅक्टरखाली दाबून, चुरून गवतात मिसळायचे. त्याचे पाऊस व बर्फात रक्षण करायचे. हे गुरांचं हिवाळ्याचं खाद्य.
खूप साध्या लाजाळू लुकच्या मालकीची सव्वादोनशे एकर शेती आहे हे कळाल्यावर आ वासून बघतच राहिलो आम्ही. अगदी ५०-६० एकर शेती असणार्या शेतकर्यांचा ५-६ गडी, २०-२५ बाया, ४ बैलजोड्या, १०-१२ गायी यांच्या जोरावर चालणारी 'जमीनदारी' आपल्याकडे खूप अनुभवलेली आहे. इथे एवढं शेत आणि गुरं केवळ ही दोघं पती-पत्नी आणि लुकचे ७२ वर्षांचे वडिल सांभाळतात हे ऐकून थक्क झाले.
रोसिता आणि इंगंच्या गप्पांमध्ये मीही हळूच सामील झाले. रोसिताला इंग्रजी येत नाही. मला इंगंच्या वेगळ्या उच्चारांमुळे एक एक शब्द हळू हळू समजवून घेत बोलावे लागत होते. मला तिने विचारले की, तुझ्याकडे आहेत का गायी? मी आपल्याकडच्या सिस्टीमची माहिती दिली. बैल शेतात काम करतात हे ऐकून ती म्हणाली, क? तुम्ही खात नाही? मग शाकाहारावर एक भाषण दिलं!
बोलता बोलता वासरांच्या गोठ्यात आलो. २ दिवसांची २ वासरं होती.
एकूण एक महिना ते एक वर्ष वयाची ६० वसरं होती. पण कालवडी एकीकडे नि गोर्हे एकीकडे. इंगं म्हणाली - मला गोर्हे झालेले आवडत नाहीत. का ते ५ मिनिटांत कळणार होते.
६ गाभण गायी ज्या अठवडाभरात एक्स्पेक्टेड होत्या, त्या वेगळ्या बांधलेल्या होत्या. शेजारीच उत्तम जातीचे ४ घोडे तबेल्यात होते. शेतावर रपेट मारण्यासाठी हे घोडे.
फॉन्सचा - लुकच्या वडिलांचा - या घोड्यांवर भारी जीव. स्वतः जातीने या घोड्यांची निगा राखतात. आम्ही ते बघत असताना ठेंगणीशी, गोड मार्गारेटआजी आली. मला डच येतं समजल्यावर तिचा बोलण्याचा धबधबा कोसळू लागला. त्यातले केवळ काही शब्दच मला कळत होते. पण एवढे कळाले की ती आपल्या नवर्याचे नि मुलाचे खूप कौतुक करत होती.
सूनबाई मात्र सासूबाईंसमोर गप्प झाली. होती. "जाण्यापूर्वी माझ्याघरी नक्की या हं" असे आजीने म्हटल्यावर प्रकाश पडला. इथेही मातीच्या चुली!
आता आम्ही बैलांच्या गोठ्याकडे निघालो. तिथे जे दृष्य दिसले ते फारच अस्वस्थ करणारे होते. २०-२५ बैल लोखंडी जाडजूड कुंपणाच्या आत बांधलेले होते. अस्ताव्यस्त गवत पसरलेले. घोंगावणार्या माश्या आणि बैलांसाठी ठेवलेल्या कुठल्यातरी 'पौष्टिक' खाद्याचा नकोनकोसा वास. सव्वा ते दीड वर्षाचे गोर्हे इथे आणून बांधतात ते बाहेर काढतच नाहीत. त्याला वावरायला १० बाय १५ ची जागा असते. तेवढीच काय ती हालचाल. दोन वर्षांचा होईपर्यंत त्याला चरबी वाढवणारे खाद्य खाऊ घालतात. ८०० ते १००० किलोचा बैल कापण्यासाठी विकायला पाठवतात. हे बैल रग न जिरल्याने प्रचंड आक्रमक असतात. त्यामुळे गवत टाकण्यापासून गोठा साफ करण्यापर्यंतची सगळी कामं यंत्राने १० फूट अंतरावरून केली जातात. 'मला गोर्हे झालेले आवडत नाही' या वाक्याचा अर्थ आता लागला.
वासरं जन्माला येण्यासाठीतरी बैल गायी एकत्र येत असतील असे वाटले. तोही भ्रम निघाला. सगळा इन्जेक्शनचा कारभार. इकडून बीज काढून तिकडे इन्जेक्ट करायचं. सगळच विचित्र!
जन्मलेल्या प्रत्येक वासराची नोंद ब्रुसेल्सच्या कार्यालयात करावी लागते. मग त्या वासराचा पासपोर्ट तयार होतो. गुरांच्या खरेदी - विक्रीत हे पासपोर्ट अनिवार्य असतात. त्यात चुका झाल्यास शेतकर्याला दंड भरावा लागतो.
गुरं बघून झाली आता शेत बघायला निघालो. समोर प्रचंड शेत पसरले होते. सगळीकडे गवत होते.
मका वर्षातून एकदा तोही १०० एकरच(!) लावतात. अजून एक गव्हासारखे दिसणारे धान्य लावतात. तेही गुरांसाठी. या १०० एकरची नांगरणी व पेरणी अठवडाभरात होते. आधी शेणखत मशीनने फवारून घेतात.
मग नांगरणी आणि मग पेरणी. शेणखत अर्थातच विकत घ्यावे लागत नाही. १५०० अश्वशक्तीचे ट्रॅक्टर आणि ८ फाळे असलेला नांगर एवढे काम पटकन करून टाकतो.
मग कापणीच्या वेळी हर्वेस्टर मात्र लुक ४ दिवस भाड्याने आणतो. गवत कापण्याचे यंत्रपण बघितले. १० मीटर लांबीच्या या यंत्राने गवत कापले जाते आणि मागोमाग दुसर्या यंत्राने उचलले जाते व बारीक कापले जाते. मग त्याचे ठोकळे करून ठेवतात. युरिया पसरवण्याचे एक वेगळे यंत्र होते. हे यंत्र एकावेळी २०-२० मीटरपर्यंत युरिया फेकते. या यंत्रांचे बारकावे लुक सांगत होता. पॅट्रिक त्याचा अनुवाद करून नवर्याला सांगत होता.
तेवढ्यात इंगं म्हणाली तिची थोरली मुलगी एका वाढदिवसाला गेली आहे, तिला घेऊन येते. ५ मिनिटांत तयार होऊन बाहेर पडलेली इंगं शेतकरीण वाटतच नव्हती. जीन्स, टी-शर्ट, नाजूक जॅकेट आणि पॉश कार!
ती गेल्यावर सासूबाईंनी आमचा ताबा घेतला. आम्ही सासूच्या घरात गेलो. फॉन्सबाबा आले. पॅट्रिक आणि ज्ञानेश आले. गप्पा सुरू झाल्या. "बीयर घेणार का? कोला घेणार का?" दूध आत्ताच घेऊन झाले होते तरी म्हातारी ऐकेचना. वाईन, बीयर आणि कोला यापैकी काहीच आम्ही घेत नाही म्हटल्यावर आजीबाईंनी दुधात शिजविलेली तांदळाची खीर समोर आणली. अप्रतीम चवीची आटलेल्या दुधात शिजवलेली ती खीर मी कधीच विसरणार नाही!
फॉन्स ५० वर्षांपूर्वी या वाडीवर रहायला आला. सुरुवातीला १०-१२ गायी होत्या. त्याने हे पशुधन वाढवले. दूध काढण्याची यंत्रे त्याने ३० वर्षांपूर्वी लावली. आजही तीच यंत्रं काम करताहेत. खूप अभिमानाने फॉन्सबाबा आपली कथा सांगत होते.
आम्ही अधूनमधून त्यांच्या भाषेत आपल्याकडील शेतीची माहिती देत होतो. अडेल तिथे पॅट्रिक दुभाषा म्हणून होताच.
खाणं संपवून निघालो. आजीबाईंनी हातात एकेक चॉकलेट ठेवले. बाहेर आलो तेव्हा लुक आणि इंगं आपल्या कामाला लागले होते. दूध काढण्याचे काम चालू होते.
यंत्रं असली तरी ८० गायींचे दूध काढायला दोघांना मिळून सकाळी अडीच तास आणि संध्याकाळी अडीच तास एवढा वेळ लागतो. बाकी चारापाणी, स्वच्छता यांना दिवस अपुरा पडतो.
हं, एक राहिलंच. सरकारी फॉर्ममध्ये शेणखताची विल्हेवाट दाखवावी लागते. एकूण उत्पादन, वापर यात तफावत असेल, म्हणजे गरजेपेक्षा जास्त शेणखत निर्माण होत असेल तर शेणखत उचलून नेण्यासाठी सरकारला पैसे द्यावे लागतात. मग काही ठराविक काळाने सरकारी लोक पैसे नि खत घेऊन जातात!
उत्पन्नाचे, जमिनीचे आंकडे श्रीमंती दाखवत असले तरी शेतकर्याचं जीवन किती कष्टाचं, जगात सगळीकडेच!
निघतांना इंगंने सहज म्हणून ५-६ लीटर दूध एका डब्यात भरून दिलं. फॉन्सबाबाने एक लाकडी गॅरेज उघडून डिस्कब्रेक असलेला आपला ८ माणसांचा टांगा दाखवला. दुसर्या दिवशी त्याचे गुढग्याचे ऑपरेशन होणार होते. मी बरा झालो की या टांग्यातून तुम्हाला शेत फिरवून आणेन असे वचन त्याने दिले. किती साधी, लाघवी माणसं ही! पुन्हा भेटण्याचे आश्वासन देऊन आम्ही त्या वाडीचा निरोप घेतला.
गेला अठवडाभर डोक्यातून ते शेत जात नाहीये. विस्मरणात गेलेला, प्रबोधिनीत शिकलेला एक श्लोक आता सगुणाला शिकवणार आहे -
वदनी कवळ घेता नाम घ्या मातृभूचे |
सहज स्मरण होते आपुल्या बांधवांचे |
कृषिवल कृषि करण्या राबती दिवसरात्र |
श्रमिक श्रम करोनि वस्तू या निर्मितात |
स्मरण करुन त्यांचे अन्न सेवा खुशाल |
उदरभरण व्हावे चित्त होण्या विशाल |
Wah! excellent article!!
ReplyDeleteमस्त माहिती ...
ReplyDeleteफोटो पण छान आहेत ...
श्लोक पण छान :)
आपल्या इथले शेतकरी असे कधी होणार ??
छान लिहिलंय. अगदी फार्म वर फिरवून आणलं!
ReplyDeleteछान लिहिलंय. अगदी फार्म वर फिरवून आणलं
ReplyDelete