Tuesday 24 August 2010

मेंदीचा दरवळ

मागच्या आठवड्यात कोणाला तरी मेंदीची आठवण आली. आणि मग राखी पौर्णिमेला मेंदी काढूया असे ठरले. इथे पाकिस्तानी दुकानात मेंदीचे तयार कोन मिळतात. पण त्यात कोणतीकोणती रसायने मिसळली असतात म्हणे. मग काय कोन पण आपणच करूया असे ठरवले. कोणीतरी भारतातली मेंदी शोधून आणली. मोठ्या उत्साहात एका पातळ कपड्याने मेंदी चाळली. मग ती पाणी आणि निलगिरी तेल घालून लोण्याएवढी पातळ भिजविली. कात्री, प्लास्टिकचे पेपर, चिकटपट्ट्या यांचा एवढामोठ्ठा पसारा करत कसेबसे ४ धड कोन तयार केले. त्यात मेंदी भरली. नि वर रबर लावून ते बंद केले. सगळ्या घरभर मेंदीचा वास, निलगिरी तेलाचा वास घमघमत होता. मन भरून तो वास घेतला. किती वर्षं झाली अशी साग्रसंगीत, स्वतःच सगळी तयारी करून मेंदी रेखाटल्याला ?

अगदी लहान असेन मी. सहा सात वर्षाची. आमच्या घरमालकांना एक मुलगी होती. आम्ही कांचनताई म्हणायचो तिला. तर या कांचनताईने एकदा तिच्या हातावर काढलेली मेंदी दाखवली. झालं. मला अगदी तश्शीच मेंदी काढायची म्हणून आईकडे हट्ट धरला. गोर्‍यापान हातांवर, कोनाने अगदी नाजूक नक्षीत रेखाटलेली आणि गडद्द रंगलेली ती मेंदी म्हणजे त्या दोन दिवसांसाठी माझं स्वप्न झाली होती. आईला काही कोन वगैरे घेऊन मेंदी काढता येत नव्हती. तिने कांचनताईला विचारले तर तिला वेळ नव्हता. कोनही संपला होता म्हणे. मग आईने मेंदी भिजवून काडेपीटीतल्या काडीने हातावर एक स्वस्तिक आणि ठिपके अशी मेंदी काढून दिली. मला मुळीच आवडली नाही ती. अर्ध्या तासात हात नळाखाली धुवून मोकळी. 'तश्शी' मेंदी पायजे ! मग आईने काडीने अगदी बारीक बारीक ठिपके हातभर काढली. मग कुठे थोडेसे समाधान झाले. थोड्या काळाने कळू लागले की मेंदी नुसती छान काढून भागत नाही. रंगली की नाही बघण्याच्या नादात हातावरची सगली मेंदी २ तासात धुतली जायची. मग ती केशरी रंगायची. छान लाल चॉकलेटी रंग काही यायचा नाही. मग मी पुन्हा रडायची.

पुढे मेंदी हा विषय स्वतःच्या हातात घेतला. १०-१२ वर्षांच्या मैत्रिणींच्या आमच्या गटात तासंतास मेंदी कशाने रंगते अशा चर्चा व्हायच्या. तेव्हा बाजारात सहजपणे आजच्यासारखे तयार कोन मिळत नसत. मग प्रत्येकजण आपली ताई, मावशी, काकू मेंदी रंगण्यासाठी काय काय करतात ते सांगायच्या. आणि आम्ही घरी जाऊन ते प्रयोग करायचो. कुठे मेंदी चहाच्या पाण्यात भिजव, कुठे काताचं पाणी टाक, कधी लिंबाच्या रसात तर कधी चिंचेच्या पाण्यात मेंदी भिजवायचो. आमच्या घरात मी एकटी मुलगी नि बाकी सगळे मुलगे असल्याने मला एकटीला स्वतंत्र प्रयोग करता येत. आईपण फारसे लक्ष देत नसे. आमच्या वर्गात एक मुसलमान मैत्रीण होती. एकदा तिच्या आईने सांगितले की त्या काकू त्यांच्या लहाणपणी मेंदीत चिमणीची शी घालयच्या ! पण आजकाल निलगिरी तेलानेही काम होते. यातलं लॉजिक काही कळलं नाही. पण त्या मैत्रिणीच्या आमच्यापेक्षा जास्त रंगलेल्या मेंदीकडे आम्ही कसनुसे तोंड करून बघायचो एवढंच आठवतंय.

सातवीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत आई म्हणाली चल आपण मेंदीचा क्लास लावूया ! आयुष्यात क्लास लावण्यासाठी आनंदाने जाण्याची ती पहिली वेळ ! पण तो क्लास विचित्रच होता. मी आणि अजून एक मैत्रीण अशा दोघीच असायचो. शिकविणारी ताई एक मेंदीच्या डिजाईन काढलेली वही समोर ठेवायची नि बघून काढा म्हणायची. स्वतः टीव्ही बघत बसायची. तिथे फक्त साधारण मेंदी साठी कोणत्या प्रकारच्या नक्षी असतात एवढेच बघायला मिळाले. आणि हो, कोन कसा करायचा ते मात्र शिकायला मिळाले. चित्रकलेत माझा आनंदच होता. त्यामुळे बाकी काही शिकले नाही तरी कोन करता येतो या एका गोष्टीच्या जोरावर चुलत मावस मामे बहिणींमध्ये माझा भाव वाढला.

सणासुदीला सगळे एकत्र आलो की मेंदीची टूम निघायची. मग मी मेंदी काढणार म्हटल्यावर बाकी सगळ्या बहिणी मी सांगितलेली सर्व कामं करायला तयार असायच्या. एकतर मी सर्वात मोठी होते आणि मेंदीचा क्लास मी एकटीने केला होता ना ! मग मी सगळ्याना कामाला लावयची. मेंदी पुडा आणणे, मेंदी वस्त्रगाळ करणे, लिंबाचा रस गाळून वाटीत तयार ठेवणे, काताचे पाणी तयार करणे आणि मोठ्या माणसांची मर्जी झालीच तर निलगिरी तेलाची २ रु. ची छोटी बाटली विकत घेणे. मग मोठ्या कौशल्याचा आव आणून मी मेंदी भिजवत असे. मग ती ५-६ तास भिजवून ठेवायची. रात्री भराभरा जेवणं उरकायची. बाथरूमला जाऊन यायचं. ( पुन्हा खोळंबा नको ! ) हात साबणाने स्वच्छ धुवून यायचे नि मग मेंदी ची मैफिल बसायची. रात्री उशिरापर्यंत मान पाठीला रग लागेपर्यंत मेंदी लावणे चालायचे. नक्षी कोणतीही असो. ती बारीक हवी नि हात मनगटापासून नखांपर्यंत भरलेला दिसला पाहिजे एवढेच उद्दिष्ट असायचे. हात भरून मेंदी लावली की पोरगी खुष ! मग ती मेंदी सुकून निघून जाऊ नये म्हणून त्यावर साखरेचे पाणी कापसाच्या बोळ्याने हलकेच लावायचे.

सकाळी उठल्यावर सुकलेल्या मेंदीला तेल लावून कोमट पाण्याने ती धुवायची. मस्त केशरी, लाल रंगात रंगलेली ती मेंदी बघितली की रात्री जागल्याचा सगळा शीण जायचा. नागपंचमी, राखी पौर्णिमा, दसरा, दिवाळी अशा सगळ्या सणांना मेंदी हवीच. अगदी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीलासुद्धा !

पुढे कॉलेजात गेल्यावर मेंदीचे अर्थ बदलले. मारवाड्यांच्या मुली कोपरापासून मेंदी काढत। ती बघायला खूप आवडायचे. कोन हातात धरून अगदी भराभरा नाजूक ,सुंदर नक्षी काढत बघता बघता पूर्ण हात रंगत असे. ती मेंदी काढतानाची तन्मयता पण तितकीच सुंदर भासे. गोर्‍या पावलांवरची नाजूक मेंदी पण बघणार्‍याला प्रसन्न करायची. स्नेहसंमेलनात मेंदीच्या स्पर्धा असायच्या. मी बहुतेक वेळा माझे हात या स्पर्धेसाठी वापरायला द्यायची !

मेंदी रंगण्यावरून चिडवाचिडवी व्हायची. कोणी आपल्यावर खूप प्रेम करत असेल तर मेंदी खूप रंगते असे सगळ्या मुली म्हणत. ज्या खरोखरीच प्रेमात पडलेल्या आहेत त्या मेंदीच्या नक्षीच्या गर्दीत कुठेतरी आपल्या हीरोचे नाव लिहीत. मुलंही कोणाच्या तरी लग्नाबिग्नाचे निमित्त करून टिपिकल बदाम वगैरे मेंदीने काढून त्यात आपल्या हिरॉईनच्या नावाचे आद्याक्षर लिहीत.

लग्न समारंभात अजून जोडे पळविणे, मेहंदी रसम वगैरे प्रकार आपल्याकडे सुरू झाले नव्हते. त्यामुळे नवरीची मेंदी हा अगदी खाजगी कार्यक्रम असे. नवरीच्या हातावर मेंदी काढण्यासाठी ओळखीतलीच कोणी मुलगी येई. मग करवल्या, नवरी नि मेंदी काढणारी ४ तास एका खोलीत गुडुप होत. या मेंदीत मात्र नेहमीची नक्षी न काढता मोर, डोली, बारात अशा थीमची नक्षी काढत. ती मेंदी रंगेल की नाही ही स्वतः नवरीसाठी पण काळजी असे. मेंदी हमखास रंगण्यासाठी चार लवंगा तव्यावर टाकून त्याच्या धुरात हात धरावे असे मेंदी काढणारी सांगून जाई. आईच्या तव्याशी नवरीचा तसा तो शेवटचाच संपर्क. लग्नात नवरदेवाने नवरीच्या हातावरच्या मेंदीत आपले नाव शोधायचे असा एक खेळ आम्ही खेळायचो.

लग्नात मेंदी काढल्यानंतर पहिल्या वर्षभरात कौतुकाने इतरांकडून मेंदी काढून घेण्यात मजा आली. मग कामाच्या रगाड्यात वेळ मिळेनासा झाला. आलीच कधी लहर तर आयता कोन आणून कामाच्या ठिकाणी अगदीच ऑड दिसणार नाही इतपत मेंदी काढली जाते. कोन विकतचा असल्याने त्याची तेवढी किंमत नसते. हमखास रंगण्याची खात्री असते. मेंदी रंगेल की नाही ही हुरहूर नसते . हल्ली वेगवेगळ्या रंगात दिसणारे मेंदीचे टॅटू पण सर्रास वापरले जातात.

खूप दिवसांनी मेंदीचा कोन करताना हे सगळं आठवत होतं. काल संध्याकाळी इथे असणार्‍या आम्ही ५ - ६ भारतीय मुली एकत्र भेटलो. आधी सगळ्यांच्या मुलांच्या हातावर एकेक चित्र मेंदीने काढलं. मग एकमेकींच्या हातवर. प्रत्येकीच्या हातावर मेंदी काढताना चेहर्‍यावर आपापल्या भावविश्वात रमल्याच्या खुणा बघत होते. कोणालाच अगदी सुंदर नक्षीकाम येत नव्हते. समोर एक मेंदीचे पुस्तक होते पण एक रेष सरळ येत नव्हती ! पण मिळून काहीतरी करण्याचा आनंद मात्र खूप मोठा होता. डोळ्यात लहाणपणीचे निरागस कुतुहल, एकमेकींच्या नक्षींचे कौतूक ( चक्क ! ) , आणि मेंदी पूर्ण झाल्यानंतर प्रेमाने आपल्याच हातकडे बघतानाचे समाधान ! गुजरात, पंजाब, कर्नाटक आणि महाराष्ट्रातले हात एकाच मेंदीने रंगत होते. प्रत्येकीच्या मनातली मेंदी दरवळत होती.

1 comment:

  1. हा मेहंदी वरचा लेखही अगदी तसाच सुरेख रंगला आहे.

    ReplyDelete