खूप दिवसांचा रेंगाळलेला बेत आता सिद्धीस जात होता. ब्रुसेल्सहून ओस्लो ला जाणारे विमान समोर होते. सोबतीला सूर जुळणारे एक जोडपे होते. उद्यापासून ४ दिवस नॉर्वेतल्या दरीखोर्यात राहायचे आहे या कल्पनेनेही शांत शांत वाटत होते. विमानाने हाक मारली. आत जाऊन बघतोय तर मोजून १२ डोकी ! "होल वावर इज आवर" म्हणत आम्ही ऐसपैस जागा घेतल्या. ( तरी त्या खत्रुड हवाईबयेने बिजनेस क्लास मध्ये नाहीच बसू दिले ! ) सोबतची तीन डोकी हापिसातून परस्पर आल्यामुळे झोपून गेली. अडीच वर्षाची सगुणा विमान या वस्तुतले सगळे कुतुहल संपल्यामुळे कंटाळून झोपून गेली. मी मात्र टक्क जागी होते. कोणत्याही प्रवासाला जाताना नवीन काहीतरी बघण्याची दिवास्वप्न पडत असल्याने मी झोपूच शकत नाही. चाळा म्हणून स्वतःशी गाण्याच्या भेंड्या सुरू केल्या. 'दरीखोर्यातून वाहे... एक प्रकाश प्रकाश...' हे गाणं आलं नि मनात उद्या दिसणारे डोंगर बहरू लागले. आत्तापर्यंत जमा केलेल्या माहितीची मनात उजळणी सुरू झाली.
नॉर्वे म्हणजे मध्यरात्रीच्या सूर्याचा देश एवढीच माहिती होती. पण जेव्हा नकाशा बघितला, फोटो बघितले तेव्हा आश्चर्याने थक्क झाले. लांबट निमुळत्या आकाराचा हा देश. त्याला २५ हजार किमि. चा समुद्र किनारा. एका बाजूला समुद्र तर एक बाजू सगळी पर्वतमय. पठराचा भाग देशाच्या एकूण भूमीपैकी केवळ १० % ! म्हणजे बहुसंख्य लोक डोंगरदरीत राहातात. आम्ही उन्हाळ्याच्या अगदी शेवटी जाणार असल्याने मध्यरात्रीचा सूर्य दिसणार नव्हता. म्हणून फार उत्तरेकडे न जाता मध्यभागी असणार्या फियॉर्ड्स बघायला जाणार होतो. समुद्र आत घुसल्यामुळे पर्वत भंगून दर्या निर्माण झालेल्या असतात त्या भागाला फियॉर्ड्स म्हणतात. "नॉर्वे इन नटशेल " असे आमच्या सहलीचे नाव. कल्पना एका प्रवासी कंपनीकडून घेऊन आरक्षणं आणि बाकी नियोजन आम्हीच केले होते.
तरीही मनात शंका होत्याच. कारण पर्यटन म्हणजे प्रेक्षणीय स्थळांची यादी हवी, त्यात दोन चार संग्रहालये वगैरे पाहिजेत. तसे या प्रवासात काहीच नव्हते. सगळे दिवस आम्ही रेल्वे, बस आणि जहाजातून प्रवास करणार होतो आणि त्याचवेळी जे दिसेल ते प्रेक्षणीय असणार होते. एका अर्थाने खूप आरामदायी प्रवास होता हा. आम्हाला फक्त एका वाहनातून उतरून दुसर्या वाहनात बसायचे होते. आणि पंचेंद्रिये उघडी ठेवायची होती. पण हे सगळे आम्ही नेटवरचे फोटो बघून ठरवले होते. किती धाडस ! एक तर नॉर्वे खूप खर्चिक देश आहे. ( राहाणीमान अमेरिकेपेक्षा ३०% नि ब्रिटन पेक्षा २५% ने जास्त आहे म्हणे ! ) नेटवरच्या सारखे काही दिसले नाही तर एकूण प्रकरण फारच कंटाळवाणे होणार...
विचारांच्या तंद्रीत विमान ओस्लो विमानतळाकडे झेपावले. रात्रीचे साडेदहा वाजले होते. बाहेर १० डिग्री तापमान होते. विमानतळावरून शहरात जाणारी फास्ट मेट्रो चुकली होती. मग दुसरी एक घेतली. त्या रेल्वेने आम्हाला मुख्य स्थानकावर सोडले. आता हॉटेल शोधायचे होते. अजून एक मेट्रो. बहुतेक आमची दिशा चुकली नि आम्ही पुन्हा तिसर्याच ठिकाणी उतरलो. रात्रीचे सव्वाबारा झाले होते. मग मात्र सरळ टॅक्सी करून हॉटेल गाठले. हे हॉटेल मीच शोधले होते. ४ तास झोपण्यासाठी एवढ्या दूरचे हॉटेल बुक केले म्हणून मनात स्वतःला शिव्या घातल्या.
एवढ्या रात्री सुद्धा शहर जागे होते. पब्स, रेस्टॉरंट्स फुललेले होते. युरोपियन धाटणीच्या इमारती दिमाखात चमकत होत्या. चक्क आपल्याकडे असतात तशा सायकल रिक्षा सुद्धा दिसत होत्या. तरुणाईचा भर रस्त्यात जल्लोष चालू होता. एका टीन एजर्स च्या झिंगलेल्या घोळक्याने तर पूर्ण रेल्वेस्टेशन डोक्यावर घेतले होते. एकूण शहर खूप नियोजनपूर्वक बांधलेले दिसत होते. यावेळेलाही पोलिसांची गर्दी मात्र ठिकठिकाणी का होती ते समजले नाही.
हॉटेलवर पोहोचलो तोवर एक वाजून गेला होता. उद्या सकाळी ओस्लो वरून निघून आलेसुंद नावाच्या गावी वाहाने बदलत बदलत संध्याकाळपर्यंत पोहोचायचे होते.
मस्त झोप लागली. सकाळी साडेपाचला उठलो. खिडकी बाहेर पाहिले तर अगदी खिडकीच्या खाली एक झरा खळखळ वाहात होता ! त्यावर एक चिमुकला पूल ! खूप प्रसन्न वाटले. भराभर आवरून नाश्ता करून मुख्य रेल्वेस्थानकावर गेलो. तिथे अजून एक गोड धक्का होता. रेल्वेत कुटुंबांसाठी वेगळा डबा असतो. त्यात बाबागाडी ठेवायला प्रशस्त जागा. डब्याच्या शेवटी मुलांना खेळता यावे म्हणून छोटे खेळघर. त्यात मुलांच्या उंचीची आसने आणि फळा, खडू, गोष्टीची पुस्तके नि टी.व्ही. !!! हे सगळे सुस्थितीत !
गाडीने ओस्लो सोडले. नियोजनात बसणे शक्य नव्हते तरी मनाला चुटपुट लागून राहिली. ओस्लो बघण्यासाठी थोडा वेळ द्यायला हवा होता.
नॉर्वे दर्शनाचा आरंभ चांगला झाला होता.
No comments:
Post a Comment