Thursday, 19 August 2010

डच बालकथा ४ - कोंबडी आणि पिल्लू

एका शेतावर एक कोंबडी रहायची. छोटंसंच पण एकदम शानदार घर होतं हं तिचं. दिवसभर शेतात किडे मुंग्या शोधायची. इकडेतिकडे सापडलेले दाणे मस्त चवीचवीनं खायची. आणि रात्री आपल्या घरात येऊन आवडीचं काहीतरी करत बसायची. खूप छंद होते कोंबडीला. तिला गायला आवडायचं, तिला विणायला आवडायचं, नवे नवे पदार्थ बनवायला आवडायचं आणि बागकामही आवडायचं. आपल्या घरासमोरच्या अंगणात तिने छान बाग फुलवली होती.

हे एवढे उद्योग असतानाही तिला कधीतरी खूप कंटाळा यायचा. कोणाशी तरी खेळावं, गप्पा माराव्या असं वाटायचं. पण आजूबाजूला कोणी नसायचं. अशा वेळी मग ती आपल्या छोट्याशा गाडीतून फिरायला जायची. लांबच्या दुसर्‍या शेतात असणार्‍या मित्रमैत्रिणींना भेटायची आणि परत यायची.

एकदा ती अशीच सर्वांना भेटून परत येत असताना तिला एक छोटीशी भेट मिळाली. एका सुंदर पिशवीत काहीतरी गोल वस्तू होती. कोंबडीला वाटलं की लग्गेच ती पिशवी उघडून बघावी. पण आईने शिकवलेलं आठवलं. सगळ्यांसमोर भेटवस्तू लगेच नाही उघडायची. कधी एकदा घरी जाते आणि ती वस्तू बघते असं झालं तिला. भराभरा ती घरी आली. दार उघडून घरात आली. दाराजवळच्या टेबलावर तिने ती पिशवी अलगद ठेवली नि हळूच उघडली. बघते तर काय... एक पांढरेशुभ्र अंडे होते त्यात !!! " कित्ती मज्जा ! म्हणजे आता या अंड्यातून पिल्लू बाहेर येणार ! आणि आपल्यासोबत राहाणार "!! कोंबडीला खूप खूप आनंद झाला. घरभर नाचली ती अंडे हातात घेऊन !

पण अंड्यातून पिल्लू कसे बाहेर येते, कधी येते हे तिला काही माहीत नव्हतं. विचारणार तरी कोणाला ? सोबत कोणीच नव्हतं. कोंबडीने एक दिवस वाट बघायची ठरवली. सोफ्याजवळच्या एका छोट्याशा खुर्चीत तिने एक मऊ मऊ बिछाना तयार केला. आणि त्यावर ते अंडे ठेवले. दिवसभर ती त्या अंड्याकडे बघत राहिली. पिल्लू काही बाहेर येईना ! मग तिने रात्रभर वाट बघितली. अंड्याजवळच्या सोफ्यावरच येऊन झोपली. सकाळी उठून बघते तर काय अंडे तसेच. मग तिने अजून दोन दिवस वाट बघितली. अंहं... ! पिल्लू बाहेर येईना.

मग कोंबडीने विचार केला आपण पिल्लुला बोलले पाहिजे. ती अंड्याकडे तोंड करून म्हणाली, " पिल्ला, पिल्ला, बाहेर ये. मी तुला छान छान गोष्ट सांगेन. " तिने एक सुंदर गोष्ट सांगितली. पण पिल्लू बाहेर येईना !

आता काय करावं बरं? ह्म्म.. पिल्लाला खाऊ देऊया. असे म्हणत कोंबडी स्वयंपाकघरात गेली. तिने पिल्लूसाठी मस्त नूडल्स बनविल्या. आणि केक सुद्धा बनवला. ते घेऊन ती बाहेर आली. अंड्याकडे बघून म्हणाली, " पिल्ला पिल्ला, बघ मी तुझ्यासाठी काय काय खाऊ आणलाय.. बघ तरी बाहेर येऊन ! " अंहं ! पिल्लू बाहेर येईना ! कोंबडी बिचारी हिरमुसून गेली. " खूपच हट्टी दिसतंय पिल्लू " असं म्हणून बसून राहिली.

थोड्या वेळाने तिला वाटले," किती बाई ही थंडी ! पिल्लूसाठी स्वेटर विणले पाहिजे. " मग काय, चपला घालून गेली बाहेर. मेंढीकडून लोकर घेऊन आली. आणि कपाटातल्या विणकामाच्या सुया घेऊन लागली कामाला. मस्त स्वेटर तयार झाले ! ते घेऊन अंड्याजवळ जाऊन म्हणाली, ' पिल्लू..बघ किति छान स्वेटर आहे हे. चल ये आता बाहेर, घालून बघ पाहू.. " पण अंडे थोडेसुद्धा हलले नाही.

अचानक कोंबडीला वाटले, अरेच्चा, आपल्या लक्षातच आली नाही एक गोष्ट. पाणी कुठं घातलंय आपण अंड्याला ??? लगोलग ती घरातून एक कुदळ फावडे घेऊन आली. बागेत एक छोटासा खड्डा खणला. त्यात अंडे ठेवले नि वरून झारीने पाणी घातले. एक दिवस गेला, दोन गेले, तिसर्‍या दिवशी पण अंडे तस्सेच !

कोंबडीला त्या अंड्याचा खूप राग आला. आणि पिल्लू बाहेर येत नाही म्हणून खूप वाईटही वाटले. तिला खूप रडू येत होते. अंड्याच्या समोर बसून ती खूप खूप रडली. इतकी रडली की आता तिचे डोके दुखू लागले. तिने अंडे उचलले. आणि आपल्या बिछान्यावर ठेवले. जेवली नाही, कपडे बदलले नाहीत. तशीच पांघरूण घेऊन झोपून गेली. खूप खूप थकली होती ती. अंडे पण तिच्या पांघरुणातच होते.

सकाळी कोणाच्या तरी गोड आवाजाने तिला जाग आली. कोंबडीने डोक्यावरचे पांघरूण काढून पाहिले. समोर चक्क अंड्यातून नुकतेच बाहेर आलेले पिल्लू तिला हाका मारत होते. " सुप्रभात आई, तू कशी आहेस ? मला भूक लागली गं. कधी उठणार तू ? " कोंबडीला आभाळाएवढा आनंद झाला. अखेर तिला पिल्लू भेटले होते. :)

3 comments: