तो: एक विचारु ?
ती: ह्म्म.. विचार की..
तो: तिच्या गावी जातोय तर एकदा भेटेन म्हणतोय..
ती:( कातर,व्याकूळ झालेले डोळे लपविण्यासाठी मान फिरवून ) बघ. म्हणजे ठरव तूच !
तो: एकदा भेटूनच येतो.
ती: परवा सकाळी येशील नं घरी?
तो: हो.
तो जातो. ही सैरभैर. ही भेटण्याआधी ती याच्या आयुष्यात होती. लाटेसोबत आलेल्या शिंपलीसारखी. दुसर्या लाटेबरोबर निघूनही गेली....हिला त्या जखमा दिसल्या तेव्हा दातओठ खाऊन जिवाच्या कराराने त्या पुसण्यासाठी किती झगडली ! आणि आज पुन्हा तो म्हणतोय............
रात्रभर कूस बदलत आभाळातल्या चांदण्या मनात टोचवून घेत राहिली. चांदण्याही मग हक्काने टोचत राहिल्या. पहाटे बागेतल्या गवताबरोबर हिच्या उशीवरही दव पडलं होतं.
आजचा दिवस नि रात्रही जायची आहे अजून.
मनातल्या डोहावर कितीतरी गोष्टी तरंगत राहिल्या. निळसर गुलाबी रंगाचे कागद, अत्तराच्या कुपीचे हरवलेले झाकण, चंद्रलिपीतली अक्षरे नि त्याला चिकटलेली मोरपिसं ...!!!
रात्र पुन्हा गढूळली. क्षितिजावर रेंगाळणारे ढग गाफिल क्षणी मनात वस्तीला आले. आणि तो पण आला....
खात्री नव्हती ? होती की. तरीपण..काय...तिच्या मनात चाललंय तरी काय???
"दारी उभा गे साजण
नको त्याच्यापुढे जाऊ"
दुखले का ? की संताप आहे हा ?
"त्याने यात्रेत भेटल्या
कोण्या पोरीच्या देहाला
दिले आभाळाचे बाहू"
ढग बरसतील नं आता? प्रलय येणार... बघू त्याच्या चेहर्याकडे? ऊन असेल की सावली तिथे?
" हात नाहीत गं त्याला
उभा अंधारी साजण "
मी पाऊल टाकू ? पहिलं ?
तोच येतोय पुढे!
मूठीत काय त्याच्या ? ओंजळ पुढे करतेय मी..
चाफा ! पहिल्या भेटीत मी त्याला दिलेला...!!!!
भरून आलेल्या आभाळाला एक गार झुळूक भेटली..पाऊस !
" हात नाहीत गं त्याला
उभा अंधारी साजण
तिने जीव दिला तरी
त्याने वाहत्या पाण्याचे
इथे आणले पैंजण..."
जिंकली की ! आता पाऊस थांबलाय. पहाट केशरी दवात भिजतेय्....चाफा नव्या गंधाने दरवळतोय !
( लेखातील कवितेचे कवी- ग्रेस)
No comments:
Post a Comment