मी रहाते त्या गावात एकही भारतीय दुकान नाही. त्यामुळे आयते गुलाबजाम मिक्स किंवा हल्दीरामचे तयार गुलाबजामुन वगैरे चैन नाही. दुधाचा खवा करणे कठीणच. रिकोटा चीज चा खवा केला पण त्याचे गुलाबजामुन फुटतात असे मैत्रिणीने सांगितले.....
मग गुलाबजामुनच्या या रेसिपीचा शोध लागला. आज केले गुलाबजामुन... या गरम गरम खायला...मस्त झालेत :bhuk
साहित्य :
१ वाटी कोणतेही दूधपावडर
१/२ वाटी मैदा
१/२ छोटा चमचा कुकिंग सोडा
२ छोटे चमचे लोणी किंवा तूप
दूध- साहित्य मळण्यापुरते.
पाक तयार करण्यासाठी :
२ वाट्या साखर
१ वाटी पाणी
वेलचीपूड्,केशराच्या काड्या किंवा गुलाबपाणी
कृती :
दूधपावडर, मैदा, सोडा, लोणी हे सगळे एका भांड्यात घ्यावे . दूध घालून साधारण पोळीसाठी कणीक असते तेवढे मऊ मळून घ्यावे. सुरुवातीला हे मिश्रण खूप चिकट वाटेल.बिघडले की काय अशी शंका मनात येइल. अशा वेळी गुलाबजाम गुलाबजाम असा जप करत मळत रहावे. गोळा घट्ट होतो. मग त्या गोळ्याचे १८ ते २० लहान तुकडे करावे. प्रत्येक लहान गोळा हातावर गोल किंवा अंडगोल आकारात वळून घ्यावा. एका ताटलीत वळलेले गोळे वाळू नयेत म्हणून पातळ ओल्या कपड्याने झाकून ठेवावे.
आता एकीकडे पाक तयार करावा. पातेल्यात साखर ओतावी. ती साखर पूर्ण बुडेल एवढेच पाणी घालावे. साखर विरघळली नि पाकाला उकळी फुटली की गॅस बंद करावा. त्यात वेलचीपूड, केशर, किंवा गुलाबपाणी टाकावे.
एका कढईत तेल तापायला ठेवावे. चांगले तापले की गॅस कमी करावा. मग वळून ठेवलेले गुलाबजाम त्यात टाकावे. ते खाली चिकटतील. पण त्यांना झार्याने न हलवता सावकाश कढईच हलवावी. ते फुगून वर येतात. वेळ लागला तरी मंद आचेवरच तळावे. नाहीतर आतून कच्चे रहातात आणि पाकात टाकले की पंक्चर होतात.
कढईतून काढलेले गुलाबजाम लगेच पाकात टाकावे.
सगळे गुलाबजामुन पाकात टाकल्यावर ते पातेले गॅसवर ठेऊन अजुन एक उकळी येउ द्यावी.
तासभर दम धरावा. पाक छान मुरतो. मग हाताने किंवा चमचाने वाटीत किंवा पातेल्यात, नुसते किंवा आईस्क्रीमसोबत फस्त करावे.
हे घ्या तुमच्यासाठी..
No comments:
Post a Comment