Thursday, 1 July 2010

भुरका चटणी

आमच्या मराठवाड्यात विशेषतः परभणी-बीड या भागात भुरका फार आवडीचा. शिळी भाकरी असो की रसाचे जेवण, भुरक्याचे एक बोट चाटले की जिभेवरचे सगळे शेवाळ गेलेच पाहिजे.नव्या घासाच्या नव्या चवीसाठी जीभपण नवी! या प्रकाराला काही ठिकाणी 'तळलेले तिखट ' असेही म्हणतात.

हा चटणीचा एक प्रकार आहे. करायला सोपा. तिकडे नुसते तिखट वापरून करतात. मी थोडा सौम्य करावा म्हणून थोडा बदल केला आहे.

वेळ : ५ ते ७ मिनिटे
साहित्य : पाव वाटी लाल तिखट
पाव वाटी पोहे
२ चमचे दाण्याचा कूट
लसूणपाकळ्या १०-१२
पाव वाटी तेल
जिरे-मोहरी-मीठ
कृती :
छोट्या कढईत तेल तापत ठेवा.
एका वाटीत तिखट आणि मीठ एकत्र करा.
तापलेल्या तेलात मोहरी जिरे टाका. मग सोलून पोह्यांसारखा चिरलेला लसूण टाका.
लसूण गुलाबी रंगाचा झाला की गॅस बंद करा. मग त्यात पोहे टाका. पोहे लगेच तळले जातील.
हे मिश्रण वाटीत ठेवलेल्या तिखटावर ओता. मग त्यात भाजलेल्या दाण्याचा कूट घाला. चांगले मिसळा. भुरका तयार.
bhurka
ही चटणी १५ दिवस चांगली टिकते. ( खाऊन संपली नाही तर.. ! )
वर सांगितल्याप्रमाणे पोळी, भाकरी, ब्रेड, नुसता भात याबरोबर मस्त लागते. पोहे टाकल्याने छान कुरकुरीत चव येते.
भारताबाहेरील मंडळीना विशेष उपयोगी. कारण ज्यांना तिखट खायला आवडते त्यांना पिझ्झा, बर्गर, पांचट सँडविच, फ्राइज यासोबत सहज खाता येते.
एखाद्या तयार पदार्थाचा तिखटपणा वाढवण्यासाठीपण ही खूप सोयीची आहे. तिखट तळलेले असल्याने री-फोडणीची गरज नाही. भाजी आमटीत नुसती चमचाभर मिसळा.
सूचना : पोट अतिसंवेदनशील असणार्‍यांनी ही चटणी एका जेवणात १/८ चहाचा चमचा एवढीच खावी. अन्यथा परिणामांना सामोरे जाण्याच्या तयारीने खावी.

2 comments:

  1. फोटो पाहुनच तोंडाला पाणी सुटलं. नक्की करुन पहाणार.

    ReplyDelete
  2. करुन पाहिन सुंदर

    ReplyDelete