( या लेखाची प्रेरणा : कोसला कादंबरीतील 'बखर' )
दिनांक १ जुलै ३०१०.
आणि मग त्या काळामध्ये महिलांचे गेट टुगेदर नावाचे मनोरंजक कार्यक्रम चालत असत. आता तुम्ही म्हणाल महिला म्हणजे काय ? तर लग्न झालेल्या स्त्रीजातीय प्राण्याला महिला हे विशेषण मिळत असे. 'लग्न' म्हणजे काय असा प्रश्न चिकित्सक डोक्यात आलाच असेल.
तर लग्न म्हणजे एक स्त्रीप्राणी आणि एक पुरूषप्राणी एका घरात एकत्र राहाण्यासाठी हजार मानवप्राण्यांसमोर नटून थटून एकमेकांना बांधून घेत असत त्या विधीला लग्न म्हटले जाई. या विधीनंतर घरात स्त्रीप्राण्याचे वर्चस्व बहुतेक वेळा असे. स्त्रीप्राण्याची एकूणच अफाट असलेली उपद्रवक्षमता सुरुवातीच्या काळात सुप्त असे. त्या सुप्त गुणांची पारख झालेला पुरूषप्राणी योग्य त्या डावपेचांसह जगायला शिके. ज्याच्या ते उशीरा लक्षात येई, त्याला स्वतःचेच केस उपटण्याचा उत्तम उपाय सुचवला जात असे.
तर अशा महिलांच्या अनेक संख्येने ( ५ ते ५० ) एकत्र येण्याला गेट टुगेदर उर्फ गेट्टू, किट्टी पार्टी, महिला मंडळ, भिशी, भजनी मंडळ इत्यादी नावांनी संबोधले जाई. सापडलेल्या पुराव्यानुसार २१ व्या शतकाच्या पहिल्या दोन दशकात 'गेट्टू' हे नाव महिलाप्रिय असल्याचे आढळते.
अशा या गेट्टू साठी कुणाच्या तरी घरी महिला जमत असत. दाराजवळ चपलांच्या स्टँडजवळच डोके काढून ठेवण्याची पण सोय असे. गरजुंना त्याचा फार उपयोग होई. या कार्यक्रमात अधिकाधिक चांगले दिसावे म्हणून महिला प्राण पणाला लावत. त्यासाठी विचित्र रंग, वास आणि स्पर्श असलेले द्रव आणि घन पदार्थ चेहर्यावर थापणे, डोळे घट्ट मिटून भुवयांचे केस उपटवून घेणे असे भयानक प्रकार करायला त्यांची हरकत नसे. सर्वांना 'चांगले' ' दिसले' पाहिजेत म्हणून अगदी समोरचीच्या डोळ्यात थेट घुसतील असे वेष वापरत असत. ते कपडे व हातकड्या,साखळ्या, या एखाद्या टी व्ही सिरियल मधील संदर्भासह असले तर त्या महिलेला अधिक मान मिळत असे.
आता तुम्ही म्हणाल टी.व्ही. सिरियल म्हणजे काय? तर त्या काळात प्रत्येक घरात चालती-बोलती चित्रे दाखवणारा एक चौकोनी खोका असे. त्यावर काही बेरकी लोकांनी सामान्य लोकांना दिवास्वप्न बघण्याची सोय केलेली असे. व्यायाम, घरगुती कलह, राजकीय लफडी, पाककृती, चित्रपट अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर यात प्रबोधन चाले. हे सर्व बघताना चित्रांच्या जागी स्वतःला कल्पून सर्वांना दिवास्वप्ने बघता येत असत. पाककृती हा कार्यक्रम म्हणजे स्त्रीयांनी पुरुषांवर अत्याचार करण्याचे उपाय शिकविणारा कार्यक्रम असे असे एका तक्रारपत्रात आढळून आले आहे. काही फितूर पुरूषच हे उपाय जाहीरपणे शिकवत व नंतर पुरूषसमाजात मानाने मिरवत हे विशेष !
तर असे हे कार्यक्रम बघत मुलगी ची महिला झालेली स्त्री तसेच दिसण्याचा प्रयत्न नैसर्गिकपणे करत असे. हे गेट्टू साधारणपणे २ ते ४ तासांचे असे. 'हिंग्लीश' नावाच्या कष्टाने कमविलेल्या वैशिष्ट्यपूर्ण भाषेचा वापर इथे केला जात असे.
उदा: दीड वर्षाच्या मुलाला ' आधी गिळा आणि मग उधळा खेळण्यासाठी ' हे वाक्य 'हिंग्लीश मध्ये ' बेटा पहले ईटू ईटू करो और देन वॉकी वॉकी करके आँटीके पास प्ले प्ले करो ' असे बोलले जात असे.
या चार तासांचा चारकलमी कार्यक्रम असे तो पुढील प्रमाणे -
सगळ्या महिलांनी एकमेकींकडे डोक्यापासून चपलापर्यंत चिकित्सक नजरेने बघण्याने सुरुवात.
कलम १ :
कुचाळक्या - एकमेकींशी तिरकस बोलत हसत रहाणे असा अर्थ तत्कालीन शब्दकोषात सापडला आहे. तिरकस बोलणे म्हणजे बहुतेक तिरके होऊन बोलणे असावे, पण हे करताना हसण्याचे कारण काय बरे असावे ???
असो. यात प्रामुख्याने नुकतेच बघितलेले सिरियल्स, चित्रपट, त्यात असणारे कपडे,दागिने, आपापल्या नवर्यांची तक्रारवजा कौतुकं, मुलांच्या प्रगतीबद्दल चिंता, अशा विषयांवर प्राथमिक बोलणी होत.
कलम २ :
काथ्याकूट - नारळ नावाच्या झाडाचे अवयव दगड घेऊन कुटणे याला काथ्याकूट म्हणत. पण या काथ्या गेट्टू मध्ये का कुटल्या जात असाव्यात ते कळू शकले नाही.वर दिलेल्या विषयांवर अधिक जोमाने बोलता यावे म्हणून हा एक व्यायामप्रकार असावा असे विद्वानांचे मत आहे.
कलम ३ :
चहाड्या : चहा नावाच्या मध्यमोत्तेजक पेयाशी संबंधित हा प्रकार असावा. जी स्त्री उपस्थित नाही तिचे गुणगान करण्यासाठी मौलिक चर्चा या भागात होई. चर्चा म्हणजे चुरचुरीत शब्द तिखटमीठ लावून एकत्रितपणे वापरणे. शब्दासारख्या प्रकारावर तिखट आणि मीठ प्रचंड प्रमाणात उधळले जात असे.
कलम ४ :
खादाडी : समोर टोपले पातेले भरभरून ठेवलेले विविध खाद्यपदार्थ संपवण्याच्या कर्तव्यभावनेने प्रत्येक जण आपापला वाटा उचलत असे. वाढणारे वजन, सुंदर त्वचा आणि वर सांगितलेल्या सर्व विषयांचे सार इथे तोंडी लावण्यात येत असे. डायटिंग हा विषय भूक वाढवण्याचा जालीम उपाय मानला जाई. बारीक होण्याची कल्पना करात; डोळे बंद करून, डोके काढून ठेवले नसेल तर ते 'पॉज' करून हाताला लागतील ते चिप्स, भजी, वडे इत्यादी हलके पदर्थ जमतील तेवढ्या वेगाने पोटात भरून घेणे म्हणजे डायटिंग असे आत्ताच सापडलेल्या एका पुराव्यावरून समजले. असे डायटिंग जवळजवळ ८० % महिला आयुष्यात एकदातरी करत.
हा भाग पार पडल्यावर जड शरीराने व डोक्याने सगळ्या एकमेकींचा निरोप घेत. यावेळच्या संवादात ' आज नवर्याला खिचडी की ब्रेड सूप ' हा विषय आवर्जून असे.
अशा या गेट्टूचा प्रसार तत्कालीन सर्व देशांमध्ये झालेला आढळून येतो.
प्रस्तुत लेखात दिलेली माहिती भारतापासून बर्याच अंतरावर राहाणार्या एका छोट्या देशातल्या छोट्या गावात राहाणार्या छोट्या मुलीच्या ई-डायरीत सापडली आहे. गेट्टू मधल्या एकाही कार्यक्रमात काहीही चमकदार कामगिरी दाखवता न आल्याने तिला कळपाच्या गेट्टू मधून काढून टाकण्यात आले होते असे तिने आनंदाने नमूद केले आहे.
या संदर्भात अधिक संशोधन चालू आहे. होतकरू संशोधकांनी आपल्या संशोधनवृत्तीची चुणुक या लेखाच्या प्रतिक्रीयांमध्ये दाखवावी.
हा हा हा.. सॉलिड लिहिलंय.. भन्नाट !!!
ReplyDeleteatishay sundar ulagadalel, sopya sahaj bhashet ughadlel likhan malahi umajal.maze avadate gulabjam pahun man trupt zale. bhuraa chatni mule mazyach navhe sarv navryanchya bechav jibhela chav yeil
ReplyDeletemast lihilayas :-)
ReplyDeleteekadam sahi!
ReplyDelete