जग मोठं झालं आणि ते बघण्याच्या नादात मनाच्या संवेदनांच्या खिडकीचे दार आपोआप कधी बंद झाले ते कळालेच नाही. सगळे जगणेच साउंडप्रुफ झाले !
निवडक आवाज आणि निवडक प्रकाशकिरणे ती काय आत पोहोचायची. तुला सांगते त्या जगात मुखवटा कोणता निवडायचा यात पण खूप मोठा चॉईस होता. एकेक लावायचा नि आरशात बघायचे मी. कधी नाक टोचायचे ; कधी डोळे झाकले जायचे तर कधी त्या मुखवट्याला कानच नसायचे..! शेवटी एक मुखवटा पक्का बसला. एवढा पक्का की मी त्याचेच डोळे घेतले...तोंड ; नाक ; कान आणि हो कशाचाच स्पर्श न होणारी कातडी सुद्धा !
असा हा मुखवटा लावून मुखवट्यांच्याच जगात वावरताना ती बंद झालेली खिडकी विसरलीच गेली. त्यातून कधीमधी येणारी वार्याची झुळूक, चाफ्याचा दरवळ, पाखरांची रांग..पिंपळाची सळसळ..सगळं मग बंदच झालं.
हे तसं फार काळ चालणारं नव्हतंच. पाणी साचून डबके तयार व्हायला सुरुवात झाली होती. बंद मनाच्या दाराशी अस्वस्थ पावले वाजू लागली. इतके दिवस गोंडस वाटणारा मुखवटा टोचायलाच लागला..त्याखाली दबलेले माझे डोळे,नाक्,कान सुटकेसाठी तळमळू लागले. अती झालं !
अचानक एका क्षणी ती बंद खिडकी किलकिली झाली. सूर्याचा प्रखर प्रकाश त्वचेला चटका देऊन गेला. हरवलेले भान आले. खिडकी अजून पूर्ण उघडायची भितीच वाटू लागली. भिती खरं तर प्रकाशाची नव्हती; स्वतःच्या कुरूपतेची आणि दुबळेपणाची होती ! समुद्राच्या उसळत्या लाटा, सुसाट वारा, प्रखर सूर्यप्रकाश यांच्याशी पुन्हा एकदा मैत्री करता येईल मला ? पूर्वीसारखीच ?
कापर्या हातांनी ऐकलं नाही. खिडकी उघडली ! त्याचक्षणी समोर दिसला फुललेला चाफा..निष्पर्ण पण फुलांनी डवरलेला..आणि दिसल्या माझ्या सगळ्या ऋतूंच्या हरवलेल्या खुणा..ज्या लाटांचे भय वाटायचे त्याच लाटांनी दारापुढे घातलेली शिंपल्यांची रांगोळी......स्वतःचीच ओळख पटतेय की हळुहळू ! एकेकाळी जिवापाड जपलेल्या वेलींचे लडिवाळ हट्ट, हातात हात घालून गाणारा सळसळता पिंपळ आणि पावलापावलाला आधार देणारं निळंभोर आभाळ ! एका टेकडीवरून दूर नजर टाकली..काढून फेकलेला मुखवटा दुनियेला फितूर झालेला ! काळजीचं पाऊल वाजलं अन् भुर्रकन एक निळं पाखरू माझ्या खांद्यावर येऊन बसलं. आश्वस्त. निर्भय. हाच क्षण होता स्वतःला स्वतःच्या अधीन करण्याचा...!!
तेव्हापासून मी माझीच आहे. मुक्त.. निर्मळ.. वाहाती..
सगळी दारं, खिडक्या आता आठवणीने उघड्या ठेवते..हो..दाराशी येणारे कोणतेच क्षण बंद दार बघून उलटपावली जायला नकोत !
I took a premature retirement from a very senior position in M&M.
ReplyDeleteAt the time of retirement what drove me to this decision is precisely put in words by you.
Thank you