Sunday, 13 June 2010

ग्रीस भाग ५

प्रवासी कंपनीची गाडी काल सांगितल्याप्रमाणे वेळेवर घ्यायला आली. इथून जहाजावर. मग अथेन्सला जवळ असणारी ३ बेटं आम्ही आज बघणार होतो. बसने ४० मिनिटात मुख्य बंदरावर सोडले. हे जहाज म्हणजे एक भले मोठे हॉटेलच दिसत होते. आमच्या सोबत अजून ३०० सहप्रवासी होते. त्यात कालचा मायदेशी लोकांचा गट पण होता... ह्म्म्... छोटीसी ये दुनिया...! बाकी जपानी पर्यटक होतेच. इजिप्तचा पण एक गट होता. स्पॅनीश आणि जर्मन गट पण होते. स्वतंत्रपणे आलेले आम्ही दोघेच!

जहाजावर चढतानाच आमचे स्वागत पारंपारिक ग्रीक पोषाख केलेल्या एक ग्रीक जोडप्याने केले. असे दिसतात तर ग्रीक लोक!!! प्रसन्न सकाळ होती. सर्वात वरच्या मजल्यावर जाऊन बसलो. खानपानाची सोय होतीच. एवढ्यात सूचना ऐकू येऊ लागल्या. फ्रेंच, स्पॅनिश, जपानी आणि इंग्रजी मधून पण 'धागेनातिनकधिन्'च्या ग्रीक उच्चारात!

दिवसभराचा कार्यक्रम, जेवणाच्या वेळा, बेटांवर किती वेळ थांबता येणार होते, खरेदी कुठे करायची, काय करायची वगेरे... आणि एक महिती कळाली. संध्याकाळच्या परतीच्या प्रवासात ग्रीक नाचगाण्याचा कार्यक्रम आहे. मस्त!

जहाज निघाले. इतक्या दिवसांपासून मनात घोकत असलेला ग्रीक सागर प्रत्यक्ष बघतेय यावर विश्वासच बसत नव्हता. जगातला सर्वात निळा, सुंदर असा हा एजियन समुद्र. शाईएवढे निळे पाणी... हात बुडवला तर निळा होईल की काय असे वाटत होते! जितके निळे तितकेच पारदर्शी... समुद्राचा तळ दिसू शकतो हे पटले. अजून शब्द नाहीत. फोटो बघून काय ते समजा.
Samudra
Samudra Ani Akash

पहिले बेट आले हायड्रा. पर्यटन हा इथला मुख्य व्यवसाय. त्यामुळे बहुरंगी, बहुढंगी. अगदी छोटे. अरूंद गल्ल्या, पायर्‍यानी बांधलेले चढउताराचे रस्ते आणि वैशिष्ट्यपूर्ण घरं.
Betavarchi ghare
Wada
छत लाल कौलांचे, भिंती शुभ्र आणि दारे खिडक्यांना समुद्राचा निळा रंग.... हे बेट चित्रकारांना का खुणावतं ते समजलं.
Chitra

इथले नैसर्गिक दगडापासून तयार होणारे दागिने, शोभेच्या वस्तू आणि आपल्या खादीसारखे पण थोडे नरम असणारे कापड प्रसिद्ध आहे. दुकानांमध्ये डोकवलो तर अतिमहाग असणार्‍या या गोष्टी थेट राजस्थान किंवा गुजराती बाजारपेठेतल्या वाटत होत्या. एकाही दुकानदाराने आम्हाला दुकानाचा आतला फोटो घेऊ दिला नाही.

तिथे फिरण्याचा वेळ संपला, तसे जहाजाने हाक मारली. थोड्या वेळात पुढच्या बेटावर उतरलो. पोरस हे सहलीतले सर्वात छोटे बेट. पाईन आणि लिंबाच्या असंख्य झाडांनी बेटाला पाचूचा रंग दिला आहे. इथे टेकडीवर एक क्लॉक टॉवर आहे. तेथून अथांग पसरलेला एजियन, मधुनच डोके वर काढलेले चिमुकल्या बेटांचे सुळके असे सुंदर दृश्य दिसते. ताजे समुद्रान्न हे इथले मुख्य आकर्षण. आम्ही ते सुंदर सजवलेले माशांचे (अजून कशाकशाचे होते पण त्या समुद्री जीवांचे नाव माहीत नाही!) प्रकार बघूनच समाधान मानले.
mase

जहाजावर जेवण वाट बघत होते. सर्वांच्या डिश सामीष अन्नाने भरल्या जात होत्या. केवळ आम्ही दोघेच शाकाहारी होतो. पण आमच्यासाठी खास शाकाहारी मेन्यू होता. वाफवलेल्या शेंगा, ऑलिव्हच्या तेलात केलेलं वांग्याचं अप्रतिम भरीत आणि ब्रेड. आम्ही जेवताना समोर जहाजावरचा वाद्यवृंद आमचे मनोरंजन करत होता. कसलेल्या गायकांकडून जपानी, स्पॅनिश, अरेबिक आणि हिन्दी सुद्धा लोकप्रिय गाणी गायली जात होती. हास्यविनोद, नृत्य, गायन यात वेळ चटकन निघून गेला. जहाज एजिना बेटाच्या धक्याला लागली.
Bet

हे अथेन्स जवळचं सर्वात महत्त्वाचं आणि सर्वात मोठं बेट. ८४ चौ.किमी. भूभाग असणार्‍या या बेटावर ई.स. पूर्व दुसर्‍या शतकापासून मानववस्ती आहे. समुद्रातल्या मोक्याच्या जागेमुळे प्राचीन काळापसून व्यापारी व सामरिक दृष्टीकोनातून हे बेट अत्यंत महत्वाचे मानले जाते.

इथे पिस्त्याची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. उत्पन्नाचे मुख्य साधन पिस्त्याचा व्यापार हेच आहे.
Piste

या बेटवर फिरण्यासाठी एक बस होती. तिने समुद्राच्या काठाकाठाने फिरत बेटावरच्या मुख्य चर्चपाशी गेलो. जुन्या काळी हे बेट ३६५ छोट्या छोट्या चर्चच्या ठिपक्यांनी सजलेले असायचे. आम्ही बघितलेले चर्च मात्र आधुनिक काळातले होते. इथल्या चर्चना टॉवरच्या ऐवजी गोल घुमट असतात. वास्तू खूपच देखणी होती.
Charch

तिथून पिस्त्याच्या बागा बघत परत जहाजापाशी आलो. ताजे खारवलेले स्वादिष्ट पिस्ते आणि ग्रीक मिठाई खरेदी केली आणि जहाजावर परतलो.

थोड्याच वेळात ग्रीक वाद्यवृंदाने आपला कलाविष्कार सुरू केला. आपल्याकडचे वारली लोक करतात त्या तारपा नृत्यासारखेच यांचेही लोकनृत्य असते. नर्तकांनी प्रेक्षकांनाही कसबाने त्यात सामील करून घेतले. मधूनच एखादी धून भारतीय संगीताची आठवण करून देत होती.
Nrutya

अथेन्स दिसायला लागले. आणि आमच्यासोबतच्या भारतीय प्रवाशांना ओळख दाखविण्याचा उमाळा आला. जुजबी ओळख होईपर्यंत अथेन्स आलेसुद्धा. जहाजावरून खाली उतरताना सर्वात वरच्या मजल्यावर उभे राहून एक वादक निरोपाची धून वाजवित होता. एजियनच्या निळाईला निरोप देताना या संगीताच्या पार्श्वभूमीवर मन क्षणभर कातर झाले.
Samudra

उद्या इथला शेवटचा दिवस. दोन महत्त्वाची कामे राहिली आहेत. अ‍ॅक्रोपोलिस म्युझियमला भेट आणि प्लाकामध्ये खरेदी!

No comments:

Post a Comment