Sunday 13 June 2010

ग्रीस भाग अंतिम

सर्व वाचकांना एक सांगावेसे वाटते. हे मार्गदर्शक प्रवासवर्णन नाही. चार दिवस एका नव्या देशातल्या नव्या शहरात राहिले. माझ्या छोट्याशा झोळीत जमतील तेवढे अनुभव जमा केले. ती गाठोडी तुमच्यासमोर रिती करत आहे. व्यक्तिगणिक हे अनुभव वेगवेगळे असू शकतील.

परवा राहून गेलेली इथल्या पुरातत्त्वसंग्रहालयाची आणि अ‍ॅक्रोपोलीस संग्रहालयाची ही एकत्र ओळख.

शहराच्या एका गजबजलेल्या भागात राष्ट्रीय पुरातत्त्व संग्रहालयाची विशाल इमारत उभी आहे. इ.स. १८६६ ते १८८९ एवढा काळ प्रचंड मेहनतीने उभे केलेले हे संग्रहालय २०,००० पेक्षा जास्त प्राचीन पुरावे पोटात घेऊन उभे आहे. ग्रीक सभ्यतेच्या सुवर्णकाळापासून रोम साम्राज्याच्या पतनापर्यंतची कथा सांगणारे पुरावे इथे जतन केले आहेत.त्यात आजूबाजूच्या बेटांवर आणि युरोपात अन्यत्र सापडलेली संगमरवरी शिल्पे, टेराकोटाची तेव्हा वापरात असणारी भांडी, चलनात असणारी सोन्याची नाणी, वेगवेगळी शस्त्रे, चिलखते आणि सोन्याचे दागिने सुद्धा आपल्याला बघायला मिळतात.
National Musium

दारातून आत जाताच उजवीकडच्या पहिल्या कक्षात गेलो. सुंदर घडवलेली आणि नक्षीकाम केलेली ही भांडी काही हजार वर्षांपूर्वीची आहेत यावर विश्वास बसत नव्हता. खाण्याची, पिण्याची, शिजवण्याची, साठवण्याची अशी वेगवेगळ्या आकाराची हजारो भांडी होती. काही भांडी धड स्वरूपात सापडली तर काहींच्या ठिकर्‍या सापडल्या. त्या जमा करून, सांधून ठेवणार्‍या कारागिर शास्त्रज्ञांना मनापासून सलाम करावा वाटला.
Bhandi

संगमरवरी मूर्त्या काही देखण्या तर काही खूप ओबडधोबड वाटल्या. मला त्यातले फार काही कळत नाही... पण त्या शिल्पांचा मनावर कोणताच ठसा उमटला नाही. ह्म्म, एक ब्रांझचा पुतळा मात्र मनात घर करून गेला. घोड्यावर बेफाम सुटलेला एक छोटा शिलेदार होता तो. त्या छोट्याशा चेहर्‍यावरचे भाव, कृतीतला घोड्याशी एकरूप झालेला तो आवेश! हाच आवेश आजच्या मनात पण असाच तर निर्माण होतो! मन, भावना या गोष्टी निर्माण करणार्‍या जादूगाराचे परत एकदा अप्रूप वाटले.
Ghodeswat

पुढच्या कक्षात गेले आणि हरखले. नटण्याची, मिरवण्याची आणि सुंदर दिसण्याची प्रवृत्ती पण प्राचीनच की! समोर ५० कपाटांमधून तर्‍हेतर्‍हेचे अस्सल सोन्याचे अलंकार झळाळत होते. बांगड्या, अंगठया, हार, कर्णभूषणे, शिरोभूषणे, कटिभूषणे, जोडवी-विरुद्या-मेखला नि काय काय...! आणि तेही पुन्हा ई.स.पूर्व काळातले ! फारच मोहक गारूड होते ते.
Dagine

पुढच्या कक्षात अजून एक गोष्ट होती. त्या काळातल्या घरांच्या, वाड्यांच्या अगदी बारकावे दाखवणार्‍या छोट्या प्रतिकृती. पार्थेनन मंदिराचे बांधकाम कसे झाले ते दाखवणारी सुंदर प्रतिकृती तिथे होती. त्या काळात वापरल्या जाणारी यंत्र त्यात दिसत होती. पूर्वजांच्या कौशल्यापुढे नतमस्तक होऊन तिथून बाहेर पडलो.
Parthenan

अ‍ॅक्रोपोलीस म्युझिअम आहे पार्थेननच्या पायथ्याला. मेट्रोसाठी खोदकाम करताना प्राचीन नगराचे अवशेष सापडायला लागले तेव्हा ग्रीक सरकारने हा भाग संरक्षित केला. त्या जागेवर ही देखणी वास्तू उभारण्यात आली. या वास्तूचा पहिला मजला संपूर्ण पारदर्शक काचेचा बनवला आहे. तळमजल्यावर आजही सुरू असलेले उत्खननाचे काम आपल्याला आपल्या पायाखाली दिसते!
Utkhanan
Acro Musium

इथे मात्र फोटो काढण्याची मनाई होती. कडक तपासणी होऊन आत सोडले गेले. आत गेल्याबरोबर पहिलेच दालन होते ग्रीकांच्या प्राचीन सामाजिक जीवनाची माहिती देणारे. एक बाजू ग्रीकांच्या विवाहसंस्थेवर प्रकाश टाकणारी होती.

मुलगी लग्न झाल्यावर मुलाकडे रहायला जायची. हुंडा मानपान म्हणून सुवर्णालंकार, भांडी, अत्तर आणि मद्याच्या कुप्या आणि जनावरे दिली जायची. बायकांना गुलामांच्या थोडा वरचा पण दुय्यम दर्जा असायचा. लग्नविधी ४ दिवस चालायचा... त्यात डोक्याला फुलांच्या मुंडावळ्या आणि गळ्यात हार घातले जायचे!
क्षणभर मी 'ग्रीक' काहीतरी बघतेय हेच विसरले.

परवापासून नवरा अलेक्झांडर अलेक्झांडर करीत शोधत होता. त्याची काहीच खूण आत्तापर्यंत सापडली नव्हती. त्याच्यासारखेच इतर गुणीजनांचेही. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा पिता सॉक्रेटीस, प्लेटो आणि अ‍ॅरिस्टॉटल, अल्फा-बीटा जगाला देणारे सांख्यिकी, आर्किमिडीज सारखे भौतिकशास्त्रज्ञ, खगोल गणिती आणि महाकवी होमर सारखे विद्वानही कुठे नावाजलेले दिसत नव्हते. ही गोष्ट मनाला खटकलीच.

शेवटी सिकंदर-अलेक्झांडर द ग्रेट चे अर्धवट राहिलेले संगमरवरी मस्तक दिसले आणि मनातला विषाद अजूनच वाढला.

इतिहासाच्या सफरीने डोके जड झाले होते. प्लाका मधून एक चक्कर मारली पण काही खरेदी करण्याची ईच्छा झाली नाही. पार्थेननचा दुरूनच निरोप घेतला. विमानात पूर्ण प्रवासात डोळ्यापुढे गेल्या चार दिवसाचा चित्रपट सरकत होता. पार्थेनन, एजियन ची निळाई, उत्खनन चालू असलेले वाडे, कुणा लेकीबाळीनी वापरलेले अलंकार आणि फुटकी गाडगी मडकी... कुणा उत्खनन करणार्‍या भारतीय विदुषीला (दुर्गाबाई?) अशा ठिकर्‍या एकदा सापडल्या. त्यांना स्पर्श करताच ती भावविवश झाली. तिने त्या ठिकरीला एक प्रश्न विचारला. तो प्रश्न आज मला उमजला होता... तिने ठिकरीला विचारले - "तू, ती मीच का गं?"

No comments:

Post a Comment