Sunday 13 June 2010

ग्रीस भाग ४

आजचा दिवस कालच्यापेक्षा खूपच वेगळा दिसत होता. ३ दिवसांच्या सुट्या संपल्याने बाजार, रस्ते लोकांनी ओसंडून वाहात होते. काल अंदाज केल्याप्रमाणे झीयस मंदीर बसमध्ये बसल्यापासून १५ मिनिटात यायला हवे होते. पण एव्ढ्या प्रचंड गर्दीतून बस रस्ता कापत होती हेच मोठे अशी परिस्थिती होती. बर्‍याच वेळाने आमचा आजचा पहिला थांबा आला.

झीयस ही ग्रीकांची पृथ्वी आणि आकाशाची देवता. हे मंदिर अथेन्स मधलं सर्वात जुनं आणि मोठं मंदीर. ई.स.पू. ६ व्या शतकात याचे बांधकाम सुरू झाले. त्यानंतर ग्रीक इतिहासातला धामधुमीचा काळ सुरु झाला. अनेक राज्यकर्ते बदलत राहिले. शेवटी ई.स.पू. १३२ मध्ये रोमन साम्राज्याचा भाग असताना मंदीर बांधणी पूर्ण झाली. प्राचीन मापदंडानुसार हे एक अतिविशाल मंदीर होते. एवढ्या प्रचंड शिळा वाहून आणने, कोरणे आणि चढवणे हे साधण्यासाठी किती कौशल्य आणि कष्ट करावे लागले असतील याची कल्पना करता येते. मंदिराच्या विशाल पायावर १०४ भव्य संगमरवरी स्तंभ आणि त्यावर कळस अशी रचना होती. त्यामध्ये झीयसची सोन्याची तशीच विशाल मूर्ती प्रतिष्ठापित केली होती.
Zeus Mandeer

मंदिराच्या प्रवेश शुल्क खिडकीवर २ आजीबाईंची सत्ता होती. सगुणाने गोड हसून हस्तांदोलन करून दोन्ही आजीबाईंना खूष करून टाकले. आम्हाला जवळचे जड सामान त्यांच्या जवळ सांभाळायला ठेवता आले!

खूप उत्कंठेने तिकीट काढून आज गेलो. समोर जे दिसले त्याने मन उदासच झाले. ज्या मंदिराचा एवढा वैभवशाली इतिहास वाचला होता, त्याचे जीर्णशीर्ण अवशेष समोर विखुरलेले दिसले. १०४ खांबांपैकी केवळ १५ खांब आज उभे आहेत. १६ वा खांब तुकड्यातुकड्यात आडवा पडलेला आहे. त्या चकत्या बघूनच एकूण त्याच्या वजनाची आणि उंचीचीपण कल्पना येते.
Zeus Mandeer

संपूर्ण परिसरात कडेने ऑलीव्ह आणि डाळिंबाची झाडे लावली आहेत. एकूणच अथेन्स मध्ये सगळ्या सार्वजनिक ठिकाणी बेवारस कुत्री आणि मांजरं खूप दिसली. इथे त्या भग्न अवशेषांवर मुक्तपणे निर्भय फिरणारी मांजरं बघून 'कोण जाणे कोणत्या पूर्वजांचे आत्मे आहेत!' असा गमतीदार विचार मनात आला.
त्या परिसरातून बाहेर पडताना अर्जेंटीनाचा पर्यटक आज्यांचा एक घोळका भेटला. आमचे भारतीय पोषाख बघून त्यांनी वेड्यासारखे आमचेच फोटो काढायला सुरुवात केली!!! त्यांच्यापासून सुटका करून घेऊन बाहेर पडताना दारातल्या आजीनं सगुणाला एक फुललेली डाळिंबाची डहाळी दिली. अशी आपुलकी मिळाल्याने छान वाटलं.

पुढचे ठिकाण क्रीडाप्रेमींसाठी तीर्थस्थान होते. जगातले सर्वात जुने ऑलिम्पिक स्टेडियम. प्राचीन काळी देवी अथीनाच्या सन्मानार्थ क्रीडाप्रकार भरवले जायचे. त्याचे यजमानपद अथेन्सकडे असे. सुरुवातीला इथे लाकडी बैठका होत्या. ई.स.पू. १४० मध्ये हेरोड्स साम्राज्यात ते संपूर्ण संगमरवरी करण्यात आले. इथे ५०,००० प्रेक्षक बसण्याची सोय आहे. ई.स. १८९६ च्या ऑलिम्पिक स्पर्धांसाठी याची पुनर्बांधनी करण्यात आली. आज विजेत्या खेळाडूंचे कौतूक, काही विशेष समारंभ यासाठीच ते वापरात येते. २००४ साली इथे झालेल्या ऑलिम्पिक मॅरेथॉनचा समाप्ती बिंदू हे स्टेडियम होते.
Olympic

इथे भारतीय पर्यटकांचा २०-२५ लोकांचा एक गट भेटला. आम्ही आपुलकीचे हसलो. पण अर्जेंटीनियन आज्यांना आवडलेले आमचे साधे, भारतीय दिसणे या आपल्या लोकांना बहुतेक गावंढळ वाटले असावे...!!! कोणीही बत्तिशी दाखवण्याची तसदी घेतली नाही! परदेशात पर्यटक म्हणून आलेल्या आपल्याच लोकांचा असा अनुभव नवीन नव्हताच.

असो. उद्या ग्रीक बेटांवर कसे जायचे त्याची चौकशी करून पुढच्या ठिकाणाला भेट द्यावी असे ठरवून बसमध्ये बसलो. समोर अजून एक प्रचंड मोर्चा आडवा आला. आज संसदेसमोर निदर्शने होणार होती. पोलीसांनी सगळे मार्ग बंद केले होते. रहदारी ठप्प झाली होती. आमची बस २ तास एकाच जागी उभी! वेळ वाया जात होता. पण ही गोष्ट हाताबाहेरची होती. शांत बसून रहिलो. रस्ते मोकळे झाल्यावर आधी एक रेस्टॉरंट गाठून भुकेल्या लेकीला खाऊ घातले. आम्ही पण पोटोबा केला आणि समोरच्याच प्रवासी कंपनीत बेटांवर जाणार्‍या सहलींचे आरक्षण केले.

एव्हाना दुपारचे साडेचार वाजून गेले होते. आमच्या नियोजनाचे बारा वाजले होते.आता जाऊन कोणतेही संग्रहालय पूर्ण बघता येणार नव्हते. एकच गोष्ट बघणे शक्य होते. संसदेसमोर दर तासाला होणारा गार्ड चेंज सेरेमनी. तिकडे गेलो. ठरलेल्या जागी दोन रक्षक चित्रासारखे उभे होते. पोषाखही प्राचीन योद्ध्यांसारखा. वेळ झाली. कुठून तरी त्यांची जागा घेणारे दुसरे रक्षक आले. समारंभ सुरु झाला. सगळ्या हालचाली स्लो मोशन मध्ये. बगळ्यासारखा पदन्यास. भावविरहीत चेहरे. या हालचाली, सांकेतिक भाषा यांना अर्थ असणारच. पण ते सांगणारं कोणी नव्हतं. जमलेली गर्दी काय मज्जा असे भाव दाखवत हसत खिदळत होती. टाळ्या वाजवीत होती. एखादे पार्श्वसंगीत असते तरीही गंभीर वातावरण तयार होऊ शकले असते. पण त्यांच्याकडे ती पद्धत नसावी.
Gard

पुन्हा एकदा रस्ते ओसंडून जात होते. आता नवीन काही बघण्याचा उत्साह राहिला नव्हता. शेजारी असणार्‍या बालोद्यानात सगुणासोबत भरपूर खेळलो. दमून निवासस्थानी परत आलो. उद्या सकाळी ७ च्या आत निघायचे आहे. प्रवासी कंपनीची बस इथून मुख्य बंदरापर्यंत घेऊन जाणार आहे. तिथून खूप दिवस स्वप्नात पाहिलेल्या ग्रीक बेटांवर जहाजाने जायचे. शुभरात्री.

No comments:

Post a Comment