Monday, 14 June 2010

असाही पाऊस

काल बिनवासाच्या मातीवर पडणार्‍या परक्याच पावसात भिजले आणि तुझी कडकडून आठवण आली....तुझ्यामाझ्या पावसाळ्यांची...

आठवतं सये, भर पावसात नदीकाठी ओच्यामध्ये रंगीत गारगोट्या गोळा करायचो आपण.. दातपडल्या तोंडात शर्यत लावून चिंचा कोंबणं..फुटक्या बांगड्यांच्या रंगीबेरंगी काचांचे तुकडे जमवून केलेले 'गुप्त खजिने'...माळवदावर भाकरीच्या कुस्कर्‍याबरोबर प्यायलेलं डेर्‍यातलं ताक..आणि देवळाच्या चिरेबंदी सावलीत मांडलेली भातुकली....कोणी टारगट भुताखेतांच्या गोष्टी सांगू लागला की आम्ही पळुन जायचो.. तू मात्र जणु खिळुन जायचीस तिथे..सोसाट्याचा वारा सुरू झाला की घरात दडून बसण्याऐवजी तुला घाई वार्‍याने पडलेल्या कैर्‍या वेचायची..! पाऊस सुरू झाला की आपलं फुगड्या घालत सुरू- " ये गं ये गं सरी.. माझे मडके भरी..." हे सगळे आठवणींचे थेंब झेलताना आज मन वाळलेली पानं भिजताना जशी चिरमटून जातात तसं कापरं झालंय...

आज कळतंय की ती सर खरंच आपलं ऐकत असते... उगाच नाही तुझं मडकं वाहून गेलं.. !

एकदा असाच सोसाट्याचा वारा आला आणि आपले ढग विखुरले..तुला तुझं..मला माझं आभाळ सापडत गेलं... किती फरक होता त्यात !आपल्याही नकळत वार्‍याने दूर दूर नेले...दोघीहे गेलो त्याचे बोट धरून..अधुनमधुन मागे बघत..मध्येच जुन्या खुणा दाखवत.. तुझ्या आभाळात नेहमीच इंद्रधनुषी रंग विखुरलेले असायचे...प्रत्येक रंग असोशीने मिरवायचीस तू...प्रत्येक रंगात हरवून जायचीस तू..... आणि मी फक्त माझ्या निळाईत बुडाले म्हणून चिडवत रहायचीस वाकुल्या दाखवत..तेव्हाही पाऊस मात्र दोघींचा असायचा..

अचानक एका वीज फितूर झाली आणि त्या फटक्यात कळले तुला... रंग खरा एकच.. बाकी सारे भास!!!! पावसासोबत वेड्यासारखी कोसळत गेलीस तू..

मोडून फुटून गेलीस तू..आणि दुरून तुला बघणारी मी पण !! माझे हात तुला देण्याचा खुळा प्रयत्नही करून पाहिला..तू नाकारलास तो आणि माझ्या हाताला लागल्या त्या गारगोट्या..रंगीत काचांनी रक्तबंबाळ केलं मला...चिरेबंदीत मिटून गेलेली तू जणू रंगांध झाली होतीस....उधळलेल्या भातुकलीला पाऊस निरागसपणे भिजवत होता..
त्या पावसाळ्यानंतरचा एकही पावसाळा 'आपला' राहिलाच नाही...

तरीपण प्रत्येक पावसाला तुझी एकतरी सर मागतेच मी..प्रत्येक रंगीत ढगाशी भांडते मी....कधीतरी त्याला माझा हट्ट पुरवावा लागेलच ! .आजही तुझ्या माझ्या हरवलेल्या पावसाची वाट बघतेय..एक उन्हाळा सरता सरता.. !

No comments:

Post a Comment