Friday, 21 May 2021

पाण्याकाठचंघर ५

नोकरीच्या निमित्ताने देश सोडून पहिल्यांदा बेल्जियममध्ये येऊन आता 14 वर्षे होऊन गेलीत. वर्ष दोन वर्षे रहायचं, काम संपलं की परत मायदेशात जायचं,असं करत आता तिसऱ्यांदा येऊनही दोन वर्षे झालीच! 'इथलं चांगलं तिथलं वाईट' किंवा 'तिथलंच चांगलं इथलं वाईट' या वाटेवरून गाडी कधीच पुढे निघून आली. आता 'तिथलं वेगळं इथलं वेगळं' या स्टेशनवर मुक्काम आहे. आणि हा थांबा फार चांगला आहे.
हे सगळं मनात येण्याचं कारण आजच पार्कात फिरताना सापडलेला चाफ्याचा भाऊ !
मला आठवतं सुरुवातीला इथल्या फुलांना वासच नसतो, मातीचा वास वगैरे फक्त देशातच, पाऊस फक्त आपलाच खरा,ऊन फक्त आपलंच मायाळू असे एक नाही शेकडो समज घट्ट चिकटलेले होते. एकदा मित्राने काय आणू देशातून असं विचारल्यावर मोगरा, निशिगंध, सोनचाफा ही फुलं आण असा हट्ट केल्याचंही आठवतंय!!! नारळाच्या करवंटीवर पाणी टाकलं की जो मातकट वास येतो त्याने व्याकुळलेलं आठवतंय. इथलं सापडलेलं पहिलं सुगंधी फुल म्हणून लवेंडर च्या पुरचुंड्या करून जपून ठेवलेल्या अजुनी आहेत!!!
मग हळुहळू इथल्या मातीशी नातं जुळायला लागलं. बोट धरून इथला निसर्ग दाखवणारे लोक भेटले. इथल्या लोकांच्या जीवनशैलीतही निसर्गाबद्दलची आस्था किती सहज आहे ते कळू लागलं. श्रद्धा, धारणा इथपासून आहार विहार, भाषा,आवडीनिवडी इथपर्यंत प्रत्येक गोष्टीत असणारे आविर्भाव कमी कमी होत गेले तसतसं मन अधिक मोकळं होतंय हे जाणवत गेलं. म्हणजे त्या जाणिवा संपल्या नाहीत तर त्यांचा विस्तार झाला. अनुभवाच्या पेटीत बंद असलेल्या जुन्या गोष्टींचे स्थान ढळू न देता नव्या गोष्टींना आपलं म्हणता येणं जमू लागलं.कारण नव्या सापडलेल्या गोष्टी कुठल्या तरी कारणाने आपल्याजवळच्या जुन्या गोष्टींशी जोडलेल्या निघतातच!
आताही पूर्वीसारखी देशातली फुलं आठवतातच. पण त्या मोगरा, रातराणी, निशिगंध,चाफा,सोनटक्का या आठवणीत व्याकुळ होऊन समोर असलेलं निसर्गाचं दुसरं देणं नाकारलं जात नाही. दर वेळी नव्या वासाचं फुल भेटलं की त्याला अरे तू तर आमच्या हजारमोगऱ्याचा भाऊ,किंवा मधुमालतीची बहीण किंवा कण्हेरीची मावशी असं आवर्जून नातं जोडलं जातं!!! देश कोणताही असला तरी तिथे वड पिंपळ उंबर कडुनिंब असतातच! थोडे वेगळे असतात एवढंच!
तर इथं बकुळीची जुळी बहीण लिंडन भेटली.रातराणीची ताई, बहाव्याचा धाकटा भाऊ स्पॅनिश ब्रूम सापडला. कवठी चाफा आणि हिरवा चाफा यांच्या मधला भाऊ आणि माझा लाडका मरव्याच्या कुळातला लवेंडर हे आणि असे अजून काही सुगंधी मित्र यांचा गोतावळा जमा झालाय ! त्यांच्या सुगंधानीही आमची कुपी भरून टाकली आहे! सुंदराचे धागे जुन्या जरीमध्ये घट्ट विणले जातच आहेत! दोघांनी मिळून हे असं वर्तमानात जगणं हा सुंदर प्रवास आहे!!















No comments:

Post a Comment