Friday, 5 June 2020

पिठलं भात

दुर्गाबाई भागवतांचं खमंग हे पुस्तक हातात येऊन वर्ष झालंय. त्यातल्या आज विसरल्या गेलेल्या साध्या सोप्या पौष्टिक पाककृती वाचताना मी ज्यूली अँड ज्युलिया मधली ज्यूली झाले होते! त्यांची आजीने नातीला सांगावं तशी रेसिपी सांगण्याची शैली,सहज मराठी बोलीभाषा, जो पदार्थ करतोय त्याबद्दलची माया, त्याच्याशी जोडलेली एखादी गोष्ट, लोककथा हे सगळं फार फार लोभस आहे. कधीतरी या सगळ्या रेसिपीज रोज एक करून अनुभव लिहायचे आहेत! त्यात मौज असेल !!! 😃
जोंधळ्याची भाजणी, गव्हाच्या भरड्याची खिचडी,बिनतेलाची फोडणी, केवड्याच्या कणसाची भाजी,ऊसाच्या रसाची दशमी,वेसवार, उकडपिंडी असे वाचतानाच 'अहाहा!' करायला लावणारे मोजकेच पदार्थ यात आहेत.
यात सीतेचे पोहे या नावाचं पोह्यांवर लिहिलेलं एक प्रकरण तर त्यातल्या गोष्टींमुळे खूपच खुमासदार झालं आहे!
तर आत्ता हे सगळं सांगायचं कारण असं. सध्या विरंगुळा म्हणून स्वयंपाक करणारे खूप लोक आजूबाजूला आहेत. तऱ्हेतऱ्हेचे फोटो,रेसिपी यांचा पूर आला आहे. त्यात उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय पदार्थांच्या लाटा महाकाय आहेत!
भारंभार मसाले,भाज्या,तेल तूप साखर मैदा यांच्या लाटा आदळत असताना वाचूनच जीव थकून जातोय!  या सगळ्या गोंधळात दुर्गाबाईंच्या मराठमोळ्या जुन्या अतिशय साध्या पाककृती मनाला केव्हढी तरी शांतता देतात.
परवा एका ग्रुपवर पिठलं भाताची चर्चा चालली होती त्यात खमंग मधली ही रेसिपी आठवली. घरातच असलेले मोजके जिन्नस वापरून एकाच भांड्यात होणारी ही पोटभरीची रेसिपी !
काही मैत्रिणींना त्याचे स्टेप बाय स्टेप फोटो हवे होते म्हणून जरा निगुतीने केलंय हे!
यात विशेष मसाले वा भाज्या नाहीत. करायला फार काही कौशल्य काहीच लागत नाही त्यामुळे सरळ पायऱ्या लिहिते.







भातावरचं पिठलं :
१) दोन वाट्या भात पातेल्यात शिजत घातला. त्यात मीठ आणि चमचाभर तेल घातलं.











२) अर्धी वाटी बेसन त्यात दोन मोठे चमचे दही , अर्धा चमचा हळद,एक चमचा तिखट, हिंग मीठ घालून फेटून घेतलं. हे  भज्यांचे पीठ करतो तसं सरबरीत करून घ्यायचं. त्यात चमचाभर कसुरी मेथी घातली. ( या पायरीवर तुम्ही अनेक प्रयोग करू शकता. दही न घेता दूध किंवा पाणी , कोथिंबीर मिर्ची चा गोळा, परतलेला कांदा, इ)







३) भात शिजत आला की हे मिश्रण त्यात ओतून चांगलं मिसळायचं.
(मी एरवी मिसळण्याचेही कष्ट घेत नाही! हॉट प्लेट बराच वेळ गरम राहते त्यात वरच्यावर छान शिजतं)








४) बेसन शिजल्याचा वास येतो. पिठाचा पोत बदलतो. मग वरून हवी तेवढ्या तेलाची,लसणाची वा हिंगाची फोडणी.










झाला तयार पिठलं भात.
खमंग मध्ये आधी बेसन भाजून घ्यायला सांगितलं आहे पण मी भाजून घेतलं नाही. चव चांगली आली. कदाचित भाजून घेतलं तर जास्त खमंग होईल.
हा कमी कष्टात,कमी जिन्नस वापरून, कमी वेळात  होणारा पदार्थ नक्की करून बघा! विशेष म्हणजे हे केल्यावर स्वयंपाकाचं एकच भांडं तुम्हाला घासावं लागणार आहे 😁

No comments:

Post a Comment