Thursday, 6 November 2014

मांजरगप्पा १

एके दिवशी सगुणाला घ्यायला काकुंकडे गेले तर खाली पायर्‍यांपाशी एका हेल्मेटमध्ये चार डोळे लुकलुकताना दिसले. दचकुन नीट बघितलं तर चक्क मांजरीची पिल्लं !!! जेमतेम ४-५ आठवड्यांची ! एक कुट्ट काळं,पोटाकडून पांढरं नि दुसरं लख्ख पांढरं पण ढग आल्यासारखे चारदोन काळे पुंजके असलेलं. दोघेही माझ्याकडे दबा धरून शत्रूकडं पाहातात त्या नजरेनं बघत होती ! मी पण मग विचित्र लुक देऊन तडक वर गेले. कन्यारत्न वाट बघत होतं. तिने परस्पर त्या मांजरांना दत्तक घेतलं होतं ! आणि काकुंनी पण ती पिल्लं मला द्यायचं ठरवून टाकलं होतं...

कथा अशी होती की भल्या पहाटे उठलेल्या काकांना दोन तीन कुत्री या पिल्लांच्या मागे लागलेली दिसली. त्यांची आई कुठेच दिसत नव्हती. पिल्लं मात्र जिवाच्या आकांताने ओरडत होती. मग काकांनी ती सोडवली. घरात आणली. पण घर ऐन रस्त्यावर. पिल्लं सांभाळणं शक्यच नव्हतं. पण त्यांचं काय करायचं न कळून चार दिवसांपासून त्यांना दूध, खाणं देणं चालू होतं. आम्ही नुकतेच नव्या घरात रहायला आलो होतो. तिथे भली मोठी अंगण म्हणावी अशी बाल्कनी आहे. त्यामुळे मांजर पाळण्याची माझी सुप्त इच्छा मी बोलायला लागले होते. लहानपणी घरी खूप मांजरं असायची. तेव्हापासून मांजरं लाडकी. मी त्या मांजरांच्या खूप गोष्टी सगुणाला सांगितल्या म्हणून तिलाही वाटायला लागलं की मांजर हवं ! आता तर आयती दोन पिल्लं समोर. झालं. फारशी मानसिक तयारी नसताना आम्ही पिल्लं घेऊन घरी आलो.

 मांजरांबद्दल अभ्यास नव्हताच. शहरात, ती ही फ्लॅट मध्ये मांजरं पाळायची म्हणजे काय याचाही विचार केला नव्हता. लहानपणी गावी घरात दहाबारा मांजरं असायची. पण तो अंगण, गोठा, मागचा वाडा, लिंबोणीचं झाड, २०-२२ गायी नि एक कुत्रा असलेला मोठा वाडा होता. एका संपन्न शेतकर्‍याच्या घरात मांजरं हवीतच. रात्री आम्ही झोपलो की आमच्या अंगावर उड्या मारणारी, पावसाळ्यात बेडकांशी खेळणारी, पणजी आज्जीच्या मांडीवर विसावणारी, दिवेलागणीला आई काकूच्या मागे मागे फिरत खाणं मागणारी, अंगणात निघालेल्या विंचू सापाला जागीच खिळवून ठेवणारी अशी मांजरं आठवणीत होती. त्यांच्याबद्दल घरात कधी तक्रार नाही. दिवेलागणीला कुत्र्यामांजरांचं खाणं हे घरातल्या बायकांना काम असायचं. कालच्या दुधाचं विरजण लावून, दुधाचे पातेले विसळून त्या पाण्यात अजून दूध घालायचं. मग मोत्या कुत्र्याची एक नि मांजरांची एक अशी केलेली मोठ्ठी भाकरी कुस्करायची. तोवर मांजरं एकीकडे नि कुत्रा एकीकडे शांतपणे वाट बघत बसायची. कुस्करून झालं की आपापल्या ताटालं मन लावून खायची. अधुनमधुन अमक्या मांजरीला ४ पिल्लं झाली वगेरे आजीकडून कानावर पडायचं. ती पिल्लं मांजर आपल्या तोंडात धरून घरातल्या घरात जागा बदलताना बघणं खूप मौजेचं असायचं. अशा सगळ्या आठवणी चांगल्याच होत्या. त्यामुळे जमेल आपल्याला असे वाटले नि मी मांजर घरी न्यायला तयार झाले. सगुणाच्या डब्याच्या पिशवीत दोन्ही पिल्लं घातली नि गाडीवरून घरी आणली.

 अंगणातल्या एका कोपर्‍यात त्यांना ठेवलं. बराच वेळ दोन्ही पिल्लं जागा बघत होती. वास घेत होती. लपुन बसली होती. मग एक चेंडू आणला आणि टाकला काळीकडे. जे घाबरलं पिल्लू ... धुम पळून कोपर्‍यात डोकं लपवून बसली. ! मग त्यांना दूध दिलं. ते चुटुचुटू दोन मिनिटात साफ ! मग अजून दिलं. पोळी कुस्करून दिलं. पोळी तशीच ठेवून दूध साफ ! अंगणार बागकामाच्या अवजारांसाठी जे जाळीचं कपाट होतं तिथे ती विसावली. त्यांनी निवडलेली जागा असू दे असं म्हणून आम्हीही रात्री झोपून गेलो. बेडरूमच्या खिडकीखालीच ही जागा असल्याने लक्ष ठेवणे सोपे जाणार होते. दोन दिवस चांगले गेले. आता ओळख वाढली होती. दोन्ही पिल्लं माझ्या नि सगुणाच्या मांडीवर चढून बसू लागली होती. तिसर्‍या दिवशी मी सैपाकघरात काम करत होते. तर अचानक मोठा फिस्स्स्स असा आवाज आला. तशी बाहेर धावले तर एक मोठं काळं मांजर पिल्लांवर हल्ला करत होतं. मोठ्यानं ओरडून त्याला हकललं. काळं पिल्लू थरथर कापत होतं. पांढरं भितीने तोंडातून आवाज फुटत नाही अशा स्थितीत होतं. मलाही हात लावू देईनात. काय करावं कळेना. मग लक्ष ठेवत राहिले. काळं मांजर पुन्हा मारायला आलं. त्याने मारलेली नखं ओरखडे दिसत होते. मग पिल्लांना घरात आणलं. एव्हाना सगुणाने दिलेली अनेक नावं बदलून झाली होती. शेवटी मनी नि माऊ ही नावं फायनल ठरली. पांढरी ती मनी नि काळी ती माऊ. या मनी नि माऊच्या काही गप्पा गोष्टी !!

No comments:

Post a Comment