Wednesday, 9 July 2014

पाकातले चिरोटे

आजची सुट्टी सत्कारणी लावावी म्हणून काहीतरी गोड पदार्थ करायचे ठरवले. घरात मैदा होता. बरेच दिवस झाले पाकातले चिरोटे केले नव्हते. मग तेच करावेत असे ठरवले. तासाभरात चिरोटे तयार होऊन व्हाटस्अप वर मैत्रिणींना फोटो टाकले सुद्धा ! बऱ्याच जणींनी रेसिपी मागितली. म्हणून इथे देतेय.
साहित्य : 
३ कप मैदा
३ टेबल्स्पून तूप (मोहन)
१  १/२ कप ताजे दही
२  टे स्पू तांदळाचे पीठ
चिमुटभर मीठ
१ १/२ कप साखर
तळण्यासाठी तेल किंवा तूप
कृती :
मैदा चाळून  घ्या. त्यात तूप चांगले कडकडीत गरम करुन घाला. चिमुटभर मीठ आणि दही घाला. मऊ पीठ मळून घ्या. हे पीठ १५ मिनिटे झाकुन ठेवा.
आता पाक करायचा. एका पसरट भांड्यात साखर घ्या. ती बुडेल एवढे पाणी घाला. मध्यम आचेवर उकळायला ठेवा . उकळी आली की त्यात वेलची पूड आणि केशर घाला. पाक  ५ मिनिटे उकळू द्या. थेंबभर पाक ताटात टाकून बघा. तो थोड्या वेळात घट्ट झाला पाहिजे. असा पाक तयार झाला की गैस बंद करा.
आता चिरोटे लाटायला घ्यायचे.
मैदा आता अजून थोडावेळ मळुन घ्या. पोळीला करतो तसे गोळे करून घ्या.  चिरोट्याच्या पोळीला मध्ये लावण्यासाठी साटं तयार करून घ्या. त्यासाठी तांदळाच्या पिठात तेल घालून मिसळून घ्या.
मैद्याचा एक गोळा घेऊन अगदी पातळ पोळी लाटून घ्या. ती बाजूला ठेवा. अशाच अजून दोन पोळ्या लाटून घ्या. आता पहिल्या पोळीला साटं लावून त्यावर दुसरी पोळी ठेवा. त्या पोळीलाही साटं लावून त्यावर तिसरी पोळी ठेवा. आता या तीनही पोळ्यांचा रोल करायचा. रोल करतानाही पोळी गुंडाळली की त्याला साटं लावून मग वरची गुंडाळी करायची. रोल थोडा घट्ट असावा. ढिला असेल तर चिरोटे तळताना सुटतात.
आता रोलचे पातळ काप करून घ्या.  कापाच्या ज्या बाजूला पापुद्रे दिसतायत ती बाजू हातावर हलकीच दाबून घ्या. नंतर हलक्या हाताने गोल किंवा लांबट आकारात लाटून घ्या. कढईत तेल किंवा तूप तापत ठेवा. तेल पूर्ण गरम झाले की गॅस मंद करा. आणि त्यात चिरोटे तळून घ्या. ते जरा कोमट असतानाच पाकात टाका.
चिरोट्यांचा दुसरा घाणा तळून होईपर्यंत पहिला घाणा पाकात ठेवायचा. आणि मग पाक निथळून एका चाळणीत चिरोटे गार होऊ द्यायचे. शक्यतो एकावर एक न येऊ देता. म्हणजे मऊ पडत नाहीत.
अशाच पद्धतीने सगळे चिरोटे तळून पाकातून काढून गार होऊ द्या. किंवा गरमागरम खायला घ्या.
या प्रमाणात मध्यम आकाराचे साधारण ४० चिरोटे तयार होतात. हे चिरोटे (उरले तर) ८ दिवस फ्रिजबाहेर किंवा १०-१२ दिवस फ्रीज मध्ये चांगले टिकतात.










No comments:

Post a Comment