Tuesday 17 December 2013

सुट्टी

आज सुट्टी घेतली..बर्‍याच दिवसांपासून मनात मुक्काम ठोकून असलेला थकवा नि कंटाळा झाडायचा होता.. मनात अनेक विषयांबाबत झालेला पसारा निवांत बसून आवरायचा आहे. एकामागोमाग एक रविवार आणि सुट्ट्या येतात निवांतपणाचं गाजर दाखवत,गाजावाजा करत आले की हजार महत्त्वाच्या, कधी कधी आत्यंतिक फालतू 'महत्त्वाच्या' आणि कधीकधी बिनडोकपणे न केलेल्या नियोजनाच्या कचाट्यात सापडून हरवून जातात.

 चला, आज निवांत पेपर वाचत चहा घ्यावा,हिरव्यागार रसरशीत भाज्याफळांना गोंजारून घरी आणावं,सोयीपेक्षा आवडीच्या स्वयंपाकात रमावं, गरम जेवावं, दुपारी  कपाटात रुसून पडलेल्या पुस्तकाची मनधरणी करावी नाहीतर चक्क ताणून द्यावी,मग मित्रमंडळाला जमवून मस्तपैकी गावगप्पा कराव्या, गप्पांच्या नादात कडाडून भूक लागली की पातेलंभर खिचडी शिजवून गप्पांसोबत हादडावी, वाटलंच तर टी व्हीच्या रिमोटवरची धूळ पुसावी नाहीतर जुन्याच सिनेमाचं पारायण करावं आणि दिवसभरातली आनंदाची;निवांतपणाची गुणगुण मनात घोळवत झोपून जावं.... किती साधं सरळ सोपं गणित ! पण आमचं गणित नेहमीच कच्चं ! कद्धीही जमत नाही !!!!

आज मात्र ठरवलं, आज थबकूया जरा.. मनाचे लाड करूया ! किती किती साठलंय मनात, जरा त्यावर हात फिरवला पाहिजे. काल परवा मित्राने विचारलंय, पुस्तक लिहिशील का ? म्हटलं विचार करते. लेकीला कितीतरी दिवसात नवीन गोष्ट सांगितली नाही, तिच्यासाठी करेन म्हणून अनुवादासाठी जपून ठेवलेलं छोट्या जॉनचं डच पुस्तक काढून पहिलं पान तरी वाचायचंय. कितीतरी चांगल्या बातम्या मनावर आदळून निघून गेल्यात. त्या आठवून त्यातलं सुख अनुभवायचं आहे. अधुनमधून मनात पडणारे उबदार आठवणींचे कवडसे कुठेतरी गोळा करून ठेवायचेत. जिवलगांना लांबच लांब वाहणारी पत्रं लिहायची आहेत. नव्याजुन्या गाण्यांची उजळणी, बासरीवर काही नवं वाजवणं आणि आत्ताची नवी गाणी नीट लक्ष देऊन ऐकणं हे करायचंय. दूरदेशातल्या मैत्रिणीला येसरआमटी फारच आवडली. घरात सामान जमलेलं असेल तर आमटीपीठ तयार करून शिदोरी पाठवेन म्हणते. नवी पुस्तकं सगळीच्या सगळी एकदम भोवताली मांडून वाचण्याचा क्रम ठरवायचाय. शेजारणीला दिवाळी अंक द्यायचेत, नि तिच्या अंगणातली दोन नवी झाडं बघून यायची आहेत. माझं अंगण लख्ख झाडून भरपूर वेळ लागणारी एखादी ठिपक्यांची रांगोळी काढायची आहे. भाच्यापुतण्यांचे मापाचे फ्रॉक कधीचे आणलेत. आता संक्रांतीसाठी या पंचकन्यांना सारख्या कापडाचे फ्रॉक किती गोड दिसतील ! काळं काठाचं इरकल कापड चार दुकानात शोधून कागदावर फ्रॉकचं डिझाईन तयार करून टेलरीणबाईंकडे जायचंय. अधुन मधून मैत्रिणीला खूप दिवसात न केलेला फोन नि  लघुसंदेश हे ही करून टाकू !

नाही नाही, ही कामांची यादी नाही. हे तर मनाच्या ऊर्जेचे स्त्रोत !! संपल्यासारखी वाटतेय ऊर्जा. आता उशीर नकोच. काय वाटतंय? एका दिवसात नाही होणार ? मग उद्यापण ! पुढच्या अनेक दिवसांसाठी लागणारी ऊर्जा साठवायला दोन दिवस लागतीलच. नाही का ?
तुम्ही काय करता अशी ऊर्जा मिळवण्यासाठी ?

3 comments:

  1. Maya I simply loved this post...:) agdi manatali list sort of I mean...thodi wegli tarihi sarkhi... :)
    BTW yesaraamti kaay bhangad aahe ??

    ReplyDelete
  2. aparna, yesaramtichi recipe detey..

    ReplyDelete
  3. ahaha,, kiti chhan lihile aahe! mastach, vachun man fresh jhale !

    ReplyDelete