Thursday 24 February 2011

सुंदर माझं घर ??

आमच्या शेतावर काम करणार्‍या पार्वतीमावशींच्या घरी गेले होते. पार्वतीमावशी तशी काळी, बुटकी, सुमार अंगकाठी त्यात काळ्या कुळकुळीत केसांना चोपडलेल्या तेलाला उन्हात काम करताना चेहर्‍यावर ओघळावे वाटायचे त्यामुळे एकदम तेलाची देवी दिसायची. हातात चमचम करणार्‍या बांगड्या, नाकात चमकी, कपाळावर दारू पिणार्‍या, दुसर्‍या बाईशी राजरोस संबंध ठेवणार्‍या नवर्‍याच्या नावाचे कपाळभर कुंकू, अंगावर बहुतेक हिरवी किंवा जांभळी किंवा गडद लाल अशा मळखाऊ रंगाची साडी. गळ्यात काळी पोत नि चार सोन्याचे मणी. अशा अवतारात कायम वावरणार्‍या पारवतीचं घर कसं असेल याची कल्पना करता येत नव्हती.

तिच्या घरी गेले नि एक सुखद धक्का बसला. जेमतेम १०० उंबर्‍याच्या आमच्या गावातलं पार्वतीचं घर असं चंद्रावानी लख्ख असेल असं खरंच वाटलं नव्हतं. चार पायर्‍या चढून मग साताठ माणसं चहा प्यायला बसू शकतील एवढं अंगण. चक्क झाडलेलं. शेणापाण्यानं शिंपलेलं. मग उजवीकडे आधी नहाणी. कामापुरता आडोसा केलेली. बाहेर पाणी तापवायची चूल. त्यातली सकाळची राख आणि कोळसे नीट ढीग करून ठेवलेले. आंघोळीच्या बादल्या आणि पाणी तापवायचं जर्मनचं भांडं उन्हात लखलख चमकत होतं. तुळशीची कुंडी ओलांडली की दोन पावलांवर सैपाकघर. साधारण तीन माणसं एका वेळी जेवायला बसू शकतील एवढं मोठं. कोपर्‍यात चूल. थेट वर धुराडं. जमीन स्वच्छ सारवलेली. पायाला मऊ लागेलशी. भिंती पांढर्‍या मातीनं लिंपलेल्या. चुलीच्या बाजूला फडताळ. त्यावर साताठ 'इस्टीलचे' डबे. खाली ताटाळं. त्यात मोजुन ५ ताटं. खाली अजून एक कप्पा. त्यात एका बाजूला साताठ वाट्या, डाव चमचे वगेरे अडकवलेले. चार कप नि चार बशा नीट दुरडीत ठेवलेल्या. चुलीच्या दुसर्‍या बाजूला सोन्याची वाटावीत अशी पितळेची चार भांडी. पाण्याच्या घागरी. एक माठ नि एक बादली. तिथेच तांबेपेले रचून ठेवलेले.

कौतुकाने पार्वती चहा करायला गेली. आणि मी बाहेर आले. दुसरी खोली ही घरातल्या तीन प्रौढ, दोन तरूण अशा पाच लोकांची बैठक, झोपण्याची खोळी, कपडे ठेवण्याची जागा, देवपूजेची जागा नि टी व्ही बघण्याची जागा. ती ही अशीच स्वच्छ ! कुठे जळमट नाही.साठेलेली धूळ नाही. पाली झुरळं नाहीत की मुंग्यांची रांग नाही. कपडे फडताळात घडी घालून ठेवलेले. भिंतीवर देवतांच्या तसबीरी. गांधीजी आणि बाळासाहेब ठाकरे पण. शेजारी शिवाजी महाराज आणि त्यांच्या बाजूला आमीर खान !
पार्वतीने आणलेला गोडमिट्ट चहा प्यायले नि तिच्या सासूशी गप्पा मारत बसले. घरातले सगळे सकाळी आठ वाजता न्याहारी करून नि डबे घेऊन कामाला जातात. शेतावर, फॅक्टरीवर मजुरी करतात नि संध्याकाळी सात साडेसातला घरी येतात. घरातले सगळे घरातली कामंही करतात. आता लवकरच पार्वतीला दोन सुना येणार आहेत म्हणून सगळे खुष होते.

दुसरा प्रसंग. एका मैत्रिणीचं एका मोठ्या शहरातलं घर. बर्‍याच दिवसांनी गेले होते. ही मैत्रिण दिसायला एकदम स्मार्ट. गोरीपान. भरपूर कमावणारी. आधुनिक कपड्यात वावरणारी. चार लोकांमध्ये बोलताना छाप पाडणारी. आत्मविश्वास ऊतू जाणारी. नवरा पण अगदी साजेसा केला. अनेक पार्ट्यांमध्ये सगळ्यांचे डोळे क्षणभर तरी या दोघांवर टिकत.

हिच्या घरी गेले. दारापुढे तीन चार दिवसांचा कचरा बिनझाकणाच्या डस्टबीन मध्ये ठेवलेला. त्याची दुर्गंधी ! दार उघडल्याबरोबर एक घाण भपकारा आला ! धुवून वाळत न घातलेल्या कपड्यांचा. पंखा लावला गेला. खिडक्या उघडल्या गेल्या. तेव्हा बरं वाटलं. हॉलमध्ये जमिनीवर सगळीकडे कारपेट होते. चकचकीत टी व्ही, सोफा, चार शोभेच्या कुंड्या, वॉल हँगिंग आणि पेंटीग्स खूप महागडी दिसत होती. त्यातले चित्र नेमके काय आहे ते कळतच नव्हते म्हणजे उच्च अभिरुची वगेरे असणार ! उत्साहाने मी घर बघायला सुरुवात केली. ती एकेक रूम दाखवत होती. हॉल बघून झालाच होता. सैपाकघर तसेच आधुनिक होते. बेडरूम प्रशस्त, हवेशीर आणि बाल्कनी लागून असलेली. मुलांची खोली पण रंगीबेरंगी आणि खेळण्यांनी भरलेली. ( तरी अजून मुलं व्हायची आहेत ! ) ती म्हणाली मी फ्रेश होऊन येते तोवर बस निवांत. मी म्हटलं मी तोवर चहा करते. मग मी सैपाकघरात गेले. कप घेतला, कपाच्या बुडाशी किटण साठलेलं होतं. दांड्यापाशी खूप मळ दिसत होता. चहासाखरेचे डबे शोधायला गेले तर डब्यावर एक मोठ्ठं झुरळ बैठक मांडून आपली मालकी दाखवत होतं. चमच्यांचा ड्रॉवर उघडला तर त्यातही कडेने झुरळाची विष्ठा आणि अंडी..दूध घ्यायला फ्रीज उघडला नि मळमळून आलं. एका वाटीतल्या भाजीवर फ्रीजमध्येही बुरशी आली होती. आंबट वरण बहुदा कालचे असावे. ते उघडेच होते. एका बाउलमध्ये काळी पडलेली कणिक होती. आणि चक्क फ्रीज मध्ये बटाटे आणि लसूण ठेवलेला होता ! ब्रेडचा पुडा आणि फ्लॉवरचा गड्डा यांच्यामागे दुधाचे भांडे होते. ते घेतले. चहात घातले. मग पिताना लक्षात आले की या दुधाला विचित्र वास लागलाय. कसाबसा चहा संपवला. मैत्रिण मात्र अगदी रिलॅक्स होऊन गप्पा मारत होती. या त्या वस्तूच्या किमती, कपडे, फर्निचर, कामाला असलेल्या दोन बायका कशा विश्वासू आहेत, नवर्‍याची नोकरी १० ते ६ वाली असल्याने तो किती निवांत असतो वगेरे वगेरे...

निघण्यापूर्वी फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेले. मोठे बाथरूम. शेवाळलेले. कमोडवर डाग ! फ्लश नीट चालत नाही. सर्वत्र केसांचे पुंजके. दाढी केल्यावर न धूता ठेवलेले दोन ब्रश. संपलेल्या टूथपेस्टच्या न फेकलेल्या ट्यूब्ज, अनेक प्रकारची अत्तरं नि साबणं नि शाम्पू नि अजून काय काय अस्ताव्यस्त आरशासमोरच्या टीच भर जागेत ठेवलेले. वॉशिंग मशिनवर आंघोळीच्या बादल्या नि त्यात भिजवलेले कपडे, आणि कळस म्हणजे घाणेरडे सॅनिटरी नॅपकिन्स कोपर्‍यात पडलेले !!!! पटकन बाहेर आले.

तेवढ्यात तिच्या बाल्कनीतून दिसणारा व्ह्यु बघायचा राहिलाय असा तिला साक्षात्कार झाला. माझ्यासमोर चपला आणून ठेवल्या. म्हणे खूप धूळ आहे तिथे ! तिचा तो घाणेरडा पसारा डोक्यात घेऊन घरी आले नि आधी आंघोळ केली.
पार्वतीच्या घरासारखी अनेक घरं पाहिली आहेत. अगदी एका झोपडी पासून चौसोपी वाड्यापर्यंत नि शहरातल्या वन रूम किचन पासून ते व्हिला पर्यंत. पण या माझ्या मैत्रिणीच्या घरासारखी घरं त्याहून जास्त पाहिली आहेत.

काही गोष्टी कशा डोक्यात जातात नि आपण काहीच करू शकत नाही ! पडद्यांना हात पुसून विशिष्ट भाग काळे झालेले असतात, बेसिनवरच्या आरशावर दात घासताना उडालेली रांगोळी असते, आरशाला टिकल्या चिकटवल्याने पडलेले डाग, कळकट कपातुन आलेला चहा, पाणी प्यायच्या भांड्याला लटकणारा लांबलचक केस, ड्रॉवरमध्ये नांदणारी झुरळं, कपड्यांचा घाणेरडा कुजका वास, फ्रीजमध्ये येणारा वास, केवळ हवा घरात खेळू न दिल्याने घरभर असणारा कोंदट वास....

ह्म्म... लक्षातच येत नसेल का हे घाण आहे, आरोग्यासाठी खूप वाईट आहे म्हणून ? की सवय होते ? की कसे मॅनेज करावे, कसे स्वच्छ करावे हे कळतच नाही ? बहुतेक असेच काहीतरी असावे.
यावर खरंच खूप सोपे उपाय असतात. फार वेळखाऊ पण नसतात. ते लक्षात येणे महत्त्वाचे. मनात आले हे तुम्हा सर्वांशी शेअर करावं. घर स्वच्छ ठेवण्यासाठीच्या टिप्स माझ्या आंतरजालीय मित्रमैत्रिणींकडून घेऊन एकत्रितपणे इथे देईनच.

5 comments:

  1. सर्व डोळ्यासमोर तरळून गेले बापरे तुम्ही तिथे चहा पण पिली आश्चर्य आहे. मी तर उपास आहे सांगून कदाचित बाहेर पडलो असतो. कधी रेशन वरचे एकदम स्वस्तातले तांदूळ शिजत असताना वास घेतला आहे का ? एकदम भयानक असतो. माझ्या जुन्या घराच्या शेजारी एक जोडपे होते त्यांच्याकडे तुम्ही सांगितले त्याप्रमाणे सर्व काही होते. कदाचित त्या लोकांना समजतचा नाही कि आपण अशा स्तिथीत राहतोय ते. Horrible !!!
    तुमचे लेखन चांगले वाटले...

    ReplyDelete
  2. mi hiking chya nimittane gramin bhagatun khup bhatakat asto. tumhi mandlela mudda mala punha punha janavato. aahe tya paristhitit samadhanane, anandane, kashtane, ani netakepanane jagnari khup manase disatat. kahi na kahi karnane asamadhani rahanarya bahutek shahari mansanpeksaha hi manse mala khupach shrimanta vatatat...

    ReplyDelete
  3. आपण अल्पशिक्षित गावाकडील गरिबाघरची स्वच्छता आणि तुलनेने शहरी श्रीमंत आणि सुशिक्षित घरातील गलिच्छपणा यांचे चित्र व्यवस्थित उभे केले आहे. मला येथे मुंबईतील एका ओळखीच्या शास्त्रद्न्याच्या घरी किती अस्वच्छता पाहायला मिळते, याची आठवण झाली. ते शौचगृहात पाण्याचा फारसा वापर करत नसत, आणि त्या कारणाने त्यांच्या घरात पाउल टाकताच तो घाणीचा भपकारा नाकात भरून जाई.
    BTW, मी आपल्याला आपण लिहित असलेल्या डच बालकथांबाबत एक विनंती केली होती, त्याचे उत्तर मला मिळाले नाही. आपला इमेल आयडी मिळेल काय ?
    मंगेश नाबर.

    ReplyDelete
  4. mannab

    pratisadabaddal dhanyavaad. :)

    aapala mail id kaLava. me mail karen.

    ReplyDelete
  5. My imel id is mangeshnabar@gmail.com
    Mangesh Nabar

    ReplyDelete