Friday, 14 January 2011

मन माझं गोगलगाय

मन माझं गोगलगाय
खुट्टं वाजता शंखात जाय

प्राजक्ताचा दरवळ घेऊन
रांगत पहाटवारा आला
शिंका येतील ! आल्या शिंका !!
नाक हाती शंखात पाय !
मन माझं गोगलगाय । खुट्टं होताच शंखात जाय

खुणावताना हिरव्या वाटा
मनास दिसतो केवळ काटा
काटा टोचेल ! टोचला काटा !!
मान फिरवून शंखात जाय
मन माझं गोगलगाय । खुट्टं होताच शंखात जाय

समोर फुटती लाट अनावर
सरसरून ये नभ धरणीवर
थेंब उडतिल ! कपडे भिजतिल
भिजेल डोकं ! भिजतिल पाय !!
मन माझं गोगलगाय । खुट्टं होता शंखात जाय

घुसुन बसावे शंखी आपुल्या
हळु काढावी बाहेर मान
इकडुन तिकडे सरपटताना
टवकारावे दोन्ही कान

विजा नि लाटा, झुळुक नि वाटा
बघुन नाचतो एकच पाय
उपयोग नाय
दुसरा पाय शंखात चिकटुन
पाय नाचरा ओढू जाय
मन माझं गोगलगाय
खुट्टं होता शंखात जाय

No comments:

Post a Comment