Wednesday 27 October 2010

पत्र म्हणजे काळजाचा एक तुकडा !

आज टपाल बघत होते. दोन बँकेची पत्रं, एक वीज बिल, ५ जाहिरातींची पत्रं ! सगळी छापील ! माझे नाव पत्ता पण ! किती दिवस झाले बरं हस्ताक्षरातला स्वतःचा पत्ता वाचून ?

पत्र या माध्यमाने भारलेले दिवस आठवले. जेव्हा मी एका सामाजिक संघटनेचे काम करत असे. उन्हाळा आणि दिवाळीच्या सुट्टीत शिबिरं असायची. आणि तिकडे जाऊन आल्यानंतर पत्रांचे पूर. साधारण १२ वर्षांपूर्वीच्या त्या पत्रांमधली वाक्य आजही काळवेळ न पाहाता डोक्यात घुमतात.

" मायाताई, तुझी खूप आठवण येते गं, शाळा छान चालू आहे, तुझ्या आईबाबाना नमस्कार "

" मायडे, भोसला मिलिटरी स्कूल ने बोलावलंय, जाऊया नं? "

" वादळात भरकटणार्‍यांना कोणतीच दिशा नसते. पण वादळाला दिशा देणार्‍यांची वादळंच वाट पाहात असतं "

" पाटणकरांच्या कविता मला तरी अश्लीलतेचे उदात्तिकरण करणार्‍या वाटतात. तुला का आवडतात त्या ? "

" उदगीरचे शिबीर छानच झाले. १३० प्रशिक्षार्थी संख्या होती. समारोप आणि संचलन जोरदार "

" प्रेमात पडलेय मी मायडे, आज कळाले कोवलनास्तव कण्णगिचे ते तिळतिळ तुटणे, दक्षाच्या यज्ञात सतीचे शिवशंभूस्तव विलीन होणे "

" माइ, मागच्या महिन्यात बापाला नेला पोलिसानी. पारध्याचं जिणं पापंच अस्तंय का गं ! "

" माया, बौद्धिकांच्या विषयांची यादी पाठवत आहे. वक्ते शोधून आमंत्रणं पाठवावीत."

" तुझ्याचसारखा जोडीदार मिळाल्याबद्दल अभिनंदन मायाताई, संसाराची घडी नीट बसली की पुन्हा कार्यात नव्या जोमाने उतराल याची खात्री आहे, शुभचिंतन"

" तुझ्यासारखी तरूण मुलगी मला पत्र लिहिते हे पांढर्‍या केसांचं महात्म्य समजू का ? "

" तुम्ही बुद्धट ( बुद्धिमान उद्धट ) बनत चालला आहात याची कल्पना तुम्हाला असेलच असे मी गृहीत धरते."

" शिक्षणसंस्थेचे महत्त्व पटावे असे काहीच गेल्या वर्षभरात घडले नाही. तरीही शेवटचे वर्ष म्हणून खर्डेघाशी का करावी ? "

" घरच्यांनी कमी मार्क्स मिळाल्याचं खापर आपल्या कामावर फोडलं होतं. बघा म्हणावं आता, विद्यापीठात तिसरी आले गं ! "


किती वेगवेगळे विषय, किती वेगवेगळी माणसं ! या सर्वांशी मी जोडलेली होते फक्त पत्र या माध्यमातून.
महिन्याला साधारण ४० पत्रांची आवकजावक. आलेल्या प्रत्येक पत्राला उत्तर देणे, पत्रांवर क्रमांक घालून नीट फाईल करणे, साधी पोस्टकार्ड पण मार्जिन आणि दिनांक वगैरे घालून नीटनेटकी ठेवणे हा जणू छंद झाला होता. दिवसभर कॉलेज, मित्रमैत्रिणींसोबत दंगा, संघटनेचे कार्यक्रम, घरी आल्यावर घरकाम, टी व्ही, अभ्यास हे सगळे झाल्यवर मी खास माझ्या पत्रविश्वात जायची. अगदी जवळच्या मैत्रिणींच्या पत्रांची पारायणं व्हायची. लांबलचक उत्तरे लिहून व्हायची, पत्रांमधून अंगावर पडलेली कामं करण्याच्या योजना कागदावर उतरायच्या आणि मग शांत डोक्याने झोप.
पुढे स्वतःचे लग्नही पत्रातून ठरवले. पत्रांच्या संख्येत वाढ !

अगदी पाचवीत असल्यापासून मी पत्र लिहायची. त्यामुळेच कदाचित पत्र हे व्यक्त होण्यासाठीचे माझ्यापुरते सर्वोत्तम माध्यम बनत गेले. जिवाभावाच्या सख्यांशी आणि सख्याशी रोजचा फोन संवाद शक्यच नव्हता. मग त्यांच्याशी जे काही शेअर करावे वाटेल ते डायरीत पत्र लिहून ठेवत असे. जेव्हा भेट होई तेव्हा या डायर्‍यांची अदलाबदल ! आमची नाती या डायर्‍यांमधल्या पत्रांनी मजबूत केली. या पत्रांनी विचारांचा पाया मजबूत केला. स्वतःला जे वाटतंय ते दुसरीला किंवा दुसर्‍यालाही तसंच वाटतं हे कारण आत्मविश्वास वाढविण्यासाठी फार मोठे होते. संघटनेच्या कामाबाबत ज्या काही शंका असत त्यांना उत्तरं पत्रातून मिळत असत. एकेक गोष्ट, जिला तत्त्व म्हणता येईल ती अगदी घासूनपुसून लखलखीत झाल्याशिवाय स्वीकारताच यायची नाही. मला कसं जगायचं आहे, भविष्यात काय करायचं आहे याची रूपरेषा या पत्रांमधून होणार्‍या चर्चांमधून ठरत गेली. अगदी प्रत्यक्ष भेटीत होणारे आततायी वादविवाद पत्र सांभाळून घेत असे. स्वतःची भूमिका लिहून पाठवणे यात खूप संयम आपोआप येतो. कुणाला दुखवायचं असलं तरी आणि मलमपट्टी करण्यासाठीही पत्राएवढं प्रभावी माध्यम नाही. कन्याकुमारीपासून कश्मीरपर्यंत वेगवेगळ्या भेटीत जोडली गेलेली नाती या पत्रांने टिकवली. माणसं समजावली. अपेक्षा, अपेक्षाभंग आणि अपेक्षापूर्ती म्हणजे काय हे शिकविले. स्वतःच्या भावना ओळखायला पत्रांनी शिकविले. मनातल्या विचारांना पत्रातून वाहून दिलं की कसं बरं वाटायचं. समोरची व्यक्ती माझं म्हणणं नक्की ऐकून, समजून घेईल ही खात्री असायची. मला तुझ्या सल्ल्याची गरज आहे, मार्गदर्शन हवे आहे हे सरळ सांगता यायचे.

आज कितीतरी दिवसांनी ती पत्रं आठवली. एका पेटीत नीट गठ्ठे करून ठेवलेला माझा खजिना ! पत्रातून जोडले गेलेले सगळे लोक आजही माझेच आहेत. अधुनमधून ओर्कुट, फेसबुक वर भेटतातही, पण त्या भेटीत काहीतरी कमतरता असते. मेलमध्येही ती निखळता नाहीच. वीज नसतानाही मनातले कागदावर उतरवण्याची अधीरता म्हणून मेणबत्तीच्या प्रकाशात लिहिलेली निळ्या अंतर्देशीय पत्रावरची गडद निळ्या शाईतली पत्रं, पत्रात वाद घालताना आपल्या मुद्द्याच्या समर्थनार्थ उतरवलेले पुस्तकातले उतारेच्या उतारे किती समृद्ध करून गेले, एका मैत्रिणीला मेघदूत हवं म्हणून बोरकरांनी अनुवादित केलेलं समश्लोकी समवृत्ती मेघदूत मी हस्ताक्षरात लिहून पाठवलं होतं आणि त्या लेखनाने मला किती आनंद दिला होता !, वयाने, अनुभवाने मोठ्या व्यक्तींनी कानउघाडणी करणारी पत्रं पाठवल्यावर ती पचवायला किती कागद खर्ची घातले होते ! माझे मी लग्न ठरवले हे घरात सांगितल्यावर उसळलेला भावनिक कल्लोळ घरातल्या घरात मी-बाबा, बाबा-मी, मी- आई अशी पत्रापत्री होऊन शांत झाला होता. सासूशी झालेले मतभेद पत्राने उलगडले होते, नवर्‍याशी सुरुवातीला होणारी भांडणं पत्रातून मिटली होती, परदेशात आलेले एका मित्राचे पत्र हे हजार मेल पेक्षा मोलाचे वाटले होते...

मग आता काय झाले ? पाडगांवकर म्हणतात,
पत्र म्हणजे कागदाचा एक तुकडा
पत्र म्हणजे काळजाचा एक तुकडा !
ते उमगलेलं असतानाही पत्र का नाही लिहून होत ? विचारांचं ओझं होतंच, काळज्या हैराण करतातच, अगदी काधीतरी आनंदही गुदमरून टाकतो पण ही सगळी ओझी वाटून नाही घेता येत. एखाद्या तात्विक मुद्द्यावर २४-२४ पत्रं लिहून काथ्याकूट केलेल्या मनाला आज त्याची गरजच वाटत नाही. हा आळस आहे की संवेदनशीलता कमी होतेय? स्वतः व्यक्त होण्यात कमीपणा वाटतोय की समोरच्या व्यक्तीने समजून घेतले नाही तर ही भिती वाटतेय ? कदाचित मनाचा हा संरक्षक पवित्रा असावा. मनाच्या गावातले तेव्हाचे सगळे लोक आपलेच आहेत ही समजूत जपायचा हा एक अट्टहास असावा का ?
एकदा स्वतःला पत्र लिहून विचारलं पाहिजे ! पत्रांच्या गावात लवकरच एक फेरफटकाही मारला पाहिजे.

6 comments:

  1. प्रत्यक्ष लिहिण्यानेच विचार सुसंबद्ध होतात असा माझा अनुभव आहे. ही बाब टंकलेखनाने साध्य करण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतात.

    ReplyDelete
  2. खरंय. माझंही पत्रांवर फार प्रेम आहे. परदेशात गेले होते तेंव्हा रोज नवर्‍याशी, आईशी स्काईपवर, फोनवर बोलणं व्हायचं, इमेल जायच्या - आणि तरीही भारतातून कुणीतरी येणार आहे म्हटल्यावर मी मला हाताने लिहिलेलं पत्र पाहिजे म्हणून हट्ट धरला होता :) पत्रातला संवाद आणि इमेल / फोनवरचा संवाद वेगळा पडतो.

    ReplyDelete
  3. tumhi khoop chaan lihta. paan evdi shudh marathi vachayla.. mala khup shram padto :) shabdhache arth samajtana, vakyacha arth sutun jaato.. mi sooda.. mazya baiko che hi vachtana vandhe zhaale.. thodi kaami shud marathi liha plz...amcha saathi...

    ReplyDelete
  4. सप्रेम नमस्कार.
    आपला लेख आवडला, अगदी भावला. खरं तर विषय माझ्या अगदी जिव्हाळ्याचा, पण हल्ली दुर्लक्ष झाल्यामुळे मनाच्या अडगळीत कुठेतरी पडला होता. आपल्या लेखामुळे पुन्हा त्याच्याकडे लक्ष गेले व पुन्हा ती बोच जाणवू लागली. पोस्टकार्डावर स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेल्या चौकशीच्या पत्राला जो आपुलकीचा गंध असतो तो कृत्रिम छापील 'Get Well Soon' शुभेच्छापत्रांमध्ये किंवा ईपत्रांमध्ये कसा जाणवणार? आज सर्वच गोष्टी कमी श्रमात व पैसे फेकून करण्यात हुशारी, स्मार्टनेस मानला जातो. हाती पत्र पाठवणार्‍याला आज अडाणी, जुनाट समजले जाते.
    आपल्या लेखातील वाक्यन्‌ वाक्य पटते. संवाद व उदाहरणे देऊन आपले विचार न ’शिकवताही’ स्पष्ट करण्याची आपली शैली फार आवडली. आपण परदेशात स्थायिक आहात का? पण तरीही आपली भाषा आजच्या मुंबई-पुणे किंवा महाराष्ट्रातील महाजालावर लिहिणार्‍या सुशिक्षित मंडळींपेक्षा कितीतरी अधिक साधी, सोपी, अप्रदूषित व अप्रभावित (unaffected) वाटली.
    काही चांगले लेखन वाचायला दिल्याबद्दल आभारी आहे.
    क०लो०अ०
    सलील कुळकर्णी

    ReplyDelete
  5. श्री अंशुमन,
    सप्रेम नमस्कार
    तुम्हाला माझे लेखन आवडले हे वाचून आनंद झाला. आवर्जुन प्रतिसाद लिहिलात त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. आता भाषेविषयी. इथे मी लिहिते ती माझी स्वाभाविक भाषा आहे. मी ज्या आणि जशा शब्दात विचार करते तेच इथे उतरवते. ती भाषा सोपी किंवा अवघड करायला गेले तर ते लेखन कृत्रिम होईल असे मला वाटते. आशा आहे की तुम्हाला हे पटेल. :))

    ReplyDelete