Wednesday 28 July 2010

सखीची गोष्ट

पावसाच्या नावाची माझी सखी होतीही पावसासारखीच. चंचल. लहरी. एक वर्षानेच मोठी होती तरी ताईगिरी आवडायची तिला. सखीचं घर कृष्णभक्तांचं. घरात सतत काहीतरी धार्मिक कर्मकांड चालत असायचं. सखीला मात्र ते आवडायचं नाही. तिच्या घरात 'तामसी' आहार चालायचा नाही म्हणून आम्ही आमच्या घरी लसणीची चटणी, कांदाभजी चापायचो ! सखीचे बाबा एक विक्षिप्त प्रकरण होतं. काकूंना खूप त्रास द्यायचे. अगदी मारहाणही चालायची. पण तरीही काकू मात्र सतत हसतमुख दिसायच्या. नवर्‍याचा उल्लेख 'प्रभूजी' असाच करायच्या. त्यामुळे सखीच्या मनात अजूनच चीड साठायची. बरं हे सगळे प्रकार मला सखीने कधीच नाही सांगितले. आईकडून, कधीतरी काकूंच्याच तोडून समजायचे. तिच्या घराबद्दल काही न बोलणे हा आमच्यातला जणू अलिखित करात होता. घरातल्या वादळात सखी जेव्हा कोलमडायची तेव्हा मी तिला आधार द्यायचे. माराच्या वळांवर औषध लावणे असो की माझ्याच घरी दोन दिवस मुक्काम असो. सगळे सहजतेने व्हायचे. काकूंची माझ्यावर माया होती. त्या पण माझ्याजवळ हिच्या हटवादीपणाबद्दल रडायच्या. मी अर्थात सखीची बाजू घ्यायची. माझे नि आईचेही सखीवरून वाद व्हायचे. पण मला सखी फार प्रिय होती.

कितीतरी वेड्यावयातल्या वेड्या गोष्टी आम्ही सोबत करायचो. मग ते 'दिलवाले दुल्हनिया....' बघून अस्तित्वात नसलेल्या प्रियकरांबद्दल हळवे होणं असो की भगतसिंगाचे चरित्र वाचून राष्ट्रसेवेची शपथ घेणे असो. नागपंचमीला मेंदी लावणे असो की कोजागिरीला रात्रभर गच्चीवर वेड्यासारखे अखंड गाणी गाणं असो.. कॉलेजातही आम्हाला सगळे हुशार वगैरे समजायचे. त्यामुळे मिळून दादागिरी करत असू दोघी.

आमचे घर सामाजिक कार्यकर्त्याचे.लहानपणापासून तेच सवयीचे झालेले. मोठ्या लोकांच्या वर्दळीतून,बघून ऐकून मलाही सामाजिक कार्यात पडायचं हे वेगळं ठरवावं लागलं नाही. मी लहाणपणापासून शिबिरांना-वर्गांना जायचीच. आता सखीही सोबत येऊ लागली. संघटनेच्या कामात बहरली. तिचे वक्तृत्व, नेतृत्वगुण बहरून आले. घरचा आधी असणारा विरोध कमी होऊ लागला. सखी समरसतेने कामात गढून गेली.

पण घरातल्या कर्मकांडाला, रोजच्या वादांना खूप कंटाळली होती. पदवीनंतर पुण्यात शिकायला गेली. मी लातूरलाच राहिले. पत्रातून होणार्‍या भेटीतून नवेनवे कळू लागले. एवढे दिवस आपण फारच बुरसटलेल्या विचारांच्या संघटनेत वेळ घालवला असा सखीला साक्षात्कार झाला. पुण्यात असणार्‍या विविध प्रयोगशील संघटनांच्या वर्तुळात सखी रमली. थोडे दिवस ती कम्युनिस्ट होती. मग समाजवादी झाली. मग तेही सुटले. विज्ञानवादी झाली. घरातल्या कर्मकांडाबद्दलचा मनातला तिरस्कार या विचारांसाठी पोषकच ठरला. तिच्यामते मी मात्र संकुचित विचारसरणीची वगैरे ठरू लागले. माझ्या कामात, विचारात स्पष्टता असल्याने तिच्या मतांचा थेट परिणाम झाला नाही पण कुठेतरी खूप दुखलं. हात हातातून सुटत चालले होते आणि काही उपाय दिसत नव्हता.

अधुनमधुन सखी भेटायची. भेटीचा शेवट मात्र चांगला नसायचा. माझ्या कामाबद्दल, विचारांबद्दल ती आत्यंतिक तुच्छतेने बोलायची. मी ही मग काहीतरी वार करून तिला घायाळ करून घरी परतायची. परत ती जायला निघेपर्यंत दोघीही अस्वस्थ असायचो. निरोप घेताना पुन्हा गळ्यात पडायचो. पण दरी वाढतच होती.

पुढे मी प्रेमात पडले. लग्न करून समविचारी नवर्‍यासोबत थोड्या वेगळ्या प्रकारच्या कामाला सुरुवात केली. सखी माझ्याच शहरात होती पण मला टाळायची. मी ही पुढचे शिक्षण नोकरी यात व्यस्त झाले. आईकडून बातम्या कळायच्या. सखी कुठल्याश्या संस्थेत प्रशिक्षण घेऊन व्यावसायिक सामाजिक कार्यात उतरली होती. परदेशी फंडांवर काम करणारी ती संस्था तिला बिहारमध्ये कामासाठी पाठवणार होती. सखीचा अभिमान वाटला नि काळजीही. तिला विचारले तर तिने मी काम करत असलेल्या संघटनेतील बिहारमधल्या माझ्या ओळखीच्या तिच्यामते स्वार्थी नि संकुचित मित्रमैत्रिणींचे पत्ते लिहून घ्यायलाही कडवट नकार दिला. मला त्याक्षणी तिची फक्त कीव आली. कोणती पट्टी तिने बांधली होती कळत नव्हते. अनोळखी प्रांतात ओळखीचे चार पत्ते जवळ असण्यात विचारसरणी वगैरे कसे आड येऊ शकतात ते समजत नव्हते. सखी गेली. पुन्हा वेगवेगळ्या वाटांवर आम्ही हरवून गेलो.

अचाऩ एक दिवस सखीचा फोन. 'प्रेमात पडलेय.. लग्न करतेय..दोन दिवस इथे आहे..भेटायला ये.' !! मी आनंदाश्चर्यात उडतच तिच्याकडे गेले. जे ऐकलं ते हादरवणारं होतं. सखी महिनाभराच्या ओळखीवर एका केरळी ख्रिस्ती तरुणाशी लग्न करायला निघाली होती. तो पण बिहारमध्ये त्याच्या संघटनेचे काम बघत होता. त्याच्या घरच्यांनी हिला आनंदाने स्वीकारले होते. आश्चर्य म्हणजे हिच्या घरच्यांनीही हिच्या हट्टापुढे हात टेकले होते. माझ्या डोळ्यापुढे लग्नाच्या अमीषाने झालेल्या धर्मांतराच्या नि नंतर झालेल्या ससेहोलपटीच्या केसेस येत होत्या. पण सखीचा सखा गांधीवादी नि निधर्मी होता म्हणे. हिला काही सांगण्यात अर्थ नव्हता. एकच सांगितले. " डोळसपणे निर्णय घे. कोणताही निर्णय घे. मी सोबत असेन. " सखीला आनंदात पाहून खरंच खूप समाधान वाटत होते.

दीड वर्ष सुरळीत गेलं. आईने एक दिवस बातमी दिली. 'ती माघारी आली आहे ! ' खूप हादरले. तशीच सखीकडे धावले. एरवी विजेसारखी तळपणारी माझी सखी लोळागोळा झाली होती. शारीरिक नि लैंगिक अत्याचाराने पूर्ण कोसळली होती. तिचा जगावरचा विश्वास उडाला होता. स्वतःवरचाही ! एवढया विकृत माणसाला वेळेवर ओळखू न शकल्याचे दु:ख, अपमान आणि घोर नैराश्य ! तो एकावेळी दोन तीन बायका घरात आणायचा. हिलाही मित्र आणण्याची 'लिबर्टी' दिली होती म्हणे ! याच्या विकृत वासना पुरवल्या नाहीत म्हणून मारहाण करायचा. भर रस्त्यात सखीवर गुंडही घालून झाले. कामाच्या ठिकाणी गोंधळ घालून झाला. सखी पोलिसात गेली. त्याच्या धार्मिक संघटनेचे लोक त्याच्याच पाठीशी उभे राहिले. सखी एकटी पडली. एकटी लढली. झुंजली. पण थकली. परत आली. घरानं आश्रय दिला. कोर्टकेस चालू झाली. पण ही पूर्ण उध्वस्त मनस्थितीत होती. आमच्यातली दरी कधीच संपली होती. मैत्री कशी असावी याबाबत मी तिला म्हणायचे." मी जगातला कितीही मोठा मूर्खपणा करून तुझ्याकडे आले ना; तरी मला खात्री आहे; तू म्हणशील, चल, हातपाय धुवून घे. स्वच्छ हो. मी तोवर वरणभात वाढते. खा. मग बोलू " आज थोड्या जागा बदलल्या होत्या एवढंच.

सखी उभी राहिली. महाराष्ट्रात नोकरी करायचे नाकारून बिहार मध्ये परत गेली. प्रसारमाध्यमांकडे गेली. त्यांनी हिला जनाधार मिळवून दिला. त्या विकृत माणसावरही वचक बसला. सखी स्वतःची जखम विसरून ( की विसरण्यासाठीच ? ) कामात गढून गेली. आता ती अधिक डोळस झाली आहे.

गेली चार वर्षे आमची प्रत्यक्ष भेट नाही. दोघींनी तिशी ओलांडली आहे. जेव्हा भेटू तेव्हा आमच्यातले तात्त्विक वाद असणारच आहेत. पण त्यांना बाजूला ठेवून हात हातात घेऊन एकमेकींना ' कशी आहेस गं ? ' असे जुन्याच आपुलकीने विचारण्याएवढी प्रगल्भता निश्चित आली आहे.

गेले दोनतीन दिवस सखी खूप आठवते आहे. ती वेगळ्या वाटेने गेली याचे आज काही वाटत नाही. कुठेतरी सल मात्र आहे. तिच्या 'त्या' निर्णयात मी ही आंधळीच झाले होते की ! थोडाही प्रयत्न नाही केला तिचे मन वळवायचा. ते झाले असते तर.......!

2 comments:

  1. गोष्य आवडली.
    जे झालं ते झालं पण अजूनही सखी ला सावरायला मदत कर.

    ReplyDelete