एक अळी होती. कुरूप, बुटकी नि लठ्ठ. तिला ना हात होते ना पाय. टिंबाएवढे मिचमिचे डोळे होते फक्त. दिवसभर इकडे तिकडे आपले अंग ओढत कशीबशी सरपटत रहायची. झाडाची पाने कुरतडून कुरतडून खात रहायची. ही अळी खूप भित्री होती. कोणाची चाहूल जरी लागली तरी अंग चोरून घेत एखादया पानामागे लपून बसायची. तिला वेगात पळता सुद्धा येत नसे. पण या अळीच्या डोळ्यात कुतूहल मात्र अपार होते. समोर येणारी प्रत्येक गोष्ट ती निरखून बघायची. जगात किती वेगवेगळ्या, सुंदर सुंदर गोष्टी आहेत असे तिला सारखे वाटायचे. आणि मग स्वतःची कुरूपता बघून तिला अजूनच वाईट वाटायचे.
एकदा अळीला एक गोगलगाय दिसली. तिच्यासारखीच हळुहळू चालली होती. अळीला वाटले, अरे! ही पण माझ्यासारखीच की! पण जेव्हा गोगलगाय जवळ आली तेव्हा तिला दिसले. गोगलगायीच्या पाठीवर तिचे सुंदर घर होते! आणि तिला दोन सुंदर शिंगंसुद्धा होती. वार्याची एक मोठी झुळूक आली नि गोगलगाय अलगद पाठीवरच्या घरात गुडुप झाली!! अळी आश्चर्याने बघतच बसली. या थंडगार वार्याने तिलाही थंडी वाजत होती पण तिला नव्हते असे सुंदर घर...
रात्री देवबाप्पाशी बोलताना ती म्हणाली, "मला कधी मिळणार असे सुंदर घर??" "बाळा, थोडी वाट बघावी..." देवबाप्पा म्हणाला. अळी तशीच थंडीत कुडकुडत झोपून गेली.
सकाळ झाली. मस्त सोनेरी उन्हे पसरली होती. अळी खूष होती. नवा दिवस दिसला की ती अशीच आनंदी असायची. अचानक तिच्या टिंबुल्या डोळ्यांपुढे काहीतरी सुंदर चमकले. बघते तर काय? एक कोळी किडा भराभर जाळे विणत होता. त्या जाळ्याचे चमचमणारे धागे दवबिंदू अडकून अजूनच सुंदर दिसत होते. अळी कुतुहलाने पुढे गेली. एवढयात तो कोळी तिच्यावर वस्सकन ओरडला, "ए सुरवंटा, दूर हो, दूर हो.. दिसत नाही मी इथे जाळे विणतोय ते....!!!" बिचारी अळी! हिरमुसून मागे सरकली. पण तिला थोडा आनंदही झाला. तिला तिचे नाव कळाले होते. "सुरवंट".
सुरवंट रात्री बाप्पाला म्हणाला, "मला निदान जाळे विणायला तरी शिकव की..." "अरे बाळा, थोडा धीर धर रे. योग्य वेळ आली की सगळे काही मिळेल." बाप्पा म्हणाला. सुरवंटाने विचारले, "पण म्हणजे कधी ???" बाप्पाने काहीच उत्तर दिले नाही. सुरवंट हिरमुसून झोपी गेला.
सकाळी कसलीशी लगबग ऐकू आली म्हणून सुरवंटाने मान वर करून बघितले. समोर मुंग्यांची भलीमोठी रांग गाणी गात चालली होती. प्रत्येक मुंगीच्या हातात मोठ्ठा साखरेचा दाणा होता. सगळ्या मुंग्या पावसाळ्यात खाण्यासाठी म्हणून आपापल्या घरात अन्नाचा साठा करून ठेवण्यात मग्न होत्या. सुरवंटाला परत एकदा वाईट वाटले. त्याला फक्त झाडाची पानेच कुरतडून खाता येत असत. आणि मुंग्यांसारखे मोठ्ठा किल्ला असलेले घरही नव्हते त्याला.
आपल्याला असं काहीच का मिळत नाही याचे सुरवंटाला खूप दु:ख झाले. जयबाप्पाचा रागही आला. त्याने ठरवले. जयबाप्पाशी कट्टी करायची! खूप रडू यायला लागले. रडत रडत तो झोपून गेला.
केव्हातरी मधेच जाग आली. त्याला जाणवले की कुणीतरी आपल्या अंगावर मस्त मऊमऊ पांघरूण घातले आहे. त्या रेशमी पांघरूणात झोपायला त्याला एवढे छान वाटले! वाटले की कधी उठूच नये... निघूच नये या पांघरुणाच्या बाहेर. अजून झोपही येत होती. आता अजून गाढ झोप लागली. किती वेळ झोपला तो ते बाप्पालाच माहीत! सूर्य आला नि गेला सुद्धा... चांदोबा आला नि झोपलेल्या सुरवंटाला हळूच हाक मारून गेला.
सुरवंटाने डोळे उघडले. खूप वेळ झोपल्यामुळी अंग अगदी आंबून गेले होते. त्याला खूप आळोखेपिळोखे द्यावे वाटत होते... आणि हात-पाय उगवल्याने देताही येत होते!! यिप्पी... आनंदाने त्याने आपले नवे हातपाय ताणून दिले. तर काय?? अंगाभोवतालचे पांघरूण गळून पडले. सकाळच्या लख्ख उन्हात त्याला पहिल्यांदाच आपले सुंदर पंख दिसले. निळे निळे पंख नि त्यावर पांढरी पिवळी नक्षी ! कोळीकिड्याच्या जाळ्यापेक्षाही मऊमऊ... मस्त टोकदार मिशापण आल्या होत्या की! गोगलगायीपेक्षा ऐटबाज! त्याने अलगद पंख हलवले. आता तर हवेत उडता येत होते त्याला!! किती भिरभिर उडता येते पंखांमुळे! सगळ्या मुंग्या खालून त्याच्याकडे बघत ओरडू लागल्या, "ते बघा... बघा... किती सुंदर फुलपाखरू!!!"
फुलपाखराला खूप खूप आनंद झाला. सगळी फुले, किडे, मुंग्या, गोगलगाय त्याच्याकडे कौतुकाने बघत होते. त्याच्या आनंदात सामील झाले होते.
Khup god aahe hi katha!...
ReplyDelete