Sunday 13 June 2010

आमची पुस्तक भिशी

मित्रमंडळींच्या घोळक्यात एक दिवस असे लक्षात आले की खूप जण पुस्तकावर प्रेम करणारे आहेत. वाचतात. जमेल तशी पुस्तक खरेदी करतात. खूप जणांना स्वतःची पुस्तकं असावी असे वाटते. पण पुस्तकांच्या दुकानात गेल्यावर एकदम खूप सारी पुस्तकं खरेदी करायला मध्यमवर्गीय खिसा नको म्हणायचा. वाचनाची ओढ तर स्वस्थ बसू देत नाही. घरात हवे ते पुस्तक हवे तेव्हा हाताशी असणे हे सूख पण वेगळेच ! मग एका सुपिक डोक्यातून एक कल्पना उगवली पुस्तक भिशी.

मराठवाड्यात , पुण्यातही असे गट चालतात असे ऐकून माहीत होते. सुवर्ण भिशी, साड्यांची , भांड्यांची सुद्धा भिशी असते हे पण माहीत होते. आम्ही पुस्तक भिशी सुरू केली.

सुरुवातीला केवळ ६ लोक एकत्र आलो. प्रत्येकी १०० रु. जमा करायचे. मग नावांच्या चिठ्ठ्या करायच्या. एक चिठ्ठी उचलायची. त्यात ज्याचे नाव निघेल त्याने सगळ्या पैशांची फक्त पुस्तकं घ्यायची. स्वतःला हवी ती ! पुस्तकांची मालकी त्याची असली तरी प्रत्येक सदस्याला ती वाचायला मिळावी.
अट एकच, ही पुस्तकं कुठल्याही अभ्यासक्रमाची नकोत. ( कारण ती आपोआप गरज म्हणून घेतली जातात. )

हळूहळू इतर मित्रांनाही यात रस वाटू लागला. भिशीची संख्या वाढली. जमा होणारे पैसे वाढले. एकदम दीड दोन हजारांची पुस्तकं घेणं शक्य होऊ लागलं. प्रत्येकाच्या संग्रहातली पुस्तकं वाढली. आनंद वाढला. कित्येक दिवस मनाच्या कोपर्‍यात ढकललेल्या पुस्तकांच्या याद्या बाहेर आल्या.

वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारा, वेगवेगळ्या आवडीनिवडी असणारा असा हा गट. त्यामुळे प्रत्येकाच्या आवडीची पुस्तकं जमा होऊ लागली. मग ठरवलं की प्रत्येक वेळी ज्याने पुस्तकं घेतली त्याने किमान एक तरी पुस्तकाचा परिचय करून द्यायचा. त्याचा सर्वांना अजून फायदा झाला. साहित्यातले आपल्याला आवडतात त्यापेक्षा वेगळे प्रकार वाचून बघण्याची मनाची तयारी झाली. वाचनानुभव समृद्ध व्हायला लागला. पुस्तकं अधिक डोळसपणे वाचली जावू लागली. जवळचा पुस्तकसंग्रह अधिक रंगीबेरंगी व्हायला लागला. काही दिवसांनी 'संग्रहात पाहिजेच' अशा स्वतःच्या पुस्तकांची यादी संपली. अगदी नवी, माहीत नसलेली पुस्तके घेण्याचा, प्रयोग म्हणून अगदीच नव्या लेखकाचे पुस्तक घेण्याचा धीर होऊ लागला. अर्थात सगळीकडची पुस्तक परीक्षणं नजरेखाली घालून खरेदी होऊ लागली.

या कार्यक्रमाने अजून एक अमूल्य आनंद दिला. यानिमित्ताने महिन्यातून एकदा सगळे एकत्र भेटू लागलो. रोजच्या कामापेक्षा वेगळ्या विषयांवर बोलू लागलो. चेष्टा मस्करीत विचारांची, बातम्यांची देवाण घेवाण होऊ लागली. सणावाराला एक संदेश किंवा मेल पाठवतानाच आठवण व्हायची.. ते लोक आता प्रत्यक्ष संवादू लागले. अडचणींवर उपाय - मदत हे ओघाने आले. आणि अजून एक म्हणजे एकत्र खादाडी !!!! :D

खरंच खूप भरभरून दिलं आम्हाला या पुस्तक भिशी ने ! या महिन्यात आम्ही हा उपक्रम सुरू करून चक्क ५ वर्षे झालीत. पण अजूनही त्यातला ताजेपणा तसाच आहे. भरभरून मिळणारा आनंद वाढतोच आहे...

तुम्ही पण सुरु करा ना असा मासिक आनंदोत्सव... :)

1 comment:

  1. पुस्तकप्रेमींसाठी हा अत्यंत गरजेचा आणि आवडीचा उपक्रम मला आवडला. पण हे सारे मित्र जवळपास राहणारे आणि नियमाने महिन्यातून एकदा तरी भेटणारे हवेत. विशेष म्हणजे वाद घालणारे नकोत. एवढे पथ्य पाळले पाहिजे.
    मंगेश नाबर

    ReplyDelete