Friday 21 May 2010

मनुलीची गोष्ट

माझी २ वर्षांची चिमुरडी आज मला म्हणाली,'चल तुला मस्तपैकी छान् छान गोष्ट सांगते..' आता तासाभराची निश्चिंती असे म्ह्णून मी म्हणाले'सांग की'.
आणि मग गोष्ट सुरु झाली. ती तिच्याच शब्दात-
"एक ए मोठ्ठं जंगल होतं..तिथे झाडावर एक ससुल्या रहय्चा.त्याला भूक लागली. तो खारुताईला म्हणाला,खारुताई खारुताई माला खूप भूक लागली गं! माला काइत्ला(काहीतरी)खायला दे नं पलीज! मग ते सायकल वर बसतात आणि आजीबाई कडे जातात्.पाहतात तर काय एक ए मोठ्ठा वाघोबा आला. तो म्हणाला,ए म्हातारे मि तुला खाणार..! म्हातारी म्हणते लेकीकडे जाते तुप रोटी खाते मग तु मला खा. वाघ ओक्के म्हणतो.एक दिवस काय झालं माहितै तुला? कावळ्याचं घर वाहून गेलं. मग तो चिउताइच्या घरी गेला.टिंग टांग्..कोणय़् कोणय?? चिउताइ चिउताइ दार उघड्,थांब माझ्या बाळाला क्रीम लाउ दे..मग मी तुझं डोकं पुसून दे हं..मग तू मला खा. मग खूप आनंद होतो.लेक काय देते महितय तुला?? पावभाजी..पास्ता..गुलाबजामुन्..मॅगी आणि कोशिंबीर!!! मग ति म्हणते चल रे भोपळ्या टुलुक टुलुक्..मग सस्सेभाउसारखे टुण टुण उड्या मारतात्..बघ्तो तर काय?? एक छोटासा कासुल्या(कासव)आणि अस्सोल(अस्वल)झाडावर चढतात.तिथे खूप आंबे लागले असतात्.माकड ते आंबे मगराला देतं.मगराची बायको खुशुन(खूश होऊन)गेली.ती म्हणते,ते काइ नै..मला माकडाचं काळीज हाव म्हण्जे हाव म्हणजे हाव! माकडाच्या दुकानात काय असतं माहितै तुला???..............."
पुढचं मला आठवत नाही.झोप लागली.लेक पण कधितरी झोपुन गेली असावी. जाग आल्यावर पाहिलं; झोपेत मधुनच खुदुखुदू हसत होती.तिने सांगितलेली गोष्ट आठवली.त्या निरागसपणावर मन लुब्धून गेलं.तिच्या गोष्टीत खारुताइ सशाला सायकलवर फिरवते.म्हातारीच्या शब्दावर विश्वासून वाघ'ओक्के'म्हणतो,जंगलातली म्हातारी पास्ता खाते..चिमणी कावळ्याचं डोकं पुसून देते..कासव झाडावर चढते...
किती निर्मळ जग आहे हिचं! त्या जगात कुठेही घाण नाही..जळमटं नाहीत्..अंधाराचा लेश नाही..भेद नाही,भय नाही,अविश्वास नाही,अनिश्चितता नाही.सगळं नितळ..प्रकाशमान्..आशादायी..
हे परमेश्वरा!या निरागसपणाचं रक्षण करण्याचं सामर्थ्य मला दे!
ही कळी इतक्याच सुंदरतेने फुलताना बघण्याचं भाग्य मला दे!
आणि त्याच क्षणी;सहज विश्वासाने,झोपेत माझं बोट धरून हसणार्‍या मनुलीला बघताना क्षणभर वाटलं;परमेश्वर आहे!!!


title="The index of all Marathi blogs on the Internet"
src="http://marathiblogs.net/marathiblogs/referral_ping/7834/9b05f30a91867786" />


No comments:

Post a Comment