मला ओट्स आवडतात. (असतात आता काहींच्या आवडी विचित्र !😉) किमान 25 प्रकार तरी करून खाते मी ओट्सचे. मला चव आवडते, ते शिजवल्यावर येतो तो पोत आवडतो. ओट्सला जी चव देऊ ती तो सहज पांघरतो हे फार आवडतं.
आज लाडूमध्येपण ओट्स असेच समरस झालेत. बघा आवडतात का ते.
ओट्स नाचणी चोको लाडू
1 वाटी ओट्स भाजून दळून पीठ करून
1 वाटी नाचणी पीठ
अर्धी वाटी पोहे
अर्धी वाटी तूप
पाऊण किंवा एक वाटी साखर
दोन मोठे चमचे साखरविरहित कोको पावडर
चार थेंब व्हॅनिला इसेन्स
थोडं तूप गरम करून त्यात पोहे फुलवून बाजूला ठेवायचे. मग उरलेल्या तुपात नाचणी पीठ भाजायला घ्यायचं. मंद आचेवर निवांत भाजायचं. छान खमंग वास आला की बाजूला काढायचं. आता अगदी थोडा वेळ ओट्सचं पीठ भाजायचं. आपण पीठ करण्या आधी ओट्स भाजले होते म्हणून आता नुसतं गरम होईपर्यंत भाजलं की झालं.
आता वाटीभर साखर, कोको पावडर आणि चार थेंब व्हॅनिला इसेन्स मिक्सरमध्ये हलकं फिरवून घ्यायचं. चोको व्हॅनिला साखरेत नीट मिसळले गेले तरच लाडवात मिसळले जाणार हे लक्षात घेऊन ही पायरी अजिबात विसरायची नाही.
मग सगळं एकत्र करून नीट मिसळून लाडू वळायचे.
यात साखरेचं प्रमाण आवडीनुसार बदलू शकता. सुका मेवा मिसळू शकता. व्हॅनिला नको असेल तर रद्द करू शकता. वेलची आणि कोको ही चव एकत्र बरेच लोक आवडीने खातात. ती मला जरा 'निराळी' वाटते म्हणून मी करत नाही.
No comments:
Post a Comment