Wednesday, 12 May 2021

कुरणांमधलं घर 1

 स्वित्झर्लंडमध्ये जायचं असं ठरलं आणि आम्ही राहण्याची जागा शोधायला सुरुवात केली. ओळखीचे एकदोन मित्र तिथं होतेच पण ज्या गावात ऑफिस आहे त्याच्या आसपास राहणारं कुणी नव्हतं. इथं राहणाऱ्या आणि राहून गेलेल्या मित्रमंडळीना विचारत विचारत एकीकडे ऑनलाईन घरं बघणं सुरू होतं. आम्हाला गर्दी नको होती, मॉल, हॉटेलं, शॉपिंग स्ट्रीट आमच्या प्राधान्यक्रमात फार खाली होतं. ऑफिस चारपाच km चालेल,शाळा, बस स्टॉप जवळ हवा, दवाखाना,बाजार सहज जाता येण्याच्या अंतरावर हवा आणि दैनंदिन गोष्टी मिळणारी दुकानं एक किलोमीटरच्या आत हवीत अशा सगळ्या अटी पूर्ण करणारं घर शोधत होतो. ऑफिसचं गाव आणि त्या शेजारची दोन गावं यापैकी कुठंही चालणार होतं. तरीपण काहीही माहिती नसताना निव्वळ नकाशात बघून ड्यूबेनडॉर्फ हे गाव मनात ठरलं होतं. योगायोगाने याच गावात घर मिळालं की !!! झालं! रहायलाही आलो! 
आलो तेच कोरोना गळ्यात घेऊन. घरात एक गादी, गॅस,वीज वगळता एकही फर्निचर नाही. आमच्याकडे असलेलं सामान आल्या आल्या तळघरात टाकलं होतं ते उचलून वर आणण्यासाठी शक्ती नाही. बिल्डिंगला लिफ्ट नाही. अशी कुरकुर सुरू झाली. बेल्जियमचं घर आमचा कम्फर्ट झोन झालं होतं. तिथल्या सुंदर घराची, घरातल्या लहानलहान सोयींची, लोकांची,परिसराची, गावाची मनात आपोआपच तुलना केली जात होती. 
इथं आठवडी बाजार इतकुसा असतो ! तो ही बुधवारी !!! इथं गावाला मुख्य चौक म्हणून काही नाहीच ! इथली लायब्ररी फारच लहान दिसतेय! इथं ग्रोसरीसाठी चढ उतार पार करत एक km गेल्यावर तीनच दुकानं आहेत. इथं भारतीय दुकान नाहीच ! इथं कचरा फेकण्याचे नियम फार किचकट आहेत, सैपाकघरात ओटा बुटका आहे, बाथरूमला चक्क कडी नसलेलं सेमी ट्रान्सपरंट दार आहे, सैपाकघरात चक्क पांढरी शुभ्र फरशी आहे , कपाटं नाहीतच..... अशा हजारो कुरबुरी करून कंटाळा आला तेव्हा वेगवेगळ्या छान गोष्टी दिसू लागल्या. 
इथं सगळ्या खोल्यांमध्ये सूर्यप्रकाश थेट येतो,डोंगरातून येणारे वारे आनंदाने सगळ्या खोल्यांमध्ये खेळतात. गॅलरीतून एका कोपऱ्यात आल्प्स दिसतात, सोसायटीच्या बागेत शेकडो तऱ्हेची फुलझाडं आहेत, प्रत्येक खोलीच्या प्रत्येक खिडकीतून एक तरी डोंगर दिसतो! त्या डोंगरावरून पाऊस चक्क उतरत उतरत येताना दिसतो.  घरात जुन्या पद्धतीची फायरप्लेस आहे ! शेजारी प्रेमळ आहेत,मदतीसाठी आनंदाने येतात, स्वतःहून ओळख करून घेताहेत. आम्हाला जर्मन येतं तेवढंच त्याना इंग्रजी येत असल्याने फिट्टंफाट होऊन गप्पाही वाढत आहेत.इथं बेल्जियमसारखे सोसायटीच्या बाह्य सुशोभनाचे कडक नियम नसल्याने प्रशस्त गॅलरीचा कपडे वाळत घालण्यापासून सांडगे वाळत घालण्यापर्यंत उपयोग करता येईल असा अतोनात आनंद आहे !!!  मुख्य म्हणजे सोसायटीत भरपूर लहानमोठी मुलं आहेत. ती आजूबाजूला खेळत दंगा घालत असल्याने वेगळंच चैतन्य आहे. 
 गावाच्या चारही बाजुंनी डोंगर आहेत. रेल्वेत बसलं की अर्ध्या तासात कोणत्याही डोंगर पायथ्याशी जाता येतं. ही एक मोठी दरी आहे त्यात नद्या जंगलं यांच्या कलाने गावं वसली आहेत.  रेल्वे, रस्ते मात्र अतिशय कार्यक्षम आहेत. 
 गावात नितळ स्वच्छ पाण्याच्या दोन नद्या झुळझुळ वाहत असतात,त्यात उतरता येतं आणि काठावर बसायला जागा पण आहेत, सोसायटीच्या पार्किंगवरून सुंदर हिमशिखरं दिसतात, रहदारी अजिबात नाही, तीन दुकानात जायला चार रस्ते आहेत त्यातल्या एका रस्त्यावर सायकल सोपी पडेल, घरातून बाहेर पडलं की पंधराव्या मिनिटाला सुरेख टेकडी येते, घरासमोर रस्ता ओलांडला की शेतं आहेत,थोडं पुढे गेलं की नदीकाठाने चालायचा स्वप्नवत रस्ता आहे. ते फोटोतलं पिवळ्या शेतातलं नदीकाठी असलेलं घर दिसलं आणि एकदम बेताब सिनेमात सनी देओल राहत असतो ते घर आठवलं :)) अशी सुंदर घरं गावभर विखुरलेली आहेत. गावात उंच इमारती जास्तीत जास्त चार मजली आहेत. लिफ्ट ची पद्धत नाही. सगळ्या नव्या जुन्या घरांना विशिष्ट पद्धतीच्या आतल्या खिडक्या आणि बाहेरच्या खिडक्या आहेत त्या फार सुंदर दिसतात. 
इथं येण्याआधी या लोकांच्या शांतताप्रियतेबद्दल फार ऐकलं होतं. म्हणजे इथं म्हणे रात्री फ्लश केलेलं चालत नाही, मुलांनी घरात खेळलेलं चालत नाही वगैरे वगैरे. तसं काही नाही हे समजल्यावर जीव भांड्यात पडलाय ! 
सध्या रोज एक नवा रस्ता शोधायचा आणि किमान 2km त्या रस्त्यावर पुढे जाऊन यायचं अशी गावाची ओळख करून घेतोय. हळुहळू गाव ओळखीचं होतंय. रस्त्याची नावं लक्षात राहत आहेत,कोणत्या रस्त्याने कमी चढ उतार आहेत,मुख्य चौकात जायचे शॉर्टकट्स कोणते आहेत, कोणता पास कसा वापरायचा, चांगलं दही दूध कुठं मिळतं, नव्या भाज्या कोणत्या फळं कोणती, लोकल मार्केट कुठं कुठं कधी असतात,भारतीय दुकानं जवळपासच्या गावात आहेत तिथं कसं जायचं असे शोध लागत आहेत. स्विसजर्मन भाषा अगदीच थोडी येत असली तरी इथले उच्चार समजून घेऊन संवाद साधता येतोय. इंग्रजी बोलणारे लोक भरपूर असल्याने काम अडत नाही. 
कोरोना संकट संपून या ग्लाट दरीमधल्या या गावात लवकरच सगळ्या आप्तांना घेऊन येता यावं, इथं मित्रमंडळी जमा व्हावी, हास्यविनोद घुमावेत, इथं कविता सुचाव्या, गाणी सुचावी, चित्र रंगावी अशी आशा घेऊन रोजचा दिवस उजाडतो आहे !











1 comment: