Friday, 14 April 2017

तहान लाडू

तर अस्सं झालं.. पोरासोरांना लागल्या सुट्ट्या. पण त्यायच्या मायबापांना सुट्या नाहीत. मग आली सगळी गावाकडे आज्जी आज्जी करत ! मला म्हातारीला पोरं भवताली असली की काय काय करायचा उल्हास येतो. पोरांना पण तेवढाच बदल. इथं आमच्या खेड्यात ऊन उदंड! पांढर्‍या मातीचा फुफाटाच फुफाटा ! पण गंगेचं पाणी पण वाहातं असतं एवढं मात्र सुख. सकाळी सडा झाला की पोरांना उठवायचं. आणि तोंड वाजवत एकेकाचं आवरून घ्यायचं. लिंबाखालची आंथरुणं गोळा करा रे,दातं घासा रे, दूध प्या रे आणि मग गंगेला आंघोळीला हकलायला जावं तर पोरं माझ्यापुढं १०० पावलं उड्या मारत !
दशमी चटणी ची न्याहारी झाली जातात देवळात हुंदडायला. ऊन नाही पहायचं, तहान नाही पहायची, दिवसभर आंब्याच्या कोया, गोट्या नाहीतर चेंडु फळकुट आहेच !
दिवस असा गेला न रात्री चांदण्यात अंथरुणं घातली की एकेकाची कुरकुर झालीच सुरु ! आज्जी,डोळ्याची आग ! आज्जी पोटात भडभड, आज्जी पाय भाजताहेत अजून, आज्जी उन्हाळी लागली !!!! मग बटव्यात हात घालून हे ते औषध देऊन गप करायचं.कोणाला जिरे खडीसाखर, कोणाला धण्याचं पाणी, कोणाला तुळशीचं बी, कोणाला पायाला लोणी...! लेकरं पाणी कमी पितात त्यात त्यांचा काय दोष! नाही राहात लक्षात खेळायच्या नादात ! मी म्हातारी तरी कुठं कुठं पळु त्यांच्यामागं !!!
सुटी असली की खा खा मात्र जास्त सुटलेली हो सगळ्यांना ! खारवड्या, कुरडई चा चीक, पापडाच्या लाट्या, येताजाता टरबुजं आणि टाळे, काकड्या आणि वाळकं, आंबे तर किती शे याची गणतीच नाही.. मग म्हणलं यांना खाऊतूनच औषधं देऊ आता.
आमच्या सुना आणि लेक त्या डायटफायट च्या फ्याड मुळं लाडू काही करत नाहीत. आपणही खायचं नाही आणि पोरांनाही द्यायचं नाही ! मक्याच्या लाह्या न कच्च्या भाज्यांवर जगायचं ! असो. त्यांचं त्यांच्यापाशी. पण पोरांना गोडाची आवड लागत नाही त्यामुळं एवढीच माझी तक्रार !
आमच्या थोरल्याचा मोठा म्हणे काहीतरी मस्त कर आजी. मधल्याची धाकटी म्हणे मला क्रकजॅक पायजे.. धाकटीचे जुळे या मोठ्या पोरांच्या मागं मागं ते खातील ते खातात. मग म्हणलं गोष्टीतले तहानलाडू करते !!! गोष्टीतले म्हणलं की कान टवकारून सगळी सेना सैपाकघरासमोरच्या झोपाळ्यावर येऊन बसली. लाडूच्या तयारीला जिन्नस काढू लागले तेवढ्यात येश्वदाबाई आल्याच. म्हणल्या माझे पण पाच लाडू कर अंबिके ! हिला घरी करायचा कंटाळा ! पण एकट्या जिवाला खाऊ घालावं म्हणून बरं म्हणलं न लाडू वळायला बस म्हणलं.ती बसली की आमच्या'बोर' गप्पा म्हणून लेकरांना पाठवलं वासरायला पाणी पाजायला.
थोडेशेक फुटाणे घेतले, एकादशीला केलेलं शिंगाड्याचं पीठ घेतलं, मधला कुटं दुबै ला गेलाव्हता तिथून आणलेले खजूर होते ते घेतले, लेकीच्या घरच्या काळ्या मनुका घेतल्या, थोरल्यानं मला बोळ्क्या तोंडाला काजू न बदाम आणले होते ते घेतले न येश्वदेला आडकित्त्यानं तुकडे करायला दिले. तिनं तुकडे करताना चार बदाम खाल्लेच पण काय बोलता !!!! हं... मसाल्याच्या डब्यातले थोडे धणे आणि थोडे जिरे घेतले.वाटीत शेंदेलोण काढूण ठेवलं, थोडी पिठी साखर घेतली. लाडुत कुरुमकुरुम लागायला थोडेशेक पोहे तळून घेतले.
sahitya
एकीकडे चहा टाकला न दुसरीकडे सगळं नीट भाजून घेतलं. मग मेवा सोडून सगळं मिक्सरवर दळलं. खजुर मनुका डाळं आणि पिठाबरोबर अल्लाद दळल्या गेल्या. धणे जिरे पण जरा आबडधोबड झाले. तशेच पायजेत. मग त्यात येश्वदाबाईच्या हातातून वाटी घेऊन काजू बदाम घातले आणि शेंदेलोण घातला. मग थोडं थोडं तूप घालत लाडू वळले.
पहिला लाडू बाळक्रिष्णासमोर ठेवला न दुसरा येश्वदेला दिला. मग पोरांना हाका मारल्या. एकेक लाडु हातावर ठेवला न बघत बसले. एरवी बेसनाचा न रव्याचा लाडू कुरतडत खाणार्‍या पोरांनी २-२ लाडू की हो संपवले ! वर तांब्या तांब्या पाणी प्यायली सगळी !
मी पण मग एक तुकडा तोंडात टाकला न मला आमच्या धाकट्या जाऊबाईंच्या, कौसल्याच्या आईची आठवण आली. त्यांनीच शिकवले होते हे लाडू. आधी वाटलं चुकून मीठ टाकलं का काय ! पण आयुर्वेदिक डाक्टर असलेल्या हुशार बाईकडून अशी चूक घडेल व्हय ! नाहीच !
तर पोरांनी लाडू खाऊन फोनवर आपापल्या आईला टेष्टी लाडु न क्रॅकज्याक लाडु म्हणून सांगितलं. अन कधी नव्हं ते थोरल्या सुनबाईंनी रेशिपी की हो विचारली !
येश्वदेला पण भाचीला पाठवायची होती.
मग धाकटीच्या जुळ्यातल्या एकीला बसवलं पेन्शिल कागद घेऊन न म्हणलं लिहून काढ...
१५ लहान तहान लाडूसाठी जिन्नस -
साल नसलेले भाजके फुटाणे/डाळं - १ वाटी
शिंगाड्याचं पीठ - अर्धी वाटी
खजूर - १५
काळ्या मनुका -अर्धी वाटी
काजू-१०
बदाम -१०
जिरे- दीड मोठा चमचा
धणे - दोन मोठे चमचे
पोहे- दोन मोठे चमचे
सैंधव - १ छोटा चमचा भरून
पिठी साखर - ३ मोठे चमचे.
कृती - सगळे जिन्नस फुटाण्यासह नीट भाजून घ्यायचे. पोहे तळून घ्यायचे. काजुबदाम तुकडे करुन घ्यायचे. मग पोहे न काजूबदाम सोडून सगळं मिक्सरवर वाटून घ्यायचं. पीठ पण वाटताना घालायचं म्हणजे नीट मिसळतं. मग सगळे जिन्नस एकत्र करून हळुहळू दोन दोन चमचे तूप घालत नीट मळून लाडू वळायचे.
घ्या फोटु पण काढले लेकरांनी..
ladu

2 comments: