Wednesday, 8 September 2010

नॉर्वेच्या दरीखोर्‍यातून.... भाग ३

आजची सकाळ निवांत होती. हॉटेलच्या अगदी शेजारी असलेल्या धक्क्यावरून आमची बोट साडेनऊला निघणार होती. निवांत आवरले. काल सकाळी नॉर्वेजियन नाश्ता काय असतो ते बघितले नव्हते. आज तासभर हातात होता. नाश्ताखोली गजबजून गेली होती. टेबल खचाखच भरलेला होता. ५-६ प्रकारचे सीरियल्स, ताजी कापलेली ७ - ८ प्रकारची फळे, संत्री रस, दूध, फ्लेवर्ड दह्याचे प्रकार, ब्रेड चे ४ प्रकार. चीज आणि लोणी यांचेही प्रकार, बेक केलेले मश्रूम, बटाटे, टोमॅटो, उकडलेल्या राजम्यासारखी कसलीतरी उसळ, चहा कॉफीचे प्रकार..... हे वेजिटेरियन !!! नॉनवेज खाणार्‍यांसाठी यात अजून २५ प्रकारांची भर होती. सगळे प्रकार खाऊन बघितले. काय जास्त चांगलं आहे कळेपर्यंत पोट भरले होते :( "आता उद्या" असे ठरवून बोटीच्या धक्क्यावर पोहोचलो.
dhakkaa
सव्वा नऊ झाले तरी तिथे अजून शुकशुकाट होता. पुन्हा एकदा आपण बरोबर जागेवर आलोय नं असा प्रश्न पडला. तेवढ्यात एक अमेरिकन आणि दोन चिनी पोरी टपकल्या . ह्म्म्म्म्म ! जागा बरोब्बर असल्याची खात्री पटली. कारण सर्वांचे फोटोसेशन सुरू झाले होते. पाचेक मिनिटात बोटीचा भोंगा ऐकू आला. समोरच्या डोंगराला वळसा घालून आमची बोट येत होती. त्या बोटीवर माणसांच्या आकृत्या फारच चिमुकल्या दिसत होत्या. बोट जवळ आली. अबबबबबबब..... प्रचंड मोठे गावच जणू ! एकूण सात मजले. आणि एका गावात जे काही असू शकते ते सगळे बोटीवर होते. आत गेल्यागेल्या एका बोटसुंदरीने आम्हाला हात धुवायला सांगितले. आधी कळालंच नाही हा स्वागताचा कुठला प्रकार ते ! सगळे लोक दारात आले की, " हॅलो सर, बोटीवर स्वागत. हात धुवून घ्या ! " थोडा वेळ गेल्यावर कळले. या भागात कोणती तरी साथ चालू होती. त्याचा संसर्ग टळावा म्हणून ही खबरदारी. बोटीवर प्रत्येक कोपर्‍यात पाण्याशिवाय हात स्वच्छ करण्याचा साबण ठेवलेला होता.
jahaaj
आम्ही ही जागा बरी, ती यापेक्षा बरी, नाहीतर इथे अजून छान असे करत करत मांजरासारखे सामान आणि सगुणाची बाबागाडी फिरवत शेवटी एका ठिकाणी स्थिरावलो. आता संध्याकाळी सात वाजेपर्यंत या बोटीवर रहाणार होतो. सामानाजवळ कोणीतरी थांबून आळीपाळीने सगळी बोट पालथी घातली. डेकवर थंडी वाजत होती. पण उन्हात बरेही वाटत होते. सगळे फिरंगी सूर्यफुलासारखे सूर्याकडे तोंड करून कसल्याश्या चिंतनात मग्न दिसत होते. बोट सुरू झाली. "बोट लागते " वगैरे काय काय ऐकलं होतं. पण आता बोट पाण्यातून डुलत जात असतानाही पोटातलं पाणीही हलात नव्हतं. इथून गायरांगर फियॉर्ड सुरू होते. गायरांगर गाव हे त्याचे टोक. आम्ही तिथवर जाऊन परत याच गावात परत येणार होतो.
गायरांगर फियॉर्डचा हा भाग दोन भागात विभागला आहे. नोर्दाल आणि स्त्रांदा. नोर्दाल मध्ये ५ खेडी आहेत. लोकसंख्या १७६० ! आणि स्त्रांदा च्या खेड्यांची लोकसंख्या ४५०० ! अर्थात हे तिथले कायमस्वरूपी रहिवासी. उन्हाळ्यात या भागात खूप गर्दी होत असते. त्यामुळे या चार महिन्यात पर्यटनाशी संबंधित व्यवसाय तेजीत असतात.
rastaa
गायरांगर फियॉर्डच्या या भागात झालेल्या उत्खननात १२००० वर्षांपासून मानवी वस्तीच्या खुणा सापडल्या आहेत. निसर्गाच्या महान आश्चर्यांपैकी हे एक आश्चर्य आहे. समुद्राने पर्वत रांगांवर आक्रमण करून १५ किमी लांब आणि ६०० मीटर खोल अशी भेग निर्माण केली आहे. त्या भागात मानवी वस्ती ! दोन्ही बाजूंनी उंचच उंच डोंगर. पाण्यात मध्येच डोके वर काढणारे अजस्त्र सुळके. डोंगरमाथ्यावर अजून न वितळलेले बर्फ, आणि वितळलेल्या बर्फाचे पाणी होऊन धबाबा कोसळणारे जलप्रपात ! क्षणभरासाठीही पापणी मिटतानाही पुन्हा डोळे उघडण्याची डोळ्याना घाई व्हायची.
gav
या धबधब्यांचं आयुष्य काय ? आधी खडकावरून लहान लहान प्रवाहांनी हसत खेळत एकत्र यायचं, मग तारुण्याच्या मस्तीत कडेलोट व्हायचं, प्रौढ समंजसपणे नदीच्या रुपात शिरायचं, शांत प्रवाहाने समुद्राला अर्पित व्हायचं हा खरा तर निसर्गक्रम. पण हे धबधबे क्रांतिकारकांसारखे वाटले. ऐन बहरात असताना थेट समुद्रात उडी ! असे बेफिकिर, खळाळते आणि स्वच्छ स्फटिकासारखे हे पाणी म्हणजे साक्षात जीवनच.....! आजूबाजूच्या निसर्गाचा माणसाच्या मनोवृत्तीवर फार खोल ठसा उमटत असतो यावर माझा ठाम विश्वास आहे. म्हणूनच की काय, अधुन मधून लहानश्या बेटावर व्यावहारिक दृष्टीने अत्यंत कष्टाचे जीवन जगणारी माणसं मला निर्मळ,निरामय आणि आनंदी दिसत होती. या दरीखोर्‍यातल्या एकांतवासात एखाद्या बेटावर उभे असलेले एकुलते सुंदर घर बघितले की मन म्हणायचे, इथे येऊन राहण्यामागची प्रेरणा कोणती असेल ? आणि त्याच घरापुढे फुललेल्या वेली, सजवलेले गोठे नि गायवासरं, हरणं बदकं बघताना आपोआप उत्तर मिळायचं. आदीम प्रेरणा आहे ही. शांतता नि सृजनाची. आव्हानांच आव्हान देत जगण्यावर राज्य करण्याची. इथे कृत्रिमतेला जागाच नाही. निसर्गाच्या या अलौकिक आणि त्याचवेळी भीषण, रौद्र अशा प्रपातांपुढे केवळ अस्सल असेल तेच टिकेल. बाकी सगळे वाहून जाईल.
a
हो. अवतीभवती पाचसातशे लोकांचा गोंगाट असतानाही मन या अशा विचारत गढून गेलं होतं यातच तिथला निसर्ग कसा असेल ते समजा.
एकेका डोंगराला मोहक वळसा घालून बोट पुढे चालली होती. मधून मधून समोर दिसणार्‍या काही विशेष स्थळांची माहिती स्पीकर वरून प्रसारित होत होती. एक ठिकाण सांगताना गाईडने सांगितले की "या निर्मनुष्य बेटावर एक तरूण ७ वर्षे एकटा राहिला होता. त्याच्यावर नंतर डॉक्युमेंटरीही तयार झाली. " दुसरे एक ठिकाण दाखवून म्हणाला, " इथे एका तरूण कुमारी मातेला दगडांनी ठेचून मारण्यात आलं आणि या कड्यावरून तिच्या प्रियकराला जलसमाधी देण्यात आली". या अशा कथा समोरचे उदात्त दृश्य गढूळ करत होत्या. प्रत्येक ठिकाणी असा मसाला काम करत नाही हेच खरे. मग ऐकणे सोडून दिले.
b
दुपार कधीच उलटून गेली होती. सकाळची न्याहारी पण जिरली. पोट भूक भूक म्हणू लागले. मग निघालो अन्नाच्या शोधात. बोटीवरच्या रेस्टॉरंटमध्ये शाकाहारी मेनू म्हणून फक्त अ‍ॅस्पेरेगसचे सूप आणि ब्रेड होता. शेफला भाज्या घालून स्पॅघेटी बनवण्याची विनंती केली. चवदार सूप नि वातड स्पॅघेटी गिळून पुन्हा डेकवर बैठक जमवली. इतक्यात बोट गायरांगर फियॉर्डच्या शेवटच्या भागात आल्याची सूचना प्रसारित झाली.
gav
आमचा प्रवास आता अजून निमुळत्या भागातून होता. इथे धबधबे अजूनच जवळ दिसत होते. एका धबधब्याचे नाव होते सेवन सिस्टर्स ! या सप्तभगिनींपैकी ३ जणी 'सरस्वती' असलेल्या दिसत होत्या. पण त्यामुळे सौंदर्य कणभरही कमी दिसत नव्हते. हळुहळू गायरांगर गाव दिसू लागले. तीन बाजूंनी डोंगर कडे आणि मध्ये बेचक्यात अळंबीसारखे फुललेले हे खेडे ! गावाच्या थेट डोक्यावर अजून एक मोठा धबधबा. यांची संख्या मोजणे कधीच सोडून दिले होते. असंख्य जलमाळा दिमाखाने मिरवत हे छोटेसे खेडे आपल्या डोंगरांच्या बाहूने सर्वांचे स्वागत करत होते.
दरवर्षी सुमारे सात लाख पर्यटक या भागाला भेट देतात. हे ठिकाण युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत आहे . प्राचीन काळापासून हे पर्वत आणि हा समुद्र हातात हात घालून माणसाला अभय देत इथे जीवन फुलवत आहेत.
gav
dhbdhbaa
आमची बोट गावाजवळ जाणार नव्हतीच. एखाद्या देवळासमोर क्षणभर उभे राहून आतल्या मूर्तीची प्रार्थना करावी आणि पुन्हा मार्गस्थ व्हावे तसे बोटही थोडावेळ त्या गावासमोर रेंगाळली आणि तिने आपला मोहरा बदलला. परत एकदा समुद्रातून त्याच डोंगर कड्यांना प्रदक्षिणा घालत; त्या रौद्रसुंदर निसर्गाच्या कुशीत स्वस्थपणे राहाणार्‍या लोकांचा हेवा करत परतीच्या वाटेवर निघालो.
parat
dhag
kayaks
gav

1 comment: