Sunday, 13 June 2010

ग्रीस भाग २

सोमवार २४ मे. आज इथे सार्वजनिक सुट्टी. सकाळी नाश्ता करून जवळच असलेल्या मोठ्या चौकात आलो. तुरळक रहदारी. बहुतेक दुकाने बंद दिसत होती. समोरच अथेन्सदर्शन घडवणारी दुमजली बस दिसली. एका प्रसन्नवदनेने स्वागत केले. या बसच्या एक दिवसाच्या तिकिटात दोन दिवस शहरात कुठूनही कुठेही कितीही वेळा फिरता येणार होते. दरही वाजवी होता. याशिवाय शहराचा नकाशा, माहितीपुस्तक, प्रेक्षणीय स्थळांची माहिती अशा सोयी होत्या. बसमधून फिरायचे ठरवेले. वरच्या उघड्या मजल्यावर जाऊन बसलो. हेडफोन कानाला लावले. स्वागत्, सूचना, माहिती अस्खलीत आणि स्पष्ट इंग्रजीत ऐकू येऊ लागले.

पहिला थांबा अ‍ॅक्रोपोलीसचा होता. जुन्या शहराच्या मधोमध असणारी ही टेकडी इतिहासप्रेमी आणि पुरातत्त्व अभ्यासकांचे तीर्थस्थान आहे. टेकडीच्या पायथ्याशी बस थांबली. समोर टेकडीच्या माथ्यावर जगप्रसिद्ध पार्थेनन मंदिराचे अवशेष दिसत होते. त्याभोवती उतारांवर अनेक प्राचीन वास्तूंच्या खुणा अंगाखांद्यावर घेउन टेकडी सजली होती. वर मंदिरापर्यंत जाण्यासाठी सुबक पायवाटा आणि फरसबंद पायर्‍या दिसत होत्या. पायवाटांच्या दोन्ही बाजू गर्द झाडीने वाटसरूना सावली देत उभ्या होत्या. ऑलीव्हच्या झाडांसोबत फळांनी लगडलेली मोसंबीची झाडं, फुललेल्या बोगनवेली आणि चक्क पांढर्‍या गुलाबी कण्हेरी आणि घाणेरी सुद्धा!!!मनाने आनंदाने उडीच मारली. चढायला सुरुवात केली तोच भोवताली फिरत्या विक्रेत्यांनी गर्दी केली. १० फोटो, पाण्याची बाटली, वेताची छत्री. हरमाल एकेक युरो!!! वेरूळ आठवले.
Parthenan

पर्यटकांची बरीच गर्दी होती. फोटोबहाद्दर चिनी जपानी घोळके आपले क्यामेराशस्त्र सरसावत चालले होते. फुलझाडांपासून ते 'स्वच्छतागृहाकडे' असे लिहिलेल्या पाटीपर्यंत एकही गोष्ट त्यांच्या फोटोच्या तावडीतून सुटत नव्हती. हे असे लोक आपल्याकडे पण असतात. हे बहुतेक ते पर्यटन ठिकाण घरी जाऊन फोटोतच नीट बघत असावेत.

इथे येण्यापूर्वी पार्थेनन बद्द्ल खूप ऐकले वाचले होते. शिवाय लेकीच्या पावलांनी चालायचे होते म्हणुन गाईड घेतला नाही. सविस्तर नकाशा आणि माहिती पुस्तिका हातात होतीच. तसेही सनावळ्यांच्या तपशीलापेक्षा जे प्रत्यक्ष समोर आहे ते अनुभवण्यात आम्हा दोघांना जास्त रस आहे.

अ‍ॅक्रोपोलीस हे जगातील प्राचीन आश्चर्यांपैकी एक मानले जाते. ई.स.पूर्व ८व्या शतकापर्यंत प्राचीन ग्रीक संस्कृतीच्या खुणा इथे सापडतात. ग्रीक देवता नाइकी हिचे मंदीर म्हणजे पार्थेनन. अथीना नाइकी ही ग्रीसची संरक्षक देवता आहे. मुत्सद्दी,न्यायप्रिय आणि पराक्रमी अशा या देवीच्या नावावरून शहराला अथेन्स हे नाव पडले. हे मंदीर शांती, सौंदर्य, स्वातंत्र्य, ज्ञान आणि लोकशाहीचे आद्य प्रतीक मानले जाते. अनेक परकीय आक्रमकांनी उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीही आल्या. यातून जे काही वाचले ते १८३४ साली स्वतंत्र झालेल्या ग्रीसने जिवापाड जतन केले आहे.
Mandeer

Amphitheatre

Mandeer

प्राचीन ग्रीक संस्कृतीच्या खुणा इथे पावलोपावली आहेत. शुभ्र संगमरवरात बांधलेल्या या मंदिराचे काही खांबच आज बघायला मिळतात. तीच स्थिती इथले पहिले चर्च रोमन अ‍ॅगोराची, जगातल्या पहिल्या अ‍ॅम्फी थिएटरची, पहिले ग्रंथालय आणि पहिल्या संसद वास्तूची. सूर्य माथ्यावर आला होता. समोर प्राचीन आश्चर्य तळपत होतं. भोवती पसरलेली टेकडी दगडादगडातून प्राचीन आठवणी सांगत होती. इथे बाजार भरायचा, इथे खेळ खेळले जायचे, या ठिकाणी पाठशाळा आणि इथे ग्रंथालय, हे ठिकाण स्वयंपाकाचे, हे आंघोळीचे, या जागी प्रार्थना व्हायच्या, इथे डावपेच आखले जायचे, ही खजिना ठेवायची जागा आणि शस्त्र साठवायची जागा, या कक्षात केवळ पुरूष राहात आणि इथे बायका, गुलाम, मुले वावरत, या मोठ्या चुली, या पडव्या आणि या ओसर्‍या... सगळे सगळे अक्षरशः दिसत होते. भारवल्यासारखे आम्ही शेकडो वर्षे जुन्या काळाच्या पाऊलखुणांवर आमची पावले टाकत होतो. मनात आले प्रत्यक्ष जगणे तरी हेच तर असते... पावलांवर पाऊल टाकणे !
Ithihasachi Khidki

मनाची विचित्र अवस्था झाली होती. अडीच हजार वर्षांपूर्वीचा काळ असा इथे थांबला होता. काय झाले असेल त्या पराक्रमी पूर्वजांचे? कुठे गेली ती माणसे?? ह्म्म्..वर्तमानात ये बयो...

आपली संस्कृतीही एवढीच प्राचीन, समृद्ध, पण एवढे भौतिक पुरावे आपल्याकडे क्वचित सापडतात. इटली असो की ग्रीस, इतर देशही पहाताना एक गोष्ट जाणवते ती म्हणजे या लोकांना भव्यतेचे वेड आहे. बारीक कलाकुसर करण्यापेक्षा भव्य वास्तू बांधण्यात ते कौशल्य पणाला लावतात. हे मंदीरही वास्तुकलेचा आणि नगररचनेचा आदर्श नमुना मानला जाते. इथल्या अनेक वास्तुरचना जगात आज उत्त्मोत्तम समजल्या जाणार्‍या वास्तूंचे प्रेरणा स्थान आहेत.
Bhavyata

उन्हाने थकवा जाणवत होता. तहान भूक लागली होती. त्यासाठी खाली उतरावे लागणार होते. समोर झाडाखाली लोक विसावले होते. जगाच्या कानाकोपर्‍यातल्या भाषा कानावर पडत होत्या. अनेकांनी आपापल्या शोदोर्‍या उघडल्या होत्या. तरूण घोळक्यांमध्ये हसणेखिदळणे मुक्तपणे चालू होते. फोटोबहाद्दर आपापल्या पराक्रमात मग्न होते. आम्हीही एका सावलीत विसावलो. थोड्या वेळाने खाली उतरायला सुरुवात केली.

एक जागा सापडली जिथून सगळे अथेन्स शहर दिसत होते. प्रचंड गर्दीचं, दाटीवाटीचं शहर. अवाढव्य पसरलेलं. एका गाइडने सांगितले, पूर्ण ग्रीसची लोकसंख्या ११ कोटी आहे. त्यातले ५ कोटी लोक एकट्या अथेन्स शहरात रहातात !!!!
Athang Athens

पायथ्याशी आलो. या परिसराचा मोह संपत नव्हता. लेकीला काहीतरी ताजे खायला घालणे आवश्यक होते. अगदी समोरच्या रेस्तराँमध्ये शिरलो. समोर फुललेली जाईची वेल! पुन्हा माहेरच्या मातीचा वास मनात दाटून आला. तिथे खायला मात्र शाकाहारी काही नव्हते. बाहेर आलो तर एक छोटी ट्राम उभी होती.
संपूर्ण टेकडीभोवती प्रदक्षिणा घालणारी ३ कि.मी.चा रस्ता आहे. त्यावरून या ट्राममधून फिरता येणार होते. आम्ही आत बसलो. छोटी झुक्गाडी म्हणून लेकीने खुशीत गायला सुरुवात केली. पुन्हा एकदा स्थळमहात्म्य ऐकवत, छोटी ठिकाणं उलगडून दाखवत ट्राम चालू लागली. अधुनमधून आनंदाचे अचानक शिडकावे होतच होते. गाड्यावर सुका मेवा विकणारा इराणी, कुठे बँडच्या तालावर नाचणारे आनंदी घोळके, कुठे संतूरसारखे वाद्य वाजवत गाणारा म्हातारबाबा तर कुठे पार्थेननला कुंचला घेउन कागदावर जिवंत करणारा समाधिस्थ चित्रकार... खरं सांगते, त्या टेकडीवरच्या सुबक मूर्त्यांएवढीच ही माणसंही सुंदर भासत होती.

2 comments:

  1. Masta ga Maya attach tuza blog sapadala....ata sagala vachun kadhate

    ReplyDelete
    Replies
    1. Ashwini , vaachuun saang aavadale ki nahi...

      Delete