Monday, 14 September 2020

येसर

प्रत्येक हाताची चव वेगळी, प्रत्येक घरातला मसाला वेगळा, स्वयंपाकाची पद्धत निराळी ! सारखेच घटक वापरूनही दोन घरातल्या चवी वेगळ्या! हे जग मला नेहमीच अचंबित करतं! नव्या चवीबद्दलचं कुतूहल कधीही संपू देत नाही. कोणी मैत्रीण भेटायला येताना काय आणू विचारत असेल तर बहुतेक वेळी मी तिच्या घरचा एखादा मसाला आण असं सांगते. त्या मसाल्यात त्या घरची खास खाद्य परंपरा असते ती अनुभवता येते म्हणून ! 
वेगवेगळे मसाले चटण्या हा खास आवडीचा विषय असला तरी त्यातही लाडका प्रकार म्हणजे येसर ! 
माझ्या माहितीतला कळत्या वयापासून आठवणारा पहिला रेडी टु कुक प्रकार! महाराष्ट्रात प्रत्येक प्रांतात असे रेडी टु कुक प्रकार आहेत. वेगवेगळी धान्य, डाळी आणि मसाले खरपूस भाजून वाटून साठवलेले असतात. 
मराठवाड्यात येसराला फार महत्व. आमच्याकडच्या शुभकार्यात आजही पाहुणे मंडळी घरी जाताना शिदोरीसोबत येसर मेतकूट द्यायची पद्धत आहे. लाडू, चिवडा आणि येसर मेतकूट. काही घरी येसराच्या ऐवजी पुडचटणी दिली जाते.

पूर्वीच्या काळी सगळे प्रवास बैलगाडी, टांगा यातून होत असत. लग्नघरुन निघून घरी पोहोचता पोहोचता भूक लागून जात असणार. आठ दिवस घर बंद म्हणजे भाजी नाही, डाळी शिजायला वेळ किती लागतो! ©Maya Dnyanesh.
 पिठलं हा नेहमीचा पर्याय असला तरी काहीतरी चमचमीत आणि पटकन होणारं हवं! मग प्रवासाच्या गाठोडीतून लग्नघरी मिळालेला येसर काढायचा, पाण्यात कालवायचा आणि चरचरीत लसणावर फोडणी घालायची. दशम्या सोबत असायच्या. मंडळी हातपाय धुवून कपडे बदलून येईपर्यंत येसर आमटी तयार. मग दशम्या त्यात कुस्करायच्या आणि ताव मारायचा! 

ज्या कोणा अन्नपूर्णेला येसराची पद्धत सुरू करावी वाटली ती फार चतुर असणार. लग्नघरी आठ दहा दिवस आधीपासूनच तयारीसाठी आलेले पाहुणे, एकीकडे रुखवत, दुसरीकडे लाडू, तिसरीकडे चिवडा असं करता करता माऊली वीस पंचवीस लोकांना येसर खिचडी, पापड, लोणचं रांधून सगळ्या कामात हात घालायला मोकळी ! 
माझ्या आजोळी येसर फार छान असे. मोठ्या कुटुंबात लग्न घर म्हणलं की पंचवीस माणसं सहज असत. आम्ही लहान पोरे दिवसभर मोठ्या माणसांच्या चाललेल्या कामात लुडबुड करत असू. घरात इतकी कामं असत की आम्ही जेवलोय का आणि रात्री झोपलोय का हे बघण्याव्यतिरिक्त कोणा मोठ्या माणसाला वेळ नसे. जात्याच्या खोलीत अखंड घरघर आवाज चालू असे. त्यावर येसर दळायच्या आधी गुळपापडीच्या लाडुसाठी तांदूळ भरडून घ्यायचे, मग मेतकूट दळायचं, मग येसर दळायचा! कारण यात सर्वात जास्त मसाले! 

ताजा येसर घमघमत बैठकीपर्यंत गेला की आजोबा रात्रीच्या जेवणात येसराची फर्माईश करत. रात्री ओसरीवर पंगतीत आम्ही मुले रांगेत जेवायला बसत असू. द्रोण पत्रावळी मांडल्या जात, चटणी कोशिंबीर वाढून झाली की मग आजी, मामी कांद्याचा नाहीतर लसणाचा येसर आणि पोळी भाकरी वाढत असत. मोठ्यांसाठी तिखट केलेला येसर मुलांना जरा जास्तच तिखट व्हायचा. यावरचा उपाय म्हणून तिखट बाधू नये म्हणून कच्चं तेल त्या आमतीवर वाढलं जायचं. ते हलवलं की द्रोणातला येसर चमचम करायचा. ती झाली चांदण्यांची आमटी !!! मसाल्याच्या वासाने चवीने नाक डोळे पुसत खवळलेल्या भुकेला हळुहळू शांत करणारी चांदण्यांची आमटी !!!! ©Maya Dnyanesh

घरात वापरायला थोडा येसर बाजूला काढून बाकी येसराच्या आणि मेटकुटाच्या पुड्या बांधायचं काम सुरू होई. किमान पाचशे पुड्या तरी हव्यातच. कारण पाहुण्यांना चिवडा लाडू सोबत ययेसर मेतकूट देणं हा एक भाग झाला दुसरा भाग गावात वाटण्याचा असे. 

लग्नानंतर आठ दिवसांनी नवी नवरी घरातल्या जाऊ नणंदा यांच्यासोबत गावातल्या ओळखीच्या घरी येसर मेतकूट द्यायला जात  असे. मग त्या त्या घरातल्या लेकिसुनांची ओळख होई, उखाणे घेतले जात, ओटी भरली जाई ! तिची सगळ्या गणगोटाला ओळख करून देण्यासाठी ही पद्धत. येसर मेतकूट वाटण्याचा हा कार्यक्रम किमान आठ दिवस तरी चाले. हा प्रकार किती व्यवहारी आहे !!! 

हा येसर महालक्ष्मीच्या वेळीही महत्वाचा. माहेरी महालक्ष्म्या रात्री जेवतात. म्हणजे मुख्य नैवेद्य रात्री असतो. तर दुपारच्या जेवणात भाजकं जेवण असतं.  भाजलेल्या डाळ तांदळाची खिचडी आणि येसर. रात्रीच्या शेकडो पदार्थांच्या नैवेद्याच्या स्वयंपाकापेक्षा हा प्रकार किती सुटसुटीत !!! ©Maya Dnyanesh.

या आणि अशा अनेक आठवणींमुळे येसर माझं कम्फर्ट फूड आहे. येसर भाकरी येसर खिचडी खाल्ली की मला बरं वाटतं !! 

ही माझ्या आजोळच्या आजीची येसराची रेसिपी. वर म्हणल्याप्रमाणे ही चवही प्रत्येक घराची वेगळी असते. माझ्या आठवणीतली मला आवडणारी ही पाककृती. 
लागणारे साहित्य :
गहू - १ वाटी
हरबरा डाळ - १ वाटी
ज्वारी - १/२ वाटी
बाजरी - १/२ वाटी
धणे - १/२ वाटी
सुकं खोबरं / कीस - १/२ वाटी
जिरे - २ टे स्पू
मिरे - २ टे स्पू
लवंग - १०-१२
मसाला वेलची - 4
दालचिनी - बोटाच्या दोन पेरांएवढी
दगडफूल - ४ टे स्पू

क्रमवार पाककृती: 
गहू, डाळ, ज्वारी बाजरी हे कोरडेच; वेगवेगळे मंद आचेवर रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे. मग मसाल्याचे पदार्थ थोड्या तेलावर घरभर घमघमाट सुटेपर्यंत भाजून घ्यायचे. एकत्र करून मिक्सरवर कोरडे बारीक दळून घ्यायचे. बारीक रवा असतो तेवढं जाड दळायचं.आता बरणीत भरून ठेवा. पुढचे ३-४ महिने जेव्हा जेव्हा झटपट पण खमंग आमटी खावी वाटेल तेव्हा करा.

आमटीसाठी -
आमटी पीठ - २ टे स्पून
लसूण - ५-६ पाकळ्या किंवा एक मध्यम कांदा चिरून
लसूण घालणार असाल तर कढीलिंबाची ५-६ पानंही घालायची.
तेल, मीठ
मोहरी, जिरे
हळद,तिखट
४ वाट्या पाणी
कोथिंबीर कढीलिंब वगैरे..

आमटीची कृती
आमटीचे पीठ वाटीभर पाण्यात नीट मिसळून घ्या. पातेल्यात तेल गरम करा. जिरं मोहरी लसूण कढिलिंबाची फोडणी करा. त्यावर हे वाटीतलं पीठ घाला. हळद आणि तिखट हवं तसं घाला. वरून अजून ३ वाट्या पाणी टाका. साधारण ५ मिनिटे उकळू द्या. येसर तयार.

गरम भात, खिचडी किंवा भाकरी पोळी यात कुस्करून खा. 
याच आमटीत बेसनाच्या वड्या टाकून एक उकळी आणा की येसर पातोड्या(पाट वड्या) झाल्या. 
डाळीच्या पिठाचे गोळे टाकले की गोळ्यांची आमटी. 
शेंगदाणे खोबरं यांचा कंटाळा आला असेल तर भाज्यांचा रस्सा दाट करण्यासाठी हा चविष्ट आणि हेल्दी पर्याय आहे. मला गवार,वांगं, दुधी या भाज्या येसरातल्या आवडतात.
पावसाळ्यात, हिवाळ्यात झणझणीत सूप म्हणूनही ही पातळ आमटी पिता येते. 
अशी ही लो कॅलरी हाय प्रोटीन रेडी टु कुक येसर आमटीची गोष्ट!


No comments:

Post a comment