Wednesday, 18 December 2013

येसर आमटी

बर्‍याच दिवसांपासून ही पाककृती लिहायची राहून गेली होती. मागे महालक्ष्म्यांच्या लेखात उल्लेख केलेल्या येसर आमटीची ही पाकृ.
मराठवाड्यातली पारंपारिक आमटी. बर्‍याच लग्न कार्यात पाहुण्यांना जाताना शिदोरी म्हणून मसाला नि मेतकूट देतात. मराठवाड्यात येसर नि मेतकूट देतात. खूप भाज्यांची रेलचेल मराठवाड्यातल्या जेवणात अजूनही नसते. ग्रामीण भागात तर असेल ती पालेभाजी, घट्ट वरण आणि भाकरी हे जेवणच कॉमन आहे. अशा भागात चवबदल, चमचमीत झणझणीत काही खायचं असेल तर येसर करतात. लग्नकार्यात घरी पाहुण्यांची खूप गर्दी असे. आठ आठ दिवस आधी नि नंतर वर्‍हाडी मंडळी कामाला जुंपलेली असत. अशा वेळी पटकन होणारा हा 'कोरड्यास' फार महत्त्वाचा. कार्याच्या तयारीत मसाले भाजण्याबरोबर येसर भाजणे ठरलेलेच. मुहूर्त करायच्या वेळी आणि सूप वाजतं तेव्हा पानात येसर हवाच. पाहुणे परत जातानाही लाडू चिवड्यासोबत येसर नि मेतकुटाचे पुडे देण्याची प्रथा आजही आहे. मला वाटतं की कामाच्या गर्दीत कमी वेळात स्वयंपाक करायचा असतो तेव्हा करायला सोपा नि खमंग म्हणून या पदार्थाला येवढे महत्त्व असावे. महाल्क्ष्म्यांच्या दिवशी ज्यांच्या घरी रात्रीचा नैवेद्य असतो त्यांच्याकडे दुपारचे जेवण भाजलेले खावे म्हणून येसर नि भाजलेल्या डाळ तांदळाची खिचडी असते.
आजही माझ्या घरात खिचडी नि येसर हा झटपट होणारा नि सर्वांना आवडणारा हा प्रिय पदार्थ आहे. माझे तर हे कम्फर्ट फूड आहे. पावसातून भिजून आल्यावर किंवा बाहेर कडाक्याच्या थंडीत फिरून आल्यावर येसर ओरपणे म्हणजे स्वर्गसुख !
लहानपणी आजी बाजरी किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत वाटीत येसर वाढायची. आम्हा मुलांना तो कमी तिखट लागावा म्हणून त्यात कच्च्या तेलाची धार. मग ते तेल येसरावर चांदण्यांसारखं चमकायचं. तयार व्हायची चांदण्यांची आमटी ! माझी लेकही ही चांदण्यांची आमटी आवडीने खाते.
तर हे पुराण पुरे करून मुख्य कृती आता लिहिते.
लागणारे साहित्य :
 गहू - १ वाटी
चणा डाळ - १ वाटी
ज्वारी - १/२ वाटी
बाजरी - १/२ वाटी
धणे - १/२ वाटी
सुकं खोबरं / कीस - १/२ वाटी
जिरे - २ टे स्पू
मिरे - २ टे स्पू
लवंग - ७-८
मसाला वेलची - २
दालचिनी - बोटाच्या दोन पेरांएवढी
दगडफूल - २ टे स्पू
आमटीसाठी -
आमटी पीठ - २ टे स्पून
लसूण - ५-६ पाकळ्या किंवा एक मध्यम कांदा चिरून
लसूण घालणार असाल तर कढीलिंबाची ५-६ पानंही घालायची.
तेल
मोहरी,जिरे
हळद
४ वाट्या पाणी
कोथिंबिर वगैरे..
मीठ
क्रमवार पाककृती: 
गहू, डाळ, ज्वारी बाजरी हे कोरडेच;वेगवेगळे मंद आचेवर रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे. मग मसाल्याचे पदार्थ थोड्या तेलावर घरभर घमघमाट सुटेपर्यंत भाजून घ्यायचे. एकत्र करून मिक्सरवर कोरडे बारीक दळून घ्यायचे. आता बरणीत भरून ठेवा. पुढचे ३-४ महिने जेव्हा जेव्हा झटपट पण खमंग आमटी खावी वाटेल तेव्हा करा.

आमटीची कृती
आमटीचे पीठ वाटीभर पाण्यात नीट मिसळून घ्या. पातेल्यात तेल गरम करा. जिरं मोहरी लसूण कढिलिंबाची फोडणी करा. त्यावर हे वाटीतलं पीठ घाला. वरून अजून ३ वाट्या पाणी टाका. साधारण ५ मिनिटे उकळू द्या. येसर तयार.
गरम भात, खिचडी किंवा भाकरी पोळी यात कुस्करून ओरपा. चव वाढवण्यासाठी लिंबूपण घाला.
वाढणी/प्रमाण: 
मसाला साधारण १/४ किलो , २ टे स्पू आमटी पिठाची ४ - ५ वाट्या आमटी होते.


2 comments:

  1. ग्रेट लगेच आली रेसिपी. या निमिताने त्या "कोरड्यास" शब्दाचा साधारण अर्थ लक्षात येतोय. माझा देशावरचा नवरा हा शब्द बरेचदा वापरतो आणि मला नेहमी ते कोरडं काही असावं असं वाटायचं :)
    आता ही रेसिपी मी करू शकेन की नाही माहित नाही कारण इकडे धान्य आणणं होत नाही भारतीय दुकानात मिळतात का हे पण पाहिलं नाही पण माझ्यासाठी हटके प्रकार आहे :)

    ReplyDelete
  2. A friend told me about this recipe couple of weeks ago. I had everything on hand except Bajri. So I used more Jowar. MAde Amati immediately. The whole concoction was out of this world! Such a great recipe. Thank you for sharing traditional gem.

    ReplyDelete